'माऊली-संकल्पसिद्धी' घोटाळा : भाजप नेते सुनील आडके यांना 7 दिवसांची कोठडी

माऊली मल्टिस्टेट, संकल्पसिद्धी, उज्ज्वलम ऍग्रोच्या माध्यमातून कोट्यवधींच्या घोटाळ्यात सोमवारी (ता. 17) अटक करण्यात आलेले भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस व नाशिक रोड-देवळाली व्यापारी बॅंकेचे संचालक सुनील खंडेराव आडके यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने येत्या सोमवारपर्यंत (ता. 24) म्हणजेच सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे
BJP Nashik Leader Sunil Adke Gets Police Custody
BJP Nashik Leader Sunil Adke Gets Police Custody

नाशिक  : माऊली मल्टिस्टेट, संकल्पसिद्धी, उज्ज्वलम ऍग्रोच्या माध्यमातून कोट्यवधींच्या घोटाळ्यात सोमवारी (ता. 17) अटक करण्यात आलेले भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस व नाशिक रोड-देवळाली व्यापारी बॅंकेचे संचालक सुनील खंडेराव आडके यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने येत्या सोमवारपर्यंत (ता. 24) म्हणजेच सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या चौकशीतून आडके यांच्याकडून घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार विष्णू भागवत याच्या कोट्यवधींच्या मालमत्तेच्या धक्‍कादायक व्यवहारांची माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, आठ एजंटांच्या पोलिस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ झाली आहे.

माऊली मल्टिस्टेट को-ऑप.सोसायटी, संकल्पसिद्धी प्रोडक्‍ट इंडिया, उज्ज्वलम्‌ ऍग्रो या कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी गेल्या 7 फेब्रुवारीला नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य संशयित विष्णू भागवत आणि 8 एजंटांना अटक केली होती. विष्णू भागवतची अन्य जिल्ह्यांतही मालमत्ता असल्याचे समोर आले होते. परंतु, यातील बहुतांश मालमत्तेची कागदपत्रे बनावट असल्याचे सामेर आल्यानंतर, सदरचे दस्तऐवजात समावेश असल्याप्रकरणी सोमवारी पोलिसांनी भाजपचे शहर सरचिटणीस सुनील आडके यांना अटक केली. आडके यांना मंगळवारी (ता. 18) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, त्यांना येत्या सोमवारपर्यंत (ता. 24) पोलिस कोठडी सुनावली आहे.

आडके यांच्या अटकेमुळे राजकीय आणि व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्य संशयित विष्णू भागवत याच्या पालघर येथील कोट्यवधी रुपयांच्या जमिनीची कागदपत्रे हाती लागली होती. तपासात मात्र सदरची जमीनच नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, याप्रकरणी दस्ताऐवजांची छाननी केल्यानंतर याकामी आडके यांनी भागवतला मदत केल्याचे व प्रत्यक्ष सहभाग असल्याचे समोर आले. त्यामुळे भागवत याच्या दडून असलेल्या कोट्यवधींच्या मालमत्तेची धक्‍कादायक माहिती आडके यांच्याकडून पोलिसांच्या हाती लागण्याची शक्‍यता पोलिसांकडून व्यक्त होते आहे.

एजंटांच्या कोठडीत वाढ

माऊली मल्टिस्टेट, संकल्पसिद्धी कंपन्यांची एजंटगिरी करीत गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या आठ एजंटांच्या पोलिस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. कृष्णा भुंजगराव वारे (वय 39, रा. कृष्णप्रभा बंगला, आनंदनगर, पाथर्डी, जि. नगर), मयूर सुनील पवार (वय 27, रा. पवार वस्ती, लचके प्लोअर मिलजवळ, बाजीरावनगर, येवला), प्रकाश आप्पासाहेब ननावरे (वय 37, रा. बोरस्ते वस्ती, माळशिरस, जि. सोलापूर), धनंजय भीमराव सावंत (वय 40, रा. मांडवे, ता. माळशिरस), दादा महादेव माने (वय 26, रा. मुक्ती संकुल अपार्टमेंट, तांबेनगर, बारामती), नानासाहेब अशोक पायधन (वय 35, रा. लक्ष्मीनिवास बंगला, तुकारामनगर, तळवाडे, ता. हवेली, जि. पुणे), रोहिदास शांताराम हजारे (वय 48, रा. लक्षदीप सोसायटी, इंद्रायणीनगर भोसरी, पुणे) अशी संशयित एजंटांची नावे आहेत.

पथके रवाना

कोट्यवधी रुपयांच्या या घोटाळ्याप्रकरणी संशयित विष्णू भागवतच्या जवळच्या नातलगांचाही समावेश असल्याने त्यांच्या मागावर आर्थिक गुन्हेशाखेची पथके रवाना करण्यात आलेली आहेत. तर काही पथके संशयितांच्या मालमत्तेची माहिती घेण्यासाठी रवाना करण्यात आलेली आहेत. विष्णू भागवत याच्याविरोधात परराज्यातही गुन्हे दाखल झाल्याने त्याचा ताबा घेण्याची जिल्हा न्यायालयाकडे मागणी होते आहे. विष्णू भागवतच्या कोठडीची मुदत गुरुवारपर्यंत (ता. 20) आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com