`उजव्या कालव्या`तून मतांचा धबधबा वाहण्याची भाजपला आशा

`उजव्या कालव्या`तून मतांचा धबधबा वाहण्याची भाजपला आशा

पुणे : नीरा कालव्याच्या पाणी वाटपावरून राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापवण्यात येत आहे. नीरा डाव्या कालव्यातून बारामती व इंदापूरला जाणारे पाणी कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला.

या निर्णयामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील चार तालुक्‍यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त 4.73 टीएमसी पाणी मिळणार असले तरी त्याचा राजकीय फायदा भारतीय जनता पार्टी व शिवसेनेला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकांचा विचार करता माढ्यातील हे चारही मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विरोधात कणखर मोर्चेबांधणी केली आहे.

उजव्या कालव्यातून मिळणाऱ्या वाढीव पाण्याचा थेट फायदा सातारा जिल्ह्यातील फलटण तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्‍यातील काही गावांना होणार आहे. या चार तालुक्‍यांत सध्या भाजप वा शिवसेनेचा आमदार नाही.

पंढरपूरमधून कॉंग्रेस तर फलटणमधून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. सांगोल्यातून गणपतराव देशमुख हे दोन्ही कॉंग्रेसच्या मदतीने आमदार आहेत. माळशिरसमध्येदेखील दिवंगत आमदार हनुमंत डोळस हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. अर्थातच ते मोहिते-पाटील यांचे उमेदवार होते.

या साऱ्या पार्श्‍वभूमीवर येत्या विधानसभा निवडणुकीत या चारही मतदारसंघात भाजपने पाण्याच्या मुद्यावरून बाजी मारली आहे. गेल्या वेळी भाजपा-सेना विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढले होते. मात्र, त्याआधीच्या वाटपात चारपैकी पंढरपूर-मंगळवेढा, सांगोला व माळशिरस हे तीन मतदारसंघ सेनेच्या वाट्याला आले होते. यावेळी होणाऱ्या वाटपात यात काही प्रमाणात आदलाबदल झाली तरी दोन्ही पक्षांना चांगले वातावरण राहण्याची शक्‍यता पाण्याच्या निर्णयामुळे झाली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची कोंडी या निर्णयामुळे झाली आहे. त्याचा फायदा भाजप-सेना उठवित आहे.

बारामती आणि इंदापूर या दोन विधानसभा मतदारसंघांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. मात्र येथे भाजपचा किंवा शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे चार मतदारसंघांत भाजपसाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. 
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com