BJP has edge over opponents in Vidarbha | Sarkarnama

विदर्भात यंदाही कमळच फुलणार ?  

  अरुण जोशी  
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

-विदर्भातील विधानसभा निवडणुकीत भाजप सेनेला अनुकूलता 
-भाजपाकडे सर्वाधिक ४३ आमदार-तर कॉंग्रेस -१०,सेना -३,राष्ट्रवादी- १
-मुख्यमंत्री, अर्थमंत्री, सात मंत्री आणि विरोधी पक्षनेते असतील रिंगणात 

अमरावती  : पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील कॉग्रेस राष्ट्रवादीच्या दिग्गजांनी सेना भाजपात केलेला प्रवेश, विदर्भातून हद्दपार होण्याच्या स्थितीत असलेले कॉंग्रेस राष्ट्रवादी पार्टी आणि ६२ पैकी ४४ जागा जिंकून नंबर वन वर असलेली भाजपा या परिस्थितीत २०१९ ची निवडणुक भाजपा सेनेकरीता एकतर्फीच होण्याचे चिन्हं सध्या दिसतायेत.

 राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विद्यमान सरकारचे सात मंत्री यांनी त्यांच्या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. भाजपची शिवसेनेशी युती होणार नाही याची शक्यता लक्षात घेऊन भाजपाने विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघात उमेदवार निश्चिती करण्यास मागील महिन्यातच सुरूवात केली. 

नागपूरचे भाजपाचे आमदार गिरीश व्यास, रामदास आंबटकर, उपेंद्र कोठेकर, यांनी सर्वच्या सर्व ६२ मतदारसंघात संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली आहे. सर्वच मतदारसंघात भाजपच्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती सुध्दा आटोपल्या आहेत. शिवसेनेचा मात्र सध्या विदर्भात निवडणुक विषयी तयारीचा कोणताही गाजावाजा नाही. कॉंग्रेस अन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती मागील महिन्यातच आटोपल्या. एमआयएम ने सुध्दा अमरावती, अकोला, नागपूर येथे विधानसभा निहाय उमेदवारांची यादी तयार केली आहे.

 वंचित बहुजन आघाडीकडेही तिकिटोच्छूक उमेदवारांची गर्दी होती. विदर्भात राळेगाव मध्ये आदिवासी विकासमंत्री प्रा अशोक उईके, जळगाव जामोद येथे कामगार मंत्री डॉ संजय कुटे, कामठी मतदारसंघात उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मोर्शी मध्ये कृषीमंत्री डॉ अनिल बोंडे, यवतमाळचे राज्यमंत्री मदन येरावार आणि शिवसेनेचे दिग्रसचे राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकरिता ही विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. निवडणूकीत विजयी झाल्यास पुन्हा मंत्रीपदावर वर्णी लागण्याच्या आशेने हे सर्व मंत्री आपापल्या मतदारसंघात सक्रिय झाले आहेत.

विदर्भाव्यतिरीक्त उर्वरीत महाराष्ट्रातून ज्या गतीने अन्य पक्षातील नेत्यांचे भाजप मध्ये इनकमिंग सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर विदर्भात मात्र भाजप सेनेकडे येण्याची अन्य पक्षातील नेत्यांची मानसिकता नाही. या उलट भाजपचे खासदार राहिलेले नाना पटोले आणि आमदार राहिलेले आशिष देशमुख यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. नाना पटोले पुन्हा स्वगृही कॉंग्रेस मध्ये गेले तर आशिष देशमुख अद्याप राजकिय पक्षाच्या शोधात आहेत.

 तर शिवसेनेचे वरोरा चे आमदार बाळू धानोरकर यांनी शिवसेनेला रामराम ठोकून कॉंग्रेसची खासदारकीची निवडणूक लढविली आणि केन्द्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला. विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुसद चे मनोहर नाईक हे एकमेव आमदार आहेत. तर कॉंग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष यशोमती ठाकूर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विरेन्द्र जगताप, अमर काळे, रणजीत कांबळे, सुनिल केदार, गोपालदास अग्रवाल, हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, अमित झनक या कॉंग्रेस च्या आमदारांवर विदर्भात जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची जबाबदारी आहे.

या व्यतिरिक्त भारीप बहुजन महासंघाचे बळीराम सिरस्कार(बाळापूर), प्रहारचे फायर ब्रॅण्ड नेते बच्चू कडू(अचलपूर) युवा स्वाभिमानचे रवी राणा(बडनेरा) या अपक्ष आमदारांचे आव्हान भाजपला आहे. आमदार रवी राणा यांची पत्नी नवनित राणा या कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अमरावती लोकसभेत विजयी झाल्या आहेत. त्यांमुळे किमान अमरावती मतदारसंघात तरी राणा दांपत्याचा राजकिय प्रभाव वाढला आहे.

विदर्भातील विधानसभेत पक्षीय बलाबलएकुण जागा ६२ भाजपा - ४३

शिवसेना - ०३

कॉंग्रेस - १०

राष्ट्रवादी - ०१

भारीप बहुजन - ०१

अपक्ष - ०२

रिक्त - ०२

(बाळू धानोरकर खासदार झाले आणि आशिष देशमुख यांनी भाजपचा राजीनामा दिला त्यामुळे दोन विधानसभा मतदारसंघात सध्या कोणीही आमदार नाहीत.)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख