शिवसेनेच्या बालेकिल्यात भाजपची शतप्रतिशतकडे वाटचाल? 

गेली 30-35 वर्ष जिल्ह्यावर निर्विवाद वर्चस्व राखून असलेल्या शिवसेनेच्या बालेकिल्याला सुरूंग लावण्याचे काम भाजपने पध्दतशीरपणे सुरू केले आहे.
abd-bjp
abd-bjp

औरंगाबादः गेली 30-35 वर्ष जिल्ह्यावर निर्विवाद वर्चस्व राखून असलेल्या शिवसेनेच्या बालेकिल्याला सुरूंग लावण्याचे काम भाजपने पध्दतशीरपणे सुरू केले आहे. कधीकाळी शिवसेनेचे बोट धरून वाढलेली भाजप अशी हेटाळणी सहन करणारा हा पक्ष आज घडीला शिवसेनेवर वरचढ ठरू लागला  आहे. शत प्रतिशत  भाजप हा नारा पक्षाने प्रत्यक्षात उतरवण्यास सुरूवात केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात टप्याटप्याने भाजप नेतृत्वाने स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांना बळ देत शिवसेनेला छोट्या भावाच्या भूमिकेत बसवले आहे. भाजपने हरी भाऊ बागडे यांना  विधानसभा अध्यक्षपद , विजया रहाटकर यांना राज्य महिला आयोग तर डॉ . भागवत कराड यांना मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष पद दिले . एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ल्याला मंत्रिपद देण्यास उद्धव ठाकरे विसरले पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेरच्या चार महिन्यांसाठी का होईना मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला अतुल सावेंच्या रूपाने  स्थान दिले . अशाप्रकारे भाजपने औरंगाबादच्या नेत्यांना बळ देत जिल्ह्यात आणि मराठवाड्यात भाजप वाढावा असे प्रयत्न चालवले आहेत . 

गेल्या विधानसभा निवडणुकीत युती तोडत पहिला झटका भाजपने शिवसेनेला दिला होता. औरंगाबाद जिल्ह्यात हा झटका इतका जोरात बसला की सेनेच्या पाच आमदारांची संख्या दोनवर आली. जिल्ह्यात पश्‍चिम आणि पैठण विधानसभा मतदारसंघ सोडला तर शिवसेनेचे प्रतिनिधत्वच उरलेले नाही. कन्नड विधानसभा शिवसेनेकडे असली तरी हर्षवर्धन जाधव यांनी बंडखोरी करत स्वःताचा पक्ष काढल्याने इथेही सेनेचे संख्याबळ घटले. 

स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार केला तर शहरातील महापालिकेच्या सत्तेत भाजप बरोबरीची वाटेकरी आहे, जिल्हा परिषदेत शिवसेनेने विधानसभेत युती तोडल्याचा वचपा म्हणून कॉंग्रेसशी हातमिळवणी करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले होते.पण आता तिथेही शिवसेनेला बाजूला खेचण्याच्या हालचाली भाजपच्या नेत्यांनी सुरू केल्या आहेत.


संख्याबळाच्या जोरावर राज्याच्या सत्तेत मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या भाजपने संधी मिळेल तिथे शिवसेनेला दाबण्याचा यशस्वी प्रयत्न केला. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत सेना चीतपट झाल्यावर भाजपने मात्र उसळी मारण्याची संधी हेरली.

आपल्या पदाधिकाऱ्यांना शक्ती देण्यास सुरुवात केली. तशी ती विधानसभा निवडणुका जिंकल्यापासूनच देणे सुरू होते. पण आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या कामाला अचानक गती देण्यात आली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात कधी नव्हे ते भाजपने महत्वाची पदे देत गल्ली ते दिल्ली कमळच कसे उमलेल याची खबरदारी घेतली आहे. महाराष्ट्राच्या सर्वोच्च अशा विधीमंडळाच्या अध्यक्षपदी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची निवड करत खऱ्या अर्थाने त्यांच्या बहुमान केला.

त्यानंतर नगरसेविका, महापौर आणि राष्ट्रीय स्तरावर भाजप महिला मोर्चाची जबादारी सांभाळणाऱ्या औरंगाबादेतीलच विजया राहाटकर यांच्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. राहाटकर यांच्या रुपाने जिल्ह्याला दुसरे महत्वाचे पद मिळाले. 

टप्याटप्याने वर्षानुवर्ष पक्षासाठी झटणाऱ्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना हेरून त्यांना पदे देण्याचा सिलसिला भाजप नेतृत्वाने सुरूच ठेवला. राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष पद प्रवीण घुगे, रोजगार हमी योजना समितीचे अध्यक्षपद आमदार प्रशांत बंब, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद राज्याचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या डॉ. भागवत कराड यांना बहाल करण्यात आले. विशेष म्हणजे हे पद या आधीच्या युती सरकारमध्ये शिवसेनेकडे होते. 

पुर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार अतुल सावे यांना नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात राज्यमंत्री करत भाजपने औंरगाबाद जिल्ह्यावर आपला किती फोकस आहे हे कृतीतून दाखवून दिले. उद्योजक असलेल्या सावेंकडे उद्योग, खणिकर्म, अल्पसंख्याक आणि वक्‍फ हे खाते देण्यात आले. 

मंत्रीपद मिळाल्यानंतर सावेंच्या रविवारी जिल्ह्यात जोरदार स्वागत करण्यात आले. भाजप कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत करण्याची दुसरी संधी कामगार मोर्चाचे अध्यक्ष संजय केणेकर यांना म्हाडाचे मराठवाडा विभागाचे सभापतीपद देऊन देण्यात आली.

 हे कमी की काय? म्हणून आता शिवसेनेकडे असलेले जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपकडेच हवे अशी नवी मागणी देखील केली जात आहे. जंगी स्वागतानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना अतुल सावे यांनी देखील या मुद्याला हात घातला. पालकमंत्री मराठवाड्याचाच हवा अशी मागणी करतांना आपल्यावर ही जबाबदारी सोपवली तर ती पार पाडण्यास तयार आहोत हे सांगायला देखील ते विसरले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com