भाजपचे सरकार शेतकऱ्यांचे मारेकरी : डॉ. अमोल कोल्हे यांची टीका

भाजपचे सरकार शेतकऱ्यांचे मारेकरी : डॉ. अमोल कोल्हे यांची टीका

वरवंड : "भाजप सरकार म्हणतंय, पाच वर्षांत आम्ही सर्वोत्तम कामगिरी केली. मात्र, राज्यात सोळा हजार शेतकऱ्यांनी कर्जामुळे आत्महत्या केली. त्यामुळे हे सर्वोत्तम नाही; तर मारेकरी सरकार आहे,'' अशी टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.

"राज्यात शरद पवार यांच्या विचारांची गरज आहे. त्यामुळे रमेश थोरात यांना मोठ्या मताधिक्‍याने निवडून द्या,'' असे आवाहन केले.

दौंडमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ यवत (ता. दौंड) येथील प्रचार सभेत खासदार कोल्हे बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, डॉ. अर्चना पाटील, पांडुरंग मेरगळ, माजी आमदार रमेश थोरात, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे, पक्षनिरीक्षक बापूराव सोलनकर, तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, योगिनी दिवेकर, सोहेल खान, वीरधवल जगदाळे, नितीन दोरगे आदी उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले, ""या सरकारने पाच वर्षांत जनतेला केवळ आश्वासनांची ऊब दिली. प्रत्यक्षात हे सरकार नापास आहे. ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफीची टिमकी मिरवली जात आहे, पण किचकट अटी लावून शेतकऱ्यांची घुसमट केली. आता निवडणुकीत भाजपचे उमेदवार मते मागायला आले की त्यांनाही बोला, "येताना रेशनकार्ड, आधारकार्ड, बायकोला घेऊन या.' एवढे आणल्यावर पण त्यांना सांगा, "आम्ही पाच वर्ष अभ्यास करू, त्यानंतरच मत द्यायचे का नाही, हे ठरवू.''

"दौंड तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात एमआयडीसी आहे, पण जर नातेवाइकांनाच सगळी कामे मिळणार असतील; तर तालुक्‍यातील तरुणांनी काय करायचे?'' असा टोला कोल्हे यांनी राहुल कुल यांचे नाव न घेता लगावला.
सक्षणा सलगर म्हणाल्या, ""राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश थोरात यांनी बॅंकेच्या माध्यमातून अनेकांना न्याय दिला आहे. जनता त्यांच्या पाठीशी ठाम उभी आहे. त्यामुळे दौंडच्या पारावर कितीही मारू द्या गप्पा, पण आमदार फिक्‍स आहे फक्त रमेश अप्पा.''

"भाजप सरकारचे कारनामे पाहून त्याच्यावर "भाजपची फसवाफसवी' असा चित्रपट काढला, तर तो नक्कीच हीट होईल,'' असा उपरोधात्मक टोलाही सक्षणा सलगर यांनी लगावला.

"कुल यांना संस्था चालवता येईना'

रमेश थोरात म्हणाले, ""राहुल कुल यांना कोणतीच संस्था धड चालविता आली नाही. त्यांच्याकडील दूध संघाचे दूध संकलन पूर्णतः घटले आहे. त्या ठिकाणी लोकांचे तीन- चार महिन्यांचे पगार नाहीत. कॉलेज काढले, ते बंद पडले. गावाची सहकारी संस्था पण बंद पडली. साखर कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढला. यांना कशातच यश आले नाही.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com