पारदर्शक पक्ष : भाजपने लाचखोर नेत्याच्या हाती दिली तिजोरी

...
पारदर्शक पक्ष : भाजपने लाचखोर नेत्याच्या हाती दिली तिजोरी

भाईंदर /मिरा रोड, ता. 28 (बातमीदार) ः मिरा-भाईंदर महापालिका अनेक घटनांनी चर्चेत राहत आली आहे. कालच माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असतानाच आज स्थायी समिती सभापतिपदी लाचखोर नगरसेवक अशोक तिवारी यांची निवड झाल्याने पुन्हा एकदा भाईंदरमध्ये भाजपचे "पार्टी विथ डिफ्रन्स' हे वेगळ्या अर्थाने सिद्ध झाले आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत आज भाजपचे नगरसेवक अशोक तिवारी विजयी झाले. तिवारी यांना यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे लाचखोराच्या हाती पालिकेची तिजोरी गेल्याने सर्वसामान्यांमध्ये आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. स्थायी सभापतीसाठी लाचप्रकरणी गुन्हा दाखल असलेले भाजपचे अशोक तिवारी व शिवसेनेचे कमलेश भोईर यांना उमेदवारी देण्यात आली होती; तर भाजपने आणखी एक दुसरा उमेदवार दिनेश जैन यांचाही उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

अखेरच्या क्षणी जैन यांनी आपला अर्ज मागे घेतला. पालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाचा कार्यकाळ काही दिवसांपूर्वी संपला होता. सभापती निवडणुकीसाठी आज (ता. 28) निवडणूक प्रक्रिया पार पडली.

स्थायी समितीत एकूण 16 सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे 10; तर महाविकास आघाडीचे 6 सदस्य आहेत. या निवडणुकीत शिवसेनेच्या अनिता पाटील गैरहजर राहिल्याने भाजपला 10; तर आघाडीच्या उमेदवाराला 5 मते मिळाली. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अशोक तिवारी यांची सभापतिपदी निवड झाली आहे.

गुंडांच्या यादीत नाव
अशोक तिवारी हे प्रभाग 1 चे समिती सभापती असताना तिवारी व प्रभाग अधिकारी सुनील यादव यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करू नये म्हणून दीड लाखांची लाच घेताना या दोघांना प्रभाग कार्यालयातच पकडण्यात आले होते. 2017 च्या पालिका निवडणुकीच्या दरम्यान तिवारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला होता.

तिवारी यांचे भाईंदर पोलिस ठाण्यातील टॉप 10 गुंड आरोपीच्या यादीमध्ये 1 नंबरवर नाव असल्याचे पत्रक लागलेले आहे. त्यामुळे अशोक तिवारी यांना भाजपने स्थायी समिती सभापतिपदी निवड केल्यामुळे लाचखोरांची निवड होत असेल, तर सामान्यांनी यावरून काय बोध घ्यावा, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

 महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन म्हणाले, ``देशभरात आपला पक्ष वेगळा असल्याचा डंका पिटणाऱ्या भाजपचे खरे रूप आता पुढे येत आहे. मिरा-भाईंदरमध्ये तर येथील नगरसेवक, माजी आमदार यांनी याबाबत पीएच.डी. केली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कोणावर खंडणी, मारामारी, लाच घेणे, बलात्कार असे गुन्हे दाखल झाले आहेत. या ठिकाणी जेवढे जास्त गुन्हे दाखल त्याला मोठे पद भाजप देत आहे.``

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com