नाशिक : गेले आठवडाभर नगरसेवकांतील नाराजीबाबत साप साप म्हणून भुई बडवत भाजपने स्थायी समिती सभापती निवडणूक अलगद खिशात घातली. विरोधी गटाचे इच्छुक 'मॅनेज' करत भाजपच्या गणेश गितेंच्या एकमेव अर्ज दाखल झाल्याने ते बिनविरोध सभापती झाले. यामध्ये आता विरोधी पक्ष खरी कुस्ती खेळतो की नुरा कुस्ती याची चर्चा सुरू झाली.
महापालिकेच्या तिजोरीचे कारभारी असलेल्या स्थायी समिती निवडणुकीत सुरवातीपासून विरोधक गार तर प्रमुख विरोधक शिवसेना थंडगार अशी स्थिती होती. महापौर सतीश कुलकर्णी यांनी संख्याबळाचे गणित बाजुला ठेवले. भाजपचे नऊ सदस्य नियुक्त केले. शिवसेनेचा एक सदस्य घटला. मात्र त्यावर आधी राज्य शासन व नंतर उच्च न्यायालयात गेल्याचे सांगत शिवसेना शांत राहिली.
महाविकास आघाडीने उमेदवार देणार नाही असे जाहीर केले. मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी अर्ज नेले. त्यावर सगळ्यांनी त्यांच्यावर भीस्त ठेवली. त्यात भाजपचे गिते व मनसेचे मुर्तडक यांच्यात साटेलोटे झाल्याची चर्चा सुरू झाली. यामध्ये आज शेवटच्या दिवशी दुपारी एक पर्यंत केवळ भाजपचे गणेश गिते यांचाच अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची निवड ही केवळ औपचारिकता राहीली आहे. गिते बिनविरोध सभापती होणार आहेत.

