शिवसेनेच्या विरोधात भाजपनेच बंडखोर उभे केले होते - भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे

खेड-आळंदी विधानसभा निवडणुकीत युतीकडून शिवसेनेचे सुरेश गोरे अधिकृत उमेदवार असताना भाजपचे तालुकाध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. याबाबत शिवसेनेने भाजपकडे नाराजी व्यक्त करीत देशमुख व त्यांना सोबत करणारे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
Party intentionally Fielded Rebel Against Shivena Candidate Suresh Gore in Khed Claims BJP District President Ganesh Bhegade
Party intentionally Fielded Rebel Against Shivena Candidate Suresh Gore in Khed Claims BJP District President Ganesh Bhegade

कडूस : 'विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून भाजपचे खेड तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांना पक्षानेच निवडणूक लढवायला सांगितली होती. त्याच वेळेस त्यांचा उल्लेख भाजपचे अधिकृत बंडखोर उमेदवार म्हणून करायला पाहिजे होता. पण हा उल्लेख न करणे ही चूकच ठरली,'' असा गौप्यस्फोट भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी चांडोली (ता.खेड) येथे केला. खुद्द भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यामुळे विधानसभा निवडणुकीतील युतीमधील बेबनाव निवडणुकीनंतर तीन महिन्यांनी प्रथमच उघड झाला आहे. 

खेड-आळंदी विधानसभा निवडणुकीत युतीकडून शिवसेनेचे सुरेश गोरे अधिकृत उमेदवार असताना भाजपचे तालुकाध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. याबाबत शिवसेनेने भाजपकडे नाराजी व्यक्त करीत देशमुख व त्यांना सोबत करणारे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. भाजपकडून कारवाईचे संकेत देण्यात आले होते. परंतु पक्षाची ही कारवाई लुटुपुटूची होती, याचा निर्वाळा जिल्हाध्यक्ष भेगडे यांच्या व्यक्तव्यावरून उघड झाला. 

राज्यात ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार होते, त्याठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्याने निवडणूक लढवली त्यांना भाजपनेच बंडखोरी करायला लावली हे आता पक्षाच्या जिल्हाध्यक्षानेच जाहीर सांगितल्याने विधानसभा निवडणुकीमधील युतीतील बेबनाव समोर आला आहे. खेड तालुक्याच्या संघटनात्मक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेगडे यांनी शनिवारी (ता.28) खेड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अॅड.सचिन सदावर्ते, पांडुरंग ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, दिलीप मेदगे, राजगुरूनगरचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, सचिन लांडगे, संजय रौधंळ, विष्णूपंत बोऱ्हाडे, रामदास मेदनकर, राहुल गवारे, संदीप सोमवंशी यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खेड तालुक्याच्या अध्यक्षपदी पुन्हा अतुल देशमुख यांची तर चाकण शहराध्यक्षपदी अजय जमदाडे व कार्याध्यक्षपदी अमोल घाडगे यांची सर्वानुमते निवड झाल्याची घोषणा भेगडे यांनी केली. 

भेगडे यांनी प्रामुख्याने शिवसेना व राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, ''मित्र पक्षाने धोका दिल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. महाविकास आघाडी झाली खरी, पण हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. यांचे आताच पटत नाही. तालुक्यातच बघा. कोल्हे, आढळराव, मोहिते आणि गोरे कधी एकत्र बसणार आहेत का? त्यामुळे कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागा. इथून पुढच्या प्रत्येक निवडणुकीत भाजप हाच तालुक्यात क्रमांक एकचा पक्ष झाला पाहिजे.'' 

अतुल देशमुख म्हणाले, ''आमदारकीची निवडणूक मी 22 दिवसात लढवली, मला पक्षानेच निवडणूक लढवायला सांगितली होती. पण हे जसे आता सांगितले जाते, तेच निवडणुकीच्या वेळी ठामपणे सांगितले असते, तर चित्र वेगळे दिसले असते.'

'               

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com