भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीला येणार उधाण 

BJP Logo
BJP Logo

अकोला : महापालिकेच्या फेब्रुवारीत होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे धुमशान जोरात सुरू आहे. सत्ताधारी भाजपने या निवडणुकीत शिवसेनेशी युती न करता 'एकला चलो रे'चा नारा दिल्यावर वीसही प्रभागांतील काही विद्यमान आणि इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, तिकीटवाटपावरून भाजपमधील अंतर्गत गटबाजीला उधाण येणार आहे. या निवडणुकीत भाजपचे खासदार संजय धोत्रे गट पालकमंत्री डॉ. रणजित पाटील गटाला वरचढ ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या भाजपमध्ये गत काही वर्षांपासून नेत्यांमधील अंतर्गत मतभेदामुळे पक्षाची दोन शकले पडली आहेत. खासदार संजय धोत्रे यांनी ग्रामीण भागासह शहरात पक्ष संघटन मजबूत करून जिल्ह्याच्या राजकारणावर वरचष्मा कायम ठेवला. ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांनी धोत्रेंच्या मार्गदर्शनात पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. राज्यात भाजपची सत्ता आल्यावर मंत्रिपदावर वर्णी लागलेले डॉ. रणजित पाटील यांनीही पक्षापासून दुरावलेल्या काही नेते व पदाधिकाऱ्यांना पुन्हा पक्षात आणत आपली वेगळी फळी तयार केली.

जिल्ह्याच्या राजकारणात सध्या खासदार धोत्रे आणि पालकमंत्री डॉ. पाटील असे भाजपअंतर्गत दोन गट सक्रिय असून दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. पक्षाची बैठक असो की कोणताही जाहीर कार्यक्रम, एकमेकांचे उणे-दुणे काढण्यात दोन्ही नेते कोणतीच कसर ठेवत नाहीत, त्यामुळे पक्षांतर्गत वाढलेले कुरघोडीचे राजकारण आगामी महापालिकेच्या निवडणुकीत वाढणार असल्याचे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे.

महापालिकेत सत्ताधारी असलेला भाजप ही निवडणूक स्वबळावर लढणार आहे. त्यादृष्टीने प्रभागनिहाय जोमाने तयारीही सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नुकतेच महापालिका निवडणूक समितीचे प्रमुख म्हणून खासदार संजय धोत्रे, सहप्रमुख म्हणून आमदार गोवर्धन शर्मा यांची निवड केली. त्यामुळे तिकीटवाटपात धोत्रे गटाकडून पालकमंत्री गटाच्या काही विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांना तिकीट देण्यावरून आढेवेढे घेतले जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे बरेच इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पक्षांतर्गत सध्या अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू असून, निवडणूक समितीकडून इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम झाल्यानंतरच भाजपच्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

गटबाजीचा फायदा शिवसेनेला भाजपमधील वाढलेल्या गटबाजीचा फायदा शिवसेना उचलण्याच्या तयारीत असून, त्या प्रभागात शिवसेनेकडून सक्षम उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. डॉ. पाटील गटाच्या समजल्या जाणाऱ्या महापौर उज्ज्वला देशमुख, नगरसेवक आशिष पवित्रकार, माजी नगरसेवक डॉ. किशोर मालोकार यांच्यासह काही इच्छुक उमेदवार आगामी महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा उतरण्याची शक्‍यता आहे. मात्र, पक्षांतर्गत नाराजी आणि कलहाचा फटका काही नगरसेवकांना बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com