BJP UP election Narendra Modi Amit Shah | Sarkarnama

यूपीच्या अखेरच्या टप्प्यात भाजपचा ध्रुवीकरणावर जोर 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 मार्च 2017

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या आणि सातव्या, या अखेरच्या दोन टप्प्यांत भाजपने ध्रुवीकरणावर जोर देतानाच प्रचाराचे तंत्र आमूलाग्र बदलले आहे. स्वतः पंतप्रधानांनीच 'जेथे कबरस्तान तेथे स्मशान' यांसारखी वक्तव्ये करून ध्रुवीकरणाबाबत ग्रीन सिग्नल दिल्याची भावना भाजप नेत्यांत आहे. भाजप नेतृत्वाने गोरखपूरसह पूर्वांचलातील या दोन्ही टप्प्यांच्या प्रचारात हिंदूबहुल गावे व वस्त्यांत जाऊन आक्रमक प्रचार करण्याची जबाबदारी विशिष्ट नेत्यांना दिल्याची माहिती आहे. 

सहाव्या टप्प्यातील 49 मतदारसंघांत समाजवादी पक्षाचे बलस्थान असलेल्या सुमारे 30 हिंदूबहुल मतदारसंघांवर 'विशेष लक्ष' केंद्रित करण्याच्याही सूचना भाजप नेत्यांना दिल्या गेल्या आहेत. या टप्प्यात भाजप आमदारांची संख्या तीनवरून 30 पर्यंत नेण्याचा पक्षनेतृत्वाचा निर्धार आहे. 

योगी आदित्यनाथ, साक्षी महाराज, संगीत सोम व सुरेश राणा यांच्यासारख्या वादग्रस्त नेत्यांवर ध्रुवीकरणाला हवा देण्याची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. त्यांच्याकडे गोरखपूर, महाराजगंज, कुशीनगर, मऊ आदी भाग वाटून दिले गेले आहेत. एका मुस्लिम नेत्यालाही पुनरुज्जीवनाचे गाजर दाखवून प्रचारात उतरविण्यात आले आहे. भाजपच्या एका नेत्याच्या म्हणण्यानुसार भाजपला या दोन टप्प्यांतच 2014 च्या भरघोस मतांवरील बोनस मिळण्याची शक्‍यता आहे व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यादृष्टीनेच प्रचाराची सारी आखणी केली आहे. या तिघांची प्रत्येक छोटी सभा 'जय श्रीराम'च्या आक्रमक घोषणांनी दणाणून जाते, असेही निरीक्षण मांडले जाते.

सहाव्या व सातव्या टप्प्यात बिहारला लागून असलेल्या भागांत मतदान होणार आहे. भाजपने बुरखा घालून बोगस मतदान होत असल्याचा मुद्दा याआधीच तापविला आहे. त्यापाठोपाठ आता ध्रुवीकरणावरच पक्षाच्या प्रचाराचा सारा जोर राहणार असल्याचे या नेत्याचे म्हणणे आहे. विकासाच्या गोष्टी करणाऱ्या बड्या नेत्यांच्या प्रचार सभांपेक्षाही भाजप नेतृत्वाला अशा छोट्या छोट्या प्रचारफेऱ्या व सभा यांच्याकडूनच विशेष अपेक्षा असल्याचे सांगितले जाते. भाजपमधील सर्व बड्या नेत्यांचा तळ सध्या वाराणसीत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख