औरंगाबाद महापालिकेत भाजप नगरसेवक "1680' लिहिलेल्या टोप्या घालून आले....

औरंगाबाद महापालिकेत भाजप नगरसेवक "1680' लिहिलेल्या टोप्या घालून आले....

औरंगाबाद : शहरातील 1680 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेवरून महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना विरुध्द भाजप यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुर केलेल्या पाणीपुरवठा योजनेला महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आताचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सूडबुध्दीने स्थगिती दिल्याचा आरोप करत भाजपने शिवसेनेच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. योजनेला स्थगिती नव्हती याचा खुलासा नगरविकास विभागाने केल्यावरही भाजपचे समाधान झालेले नाही. त्यामुळे आजच्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवकांनी "1680' लिहलेल्या टोप्या घालून महापौरांना जाब विचारला. 

सहा महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत असूनही मुख्यमंत्री पदाच्या मागणीवरून शिवसेनेने वेगळी चूल मांडत महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री पद मिळवले. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपने राज्य आणि स्थानिक पातळीवर शिवसेना विरोध अधिकच तीव्र केला. 

महापालिकेच्या सत्तेतील करारानूसार शेवटची अडीच वर्ष महापौरपद शिवसेनेकडे राहणार हे लक्षात आल्यावरच भाजपकडून शहरातील कचराकोंडीला खतपाणी घालण्यात आल्याचे सांगितले जाते. महापौर नंदकुमार घोडले आणि शिवसेना या अभूतपूर्व कचराकोंडीने चांगलीच अडचणीत आली होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना त्यासाठी शहरवासियांची माफी देखील मागावी लागली होती. त्यामुळे राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असतांना देखील शहरात भाजप-शिवसेनेने एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नव्हती हे गेल्या चार-साडेचार वर्षात अनेकदा समोर आले होते. 

पाणीपुरवठा योजनेच्या श्रेयासाठी आटापिटा.. 
औंरगाबाद शहरातील पाण्याचा प्रश्‍न गंभीर असल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या सहा महिने आधी तत्कालीन राज्यमंत्री अतुल सावे यांनी राज्य सरकारकडून 1680 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजुर करून आणली. अर्थात युतीचे सरकार असल्यामुळे योजना मंजुर करण्यात शिवसेनेचाही हातभार होता असा दावा केला गेला, मात्र भाजपने तो वेळोवेळी फेटाळला. 

आता भाजप विरोधी पक्षात आणि शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने सत्तेत आहे. या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या काळातील अनेक योजनांना स्थगिती दिली, त्यात औरंगाबादच्या पाणीपुरवठा योजनेचा देखील समावेश होता असा आरोप भाजपने केला होता. शिवसेनेने योजनेला स्थगिती दिली नाही असे वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. शेवटी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह जिल्ह्यातील आमदार आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर गाठत नगरविकास खात्याकडून लेखी पत्र आणत योजनेला स्थगिती नसल्याचे ठासून सांगितले. मात्र भाजपने या पत्रावर आक्षेप घेत आमच्याकडे स्थगिती दिल्याचे पुरावे आहेत, तसे तुमच्याकडे योजनेला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली नव्हती याचे पुरावे असतील तर ते सादर करा असे आव्हान सर्वसाधारण सभेत दिले. त्यामुळे महापालिकेत पुन्हा एकदा शिवसेना-भाजप नगरसेवक आमने-सामने आले. 

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात भाजपच्या आमदारांनी "मी सावरकर' अशी अक्षरे लिहलेल्या टोप्या घालून सरकारचा विरोध केला. तर इकडे महापालिकेत "1680' लिहिलेल्या टोप्या घालत भाजप नगरसेवकांनी शिवसेनेला जाब विचारला. एकंदरीत शहारसाठी पाणीपुरवठा योजना आणल्याचे श्रेय कुठल्याही परिस्थीतीत शिवसेनेला मिळू नये, उलट दिलेल्या स्थगितीमुळे ते कसे जनतेच्या विरोधात आहेत हेच बिंबवण्याचा प्रयत्न भाजपकडून सोयीस्कररित्या सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com