पुण्याचा भाजप नगरसेवक 'मनसे' विसरेना; IAS अधिकाऱ्याला शिवीगाळ

आपल्या प्रभागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या योजनेचे ५० लाख रुपये रोखल्याने प्रचंड चिडलेल्या भाजपचे नगरसेवक राजेश बराटे यांनी ‘मनसे’ स्टाइल ने महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी धिंगाणा घातला
BJP Corporator Rajesh Barate Cursed IAS officer
BJP Corporator Rajesh Barate Cursed IAS officer

पुणे : आपल्या प्रभागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या योजनेचे ५० लाख रुपये रोखल्याने प्रचंड चिडलेल्या भाजपचे नगरसेवक राजेश बराटे यांनी ‘मनसे’ स्टाइल ने महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी धिंगाणा घातला. ‘माझ्या प्रभागातील योजना का अडविता? याचा जाब विचारत बराटे यांनी थेट अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांच्याशी वाद घातला. एवढंच नाही तर बराटेंनी गोयल यांना शिवीगाळही केली. 

बराटेंचा रुद्रावतार पाहून स्थायीच्या बैठकीत गोंधळ माजला आणि अधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकून बैठकीतून काढता पाय घेतला. "मी शिवीगाळ केली नाही. मात्र महिलांच्या सुरक्षिततेसाठी आखलेल्या योजनेला विरोध केल्याने मी आक्रमक झालो,'' असा खुलासा करीत गोयलांना शिवीगाळ केली नसल्याचे बराटे यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे बराटेंची चूक आहे. त्यांनी माफी मागावी अशी मागणी महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे. 

हापालिकेच्या स्थायी समितीची बैठक मंगळवारी सकाळी सुरू झाली, तेंव्हा नगरसेवक आणि प्रशासनाचे अधिकारी यांच्यात चर्चा  सुरू असताना बराटे तेथे आले आणि माझ्या प्रभागातील योजना का रोखली, असा प्रश्‍न प्रश्‍न त्यांनी पदाधिकारी आणि प्रशासनाला विचारला. त्यावर गोयल यांनी खुलासा केला. मात्र तो समाधानकारक नसल्याचे सांगत बराटे यांनी संताप व्यक्त केला. त्या पलीकडे जाऊन नगरसेवकांची कामे अडविणारे अधिकारी पुणे महापालिकेत नकोच असा आग्रह धरत बराटेंनी वाद घालायला सुरवात केली. 

आपली योजना मंजूर व्हावी यावर ठाम असलेल्या बराटेंनी थेट गोयल यांना लक्ष केले आणि त्यांच्यावर आगपाखड केली. त्यातून वाद वाढला आणि बराटेंनी शिवीगाळीला सुरवात केली. त्यानंतर क्षणभरातच अधिकारी बैठकीतून बाहेर पडले. 

कर्वेनगरमधून बराटे हे तिसऱ्यांदा नगरसेवक झाले आहे. या आधी ते दोनदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले. निवडणुकीनंतर पहिल्याच वर्षी ते स्थायी समितीचे सदस्य झाले. तेव्हापासून बराटे हे महापालिकेत आक्रमक पवित्रा घेत राहिले. 

शिस्त असलेल्या भाजपमध्ये आलेले बराटे अजूनही 'मनसे'स्टाईलनेच महापालिकेत वागतात. स्वतःसह मित्र असलेल्या नगरसेवकांच्या योजना अडविल्या गेल्या तर बराटे आक्रस्ताळेपणा करतात आणि आपल्या योजना मार्गी लावून घेतात. आपल्या प्रभागातील एका योजनेला तत्कालीन विरोधीपक्ष नेत्यांनी विरोध केला होता. तेंव्हाही बराटेंनी थेट सर्वसाधारण सभेतच दमबाजी केली होती. मात्र, या प्रकरणाचा त्यांनी गाजावाजा होऊ दिला नव्हता, प्रथम दर्शनी शांत, प्रेमळ वाटणारे अचानक इतके आक्रमक का होतात, हा महापालिका वर्तुळातील चर्चेचा विषय ठरला आहे. 

या घटनेबद्दल बराटे म्हणाले, ''महापालिकेच्या राजकारणात पंधरा वर्षे आहे. तरीही गेल्या दोन महिन्यांपासून माझ्या योजना थांबविल्या जातात. माझ्या प्रभागात मोठी कॉलेज विद्यार्थीनींची संख्या काही हजारांच्या घरात आहे. तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी सिसिटीव्ही कॅमेरे आवश्‍यक आहेत. पण तोच निधी रोखला आहे. त्याचा मी जाब विचारला आहे. मी कोणालाही शिवीगाळ केलेली नाही.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com