BJP corporaters forget Guardian minister But Shivsena corporator prints his photo | Sarkarnama

भाजपच्या फ्लेक्सवरून गायब झालेले पालकमंत्री शिवसेनेच्या  फ्लेक्सवर !

मनोज भिवगडे 
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

मात्र, भाजपचेच पालकमंत्री व ज्या खात्याने विकास निधी मंजूर केला त्या खात्याचे राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील किंवा भाजपच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही नेत्याचा फोटो नसल्याने ही बाब अकोल्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

अकोला  :  भारतीय जनता पक्षाच्या अकोल्यातील स्थानिक नेत्यांमधील वाद संपुष्टात यावा म्हणून थेट मुख्यमंत्रीच पुढाकार घेत आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर खासदार विरुद्ध पालकमंत्री असे चित्र बदलण्याचे नाव नाही.

त्यातूनच विकास निधीच्या श्रेयसाठी अकोल्यात सुरू असलेल्या पोस्टरबाजीमध्ये भाजपच्या फ्लेक्सवरून पालकमंत्री गायब आहेत, तर शिवसेनेच्या नगरसेवकाने पालकमंत्र्यांच्या आभाराचे फ्लेक्स लावून भाजपच्याच नगरसेवकांना चपराक दिली आहे. 

अकोला जिल्ह्यात भाजपमधील अंतर्गत कुरघोडीचे राजकारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांनाच माहिती आहे. त्यातूनच खासदार संजय धोत्रे आणि पालकमंत्री डॉ. रणजित पाटील अशी उभी फुट भाजपमध्ये पडली आहे. हा वाद मिटावा म्हणून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पुढाकार घेतला होता. खासदार धोत्रे यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद दिले. त्यानंतर हा वाद मिटेल अशी चिन्ह होती. 

मात्र, अलिकडेच विकास निधीवरून शहरात झळकलेले पोस्टर खासदार-पालकमंत्री वाद मिटला नसल्याचे स्पष्ट करते. भाजपच्या नगरसेवकांनी गाैरक्षण रोडच्या विकास कामासाठी आमदार गोवर्धन शर्मा यांनी 18 कोटी रुपये मिळवून दिल्याबाबत आभार व्यक्त करणारे फ्लेक्स लावण्यात आले. यात आमदार शर्मा यांच्या फोटोसह खासदार धोत्रे, आमदार रणधिर सावरकर, भाजप महानगराध्यक्ष किरोश मांगटे पाटील आणि महापाैर विजय अग्रवाल यांच्यासह पाच नगरसेवक आणि नगरसेविकांचे छायाचित्र आहे. 

मात्र, भाजपचेच पालकमंत्री व ज्या खात्याने विकास निधी मंजूर केला त्या खात्याचे राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील किंवा भाजपच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही नेत्याचा फोटो नसल्याने ही बाब अकोल्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचवेळी शिवसेनेचे नगरसेवक मंगेश काळे यांनी दीड  कोटीचा विकास निधी उपलब्ध करून दिल्याबाबत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे फ्लेक्स लावून आभार व्यक्त केले आहे. एकीकडे स्वपक्षाच्या नगरसेवकांनाच पालकमंत्र्यांचा फोटो वापरावासा वाटत नसताना शिवसेनेच्या नगरसेवकाने मात्र जाहीरपणे आभार माणून दाखविलेल्या मोठे पणा भाजपच्या नगरसेवकांसाठी डोळ्यात अंजन घालणारे ठरत असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख