अचलपूर आणि बडनेरा ताब्यात घेण्यासाठी भाजप दक्ष

अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा पराभव पचवलेल्या भाजपला महाजनादेश यात्रेनिमित्ताने चांगलीच ऊर्जा मिळाली आहे. जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघात येतात. तेथे भाजपचा खासदार आहे. अशा स्थितीत अमरावती जिल्ह्यातील आठही मतदारसंघ काबीज करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. मात्र काही मतदारसंघात भाजपला चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.
अचलपूर आणि बडनेरा ताब्यात घेण्यासाठी भाजप दक्ष

अमरावती : अमरावती जिल्ह्यात मेळघाट, दर्यापूर, मोर्शी आणि अमरावती या चार मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार आहेत. अचलपूर व बडनेरा मतदारसंघांवर अपक्ष आमदारांचा दबदबा आहे, तर तिवसा व धामणगावरेल्वे या दोन मतदारसंघांत कॉंग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे दोन अपक्ष आणि कॉंग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ आपल्या ताब्यात यावेत, याची रणनीती भाजपने आखली आहे. त्या दृष्टीने हालचालींनी वेग घेतलाय. भाजपच्या महाजनादेश यात्रेला गुरुकुंज मोझरी येथून सुरुवात करण्याचासुद्धा तोच उद्देश असल्याचे बोलले जाते.

गुरुकुंज मोझरी ज्या विधानसभा क्षेत्रात येते, तो तिवसा मतदारसंघ कॉंग्रेसच्या राज्य उपाध्यक्ष व राहुल ब्रिगेडच्या खंद्या कार्यकर्त्या ऍड. यशोमती ठाकूर यांचा आहे. त्यामुळे हा गड जिंकण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे आहे. धामणगावरेल्वे मतदारसंघात नांदगावखंडेश्‍वर, चांदूररेल्वे व धामणगावरेल्वे अशा तीन तालुक्‍यांचा समावेश असून, येथे कॉंग्रेसचे आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांची एकहाती सत्ता आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड हे त्यांचा मुलगा नगराध्यक्ष प्रताप अडसड यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नरत आहेत. दुसरीकडे विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे हेसुद्धा येथे फिल्डिंग लावत आहेत.

अचलपूर मतदारसंघातून तीनदा निवडून आलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यंदा चौथ्यांदा रिंगणात राहतील. कॉंग्रेसचे बबलू देशमुख परत त्यांना आव्हान देतील. भाजपमध्येही अनेक इच्छुक आहेत. या मतदारसंघातून रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनीही लढण्याची घोषणा चालवली आहे. बडनेरा मतदारसंघात आमदार रवी राणा तिसऱ्यांदा रिंगणात उतरत आहेत. लोकसभा निवडणुकीत ते कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत होते. या वेळी त्यांची रणनीती काय, याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिवसेनेचे नेते स्व. संजय बंड यांच्या पत्नी शिवसेनेकडून येथून उमेदवारी करण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटेसुद्धा तयारीत आहेत. भाजपकडूनही इच्छुकांची यादी मोठी आहेच. 

मोर्शी-वरुड मतदारसंघात राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे आणि श्रीशिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्यात लढतीची शक्‍यता आहे. मेळघाटात प्रभुदास भिलावेकर यांना बदलण्याची शक्‍यता आहे. त्यांच्याऐवजी रमेश मावसकर या नव्या उमेदवाराला संधी मिळू शकते. कॉंग्रेसचे केवलराम काळे परत रिंगणात राहतीलच. यासोबतच माजी आमदार राजकुमार पटेलांचीही तयारी आहे. 

दर्यापूर मतदारसंघात गतवेळी भाजपचे रमेश बुंदिले यांनी मैदान मारले होते. या वेळी पिंपरी- चिंचवडच्या नगरसेविका सीमा सावळे यांनीही या मतदारसंघात जनसंपर्क वाढविल्याने उत्सुकता आहे. अमरावतीत भाजपचे डॉ. सुनील देशमुख, कॉंग्रेसचे रावसाहेब शेखावत किंवा राष्ट्रवादीच्या माजी आमदार सुलभा संजय खोडके यांच्यातच लढत होण्याची शक्‍यता आहे. 

युती, आघाडीचे मतदारसंघ 
भाजप, शिवसेना युतीत अमरावती, मेळघाट, तिवसा, धामणगावरेल्वे, मोर्शी हे मतदारसंघ भाजपसाठी असून, अचलपूर, दर्यापूर, बडनेरा हे शिवसेनेसाठी सुटले आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत अमरावती, तिवसा, धामणगावरेल्वे, मेळघाट, अचलपूर आणि दर्यापूर हे कॉंग्रेसच्या कोट्यात, तर बडनेरा, मोर्शी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यात आहेत. 

वंचित आघाडीची तयारी 
लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने अमरावतीत उमेदवार दिला होता, मात्र त्याला अतिशय कमी मते मिळाल्याने विधानसभा निवडणुकीत ही आघाडी फारसा प्रभाव दाखवेल, असे सध्यातरी जिल्ह्यात चित्र नाही. बसपलासुद्धा नाममात्र मते मिळाल्याने किती मतदारसंघात आपले उमेदवार उभे करेल, हे अद्यापही निश्‍चित नाही. 

चौकट 

2009, 2014 मधील विजयी उमेदवार, त्यांना मिळालेली मते आणि 2019 मधील लोकसभा निवडणुकीतील मते 

(मतदारसंघ, आमदार, पक्ष, मिळालेली मते, 2019 मध्ये आघाडी घेणाऱ्या पक्षाची मते) 

अमरावती ः रावसाहेब शेखावत (कॉंग्रेस) 61,331; डॉ. सुनील देशमुख (भाजप) 84,033; अपक्ष (आघाडी) 96,644 

बडनेरा ः रवी राणा (अपक्ष) 73,031; रवी राणा (अपक्ष) 46,827; शिवसेना 86,439 

तिवसा ः ऍड. यशोमती ठाकूर (कॉंग्रेस) 73,054; ऍड. यशोमती ठाकूर (कॉंग्रेस) 58,808; अपक्ष (आघाडी) 76,547 

मोर्शी ः डॉ. अनिल बोंडे (अपक्ष) 43,905; डॉ. अनिल बोंडे (भाजप) 71,611; भाजप 1,06,450 

धामणगावरेल्वे ः प्रा. वीरेंद्र जगताप (कॉंग्रेस) 72,755; प्रा. वीरेंद्र जगताप (कॉंग्रेस) 70,879; भाजप 94,479 

अचलपूर ः बच्चू कडू (अपक्ष) 60,627; बच्चू कडू (अपक्ष) 59,234; शिवसेना 85,678 

दर्यापूर ः अभिजित अडसूळ (शिवसेना) 40,606; रमेश बुंदिले (भाजप) 64,224; अपक्ष (आघाडी) 89,797 

मेळघाट ः केवलराम काळे (कॉंग्रेस) 63,619; प्रभुदास भिलावेकर (भाजप) 57,002; अपक्ष (आघाडी) 91,008
............................. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com