BJP Candidate Ramesh Adaskar gaining ground | Sarkarnama

आडसकरांची टॅगलाईन : समर्थकांसाठी माणूस हक्काचा तर विरोधकांसाठी ‘हाबाडा’

दत्ता देशमुख 
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

दिवंगत लोकनेते बाबूराव आडसकर यांच्याप्रमाणेच ग्रामीण लकब आणि साधेपणा असलेले रमेशराव आडसकर यांची सामान्यांत मिसळण्याची, आपुलकीने बोलण्याची आणि वैयक्तीक वा सार्वजनिक प्रश्नाचा जागेवरच निकाल लावण्याची पद्धत आहे. त्यामुळे सामान्यांना ते आपलेसे वाटतात.

माजलगाव : माजलगाव मतदार संघात रमेश आडसकरांमधील हाच गुण मतदारांना  भावत आहे. भाजपच्या मंडळींना आपलेसे वाटणारे रमेश आडसकर विरोधकांबाबतही वडिलांसारखेच कठोर आहेत. म्हणूनच त्यांच्या समर्थकांनी प्रचारात विरोधकांसाठी ‘हाबाडा’ आणि समर्थकांसाठी ‘माणूस हक्काचा‘, ‘माणूस जिवाभावाचा’ ही टॅगलाईन पक्की केली आहे.

रमेश आडसकरांनी मतदार संघात एंट्री करताना पक्षातील कोणी दुखावणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली. अगदी भाजपकडून उमेदवारीसाठी स्पर्धा असतानाही ‘भाजपची ज्याला उमेदवारी मिळेल, त्याचा प्रचार करु’ असे ते म्हणत. त्यांनी गटातटांबाबतही कधी दुजाभाव केला नाही वा कोणावर दडपण टाकले नाही. अगदी उमेदवारी घोषीत होण्यापूर्वी संपर्क दौऱ्यात कोणाच्या शेतात, कोणाच्या गोठ्यात आणि कोणाच्या झोपडीत जाताना कधी आडेवेडे घेतले नाही. 

त्यांनी एंट्रीपूर्वीच मतदार संघातील माजी आमदार मोहनराव सोळंके, माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, माजी आमदार आणि गोपीनाथराव मुंडे, राजाभाऊ मुंडे, नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी या नेत्यांशी तर त्यांची जवळीक होतीच. परंतु, त्यांनी या मंडळींच्या कार्यक्षेत्रात कधीही हस्तक्षेप केला नाही त्यामुळे ही मंडळी आता जीव तोडून प्रचारात उतरली आहे. 

माजलगावात एंट्री केल्यानंतर अरुण राऊत, माजी नगराध्यक्ष डॉ. तिडके यांच्या साथीने त्यांनी संपर्क सुरु केला. उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर स्पर्धक मोहनराव जगताप यांना विधान परिषद आमदारकीचे संकेत खुद्द पंकजा मुंडेंनी दिल्याने त्यांची यंत्रणाही कामाला लागली. दरम्यान, त्यांनी आमदार आर. टी. देशमुख यांच्या यंत्रणेत कधी कुठला हस्तक्षेप केला नाही वा त्यांच्याविषयी वेगळे वक्तव्यही केले नाही. त्यामुळे उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचीही टीम जोमाने मैदानात उतरली. 

दरम्यान, मतदार संघाची रचना भाजप पुरक आणि पंकजा मुंडेंना मानणारा वर्ग मतदार संघात अधिक असणे हे तर त्यांच्या फायद्याचे आहेच. शिवाय मतदार संघातील माजलगाव, धारुर व वडवणी तालुक्यात एकाच वेळी तिन्ही ठिकाणी यंत्रणा कार्यान्वित असावे असे नियोजन केले आहे. त्यामुळे स्वत: रमेश आडसकर एका तालुक्यात असले तरी पत्नी अर्चना आडसकर यांचा ताफा दुसऱ्या आणि पुतणे ऋषीकेश आडसकर यांचा ताफा तिसऱ्या असे तिन्ही तालुके एकाच वेळी कव्हर करत आहेत. 

विशेष म्हणजे त्यांच्यासोबत नवे - जुने सर्वच मिसळत आहे. प्रचार करताना ‘माणूस आपल्या हक्काचा, माणूस जिवाभावाचा’ ही टॅगलाईन वापरत विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धोरणे आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून झालेला विकास हाच प्रचार ते करत आहेत. विरोधकांना उत्तरे देण्याऐवजी त्यांच्या तंबूतील एकेक शिलेदार फोडून ते थेट ‘हाबाडा’च देत आहेत.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख