शिवसेनेच्या वैजापूरमधून भाजपच्या दिनेश परदेशींची मोर्चेबांधणी ?

शिवसेनेच्या वैजापूरमधून भाजपच्या दिनेश परदेशींची मोर्चेबांधणी ?

औरंगाबाद : शिवसेना- भाजप या दोन्ही पक्षातील मेगाभरतीचा फटका आता त्याच पक्षांना बसतो की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. युतीमध्ये जर एखादा मतदारसंघ मित्रपक्षाकडे असेल तर त्या पक्षात उडी घेऊन निवडणूक लढवण्याची तयारी अनेक इच्छूक करत आहेत. यापैकी एक मतदारसंघ म्हणजे औंरगाबाद जिल्ह्यातील वैजापूर. कॉंग्रेसमधून भाजप आणि आता शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असलेले डॉ. दिनेश परदेशी यांची चर्चा सध्या तालुक्‍यात चर्चेचा विषय ठरत आहे. युतीमध्ये वैजापूर शिवसेनेकडे असल्याने परदेशी यांनी शिवसेनेत प्रवेश मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. परदेशी यांच्या मुंबईच्या वाऱ्या आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या वाढत्या भेटीगाठींमुळे शिवसेना इच्छूकांच्या मात्र पोटात गोळा उठला आहे. 

आतापर्यंत झालेल्या सहापैकी तीन विधानसभा निवडणुकीत वैजापूरमधून शिवसेनेचे आर.एम. वाणी निवडून आले होते. दोनवेळा कॉंग्रेसचे रामकृष्णबाबा व कैलास पाटील यांनी तर गेल्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी वैजापूरमध्ये विजय मिळवला होता. वर्षभरापुर्वी झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत तालुक्‍यातील राजकीय समीकरणे बदलली. कॉंग्रेसच्या ताब्यात असलेली नगरपालिका भाजपने काबीज केली. तत्कालीन कॉंग्रेसचे नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी आपल्या पत्नीसह भाजपमध्ये प्रवेश होता. त्यामुळे नगरपालिकेत सत्तांतर झाले आणि परदेशी यांनी आपल्या पत्नी शिल्पा यांना नगराध्यक्ष केले. 

पत्नी नगराध्यक्ष असल्यामुळे डॉ. परदेशी यांना आता आमदार व्हायचे आहे. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसकडून लढतांना परदेशी यांनी 41 हजाराहून अधिक मते घेतली होती. पण मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे परदेशी यांची अडचण होत आहे. यावर तालुक्‍यातील त्यांच्या हितचिंतकांनी परदेशी यांना थेट शिवसेनेत प्रवेश घेऊन उमेदवारी मिळवण्याचा सल्ला दिल्याची चर्चा आहे. ज्यांच्या सल्ल्याने परदेशी यांनी तालुक्‍यात गेली अनेक वर्ष राजकारण केले, त्यांनीच हा पर्याय सुचवल्याने परदेशी यांनी देखील जोर लावला आहे. 

गेल्या दहा दिवसांपासून परदेशी मुंबईत ठाण मांडून बसले होते. शिवसेनेच्या मंत्र्यांमार्फत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट आणि उमेदवारीचा शब्द मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. आजपासून मराठवाड्यातील शिवसेना इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत सुरू आहेत. उद्या औरंगाबाद जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. आता परदेशी प्रत्यक्ष मुलाखतीला जातात ? की मग त्यांची मागणी पक्षनेतृत्वाकडे आधीच नोंदवली गेली आहे हे लवकरच स्पष्ट होईल. 

वाणींचा आशिर्वाद महत्वाचा 
वैजापूर विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार नाही असे माजी आमदार आर.एम.वाणी यांनी आधीच स्पष्ट केले आहे. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला असून तसे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना कळवले आहे. तालुक्‍यात आपलाच शब्द प्रमाण मानला जावा ही इच्छा ते बाळगून आहेत. पंधरा वर्षापासून तालुका प्रमुख म्हणून कार्यरत असणारे प्रा. रमेश बोरनारे यांच्या नावाची शिफारस वाणी यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. आता डॉ. दिनेश परदेशी यांच्या शिवसेना प्रवेशाच्या शक्‍यतेमुळे ते आपले वजन कुणाच्या पारड्यात टाकतात याकडे संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागून आहे. परदेशी, वाणी जरी वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांचे तालुक्‍यातील राजकारण समन्वयाने चालते हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिवसेनेची उमेदवारी पदरात पाडून घ्यायची असेल तर वाणींचा आशीर्वाद इच्छूक उमेदवाराला महत्वाचा ठरणार आहे. या शिवाय बोरनारे, प्रकाश चव्हाण, आसाराम रोठे यांनी देखील पक्षाकडे उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. 

एवढेच नाही तर परदेशी भाजपसाठी हा मतदारसंघ सोडवून घेण्यासाठी देखील प्रयत्नशील असल्याचे बोलले जाते. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचा झालेला पराभव या सबबीवर वैजापूर भाजपला सोडावे अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी देखील पक्षश्रेष्ठींकडे लावून धरल्याचे समजते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com