महाशिवआघाडी प्रत्यक्षात आल्यावर भाजपला काही महापालिकांत महापौर पदावर पाणी सोडावे लागणार !

महाशिवआघाडी प्रत्यक्षात आल्यावर भाजपला काही महापालिकांत महापौर पदावर पाणी सोडावे लागणार !

मुंबई : राज्यातील 27 महानगरपालिकांच्या महापौर पदाचे आरक्षण सोडत जाहीर झाली असतानाच राज्यात नवीन सत्ता समीकरणे उदयास येण्याची चिन्हे आहेत. शिवसेना - राष्ट्रवादी-कॉंग्रेस अशा महाआघाडीने राज्यात सरकार स्थापन केले तर भाजपला कमीत कमी चार महानगरपालिकांमध्ये महापौर पदावर संख्याबळाच्या निकषावर पाणी सोडावे लागणार आहे. तर शिवसेनेची परिस्थिती आणखी बळकट होणार आहे. शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांचे सरकार स्थापन झाल्यावर कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचा शहरी भागातील घटलेला जनाधार पुन्हा मिळून या पक्षांना संजीवनी मिळणार आहे. 

नगरविकास विभागाने राज्यातील 27 महानगरपालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण सोडत जाहीर केले आहे. महापौर पदांसाठी निवडणुकांचा कार्यक्रज जाहीर होउन कार्यवाही सुरू होईल. दरम्यान राज्यात नवीन सत्ता समीकरणे तयार झाल्यास त्याचा फटका भाजपला बसू शकतो. राज्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सध्या शिवसेनेने साथ सोडल्यामुळे सरकार स्थापन करता आले नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट आहे. तर सध्या शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तीन पक्षांच्या नेत्यांच्या बैठकावर बैठका होत असून या महाआघाडीचे सरकार येण्याची शक्‍यता बळावली असल्याचे मानले जाते. 

या तीन पक्षांच्या सरकार आल्यानंतर महापौर पदाच्या निवडणुकीत हे तीन पक्ष एकमेकांना नक्‍कीच मदत करतील, असा अंदाज या तीन पक्षांच्या गोटातून व्यक्‍त केला जात आहे. त्यामुळे या तीन पक्षांना किमान चार शहरांचा महापौर करण्याची संधी संख्याबळामुळे मिळणार आहे. यामध्ये उल्हासनगर, सोलापूर, लातूर, अहमदनगर आदी शहरांचा समावेश आहे. या ठिकाणी महापौर पद महाआघाडीला मिळू शकते.या ठिकाणी शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे संख्याबळ हे भाजपच्या संख्येपेक्षा जास्त आहे. शिवाय अपक्ष नगरसेवकांची रसद ही मिळू शकते. राज्यात ज्या पक्षाची सत्ता असते त्या पक्षाकडे अथवा आघाडीकडे अपक्ष , छोटया पक्षांच्या नगरसेवकांचा कल असतो, हे यापुर्वी वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्याचा लाभ या तीन पक्षाला महापौर निवडणुकीत होण्याची शक्‍यता आहे. 

शिवसेनेची ताकद वाढणार 
कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष सोबत आल्यास शिवसेनेची ताकद वाढणार असून ज्या महानगरपालिकांत शिवसेनेचे संख्याबळ काठावर आहे, अशा ठिकाणी शिवसेनेला मदत होणार आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढणार आहे. तर ज्या ठिकाणी भाजप-शिवसेनेची युती होउन भाजपचा महापौर झालेला आहे. त्या ठिकाणी भाजपचा तोटा होणार आहे. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा शहरी जनाधार वाढणार 
विधानसभा निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मागील पाच वर्षांत जनाधार घटला होता. राज्यात महाआघाडीची सत्ता आल्यास त्याचा लाभ कॉंग्रेस-राष्ट्रवादीला होणार असून या पक्षांना संजीवनी मिळू शकते. त्यादृष्टीने महापौर पदाची निवडणूक ही रंगीत तालीम असल्याचे मानले जाते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com