खैरेवरील टीकेमागे भाजपचे मोठे राजकारण, जिल्हा परिषदेत वेगळी गणिते...

 खैरेवरील टीकेमागे भाजपचे मोठे राजकारण, जिल्हा परिषदेत वेगळी गणिते...

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या धक्‍यातून शिवसेना अजून पूर्णपणे सावरलेली नाही. अशात राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या पराभवाला शिवसेनाच कशी जबाबदार आहे? हे सांगण्याचा प्रयत्न करून त्यात अधिकच भर टाकली आहे. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी खैरे यांचे आरोप फेटाळून लावले. शिवसेनेच्या पराभवाचे राजकीय पडसाद स्थानिक पातळीवर नजीकच्या काळात उमटण्याची शक्‍यता आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेत कॉंग्रेस सोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत भाजपचे स्थानिक नेते आहेत. 

अशावेळी चंद्रकांत पाटलांच्या आजच्या विधानातून त्यांना बळ मिळाले नाहीतर नवलच. ज्या कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा अध्यक्ष जिल्हा परिषदेत आहे, त्याच कॉंग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेला बाजूला सारण्याचे प्रयत्न येत्या महिनाभरात भाजपकडून पहायला मिळतील. तशा हालचाली देखील सुरू असल्याची चर्चा आहे. 

बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपच्या विरोधात निकराने लढा दिला असे कौतुक करणारे चंद्रकांत पाटील औरंगाबादेत मात्र शिवसेनेचा पराभव दानवेंच्या जावयाने केला हे मानायला तयार नाहीत. उलट शिवसेनेला जाधवांची समजूत काढता आली नाही असे सांगत त्यांनी शिवसेनेवरच पराभवाची जबाबदारी ढकलली. 

जालन्यात रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी बंडखोरी केली होती. मात्र ती थोपवण्यासाठी भाजपने आपली पूर्ण शक्ती पणाला लावत खोतकरांना माघार घ्यायला लावली. औरंगाबादेत मात्र शिवसेनेला हे जमले नाही हे दाखवण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील यांनी आपल्या विधानातून केल्याचे स्पष्ट होते. 

लोकसभा निवडणुकीतील पराभवाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावासाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय. शिवसेनेचे पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी तर जाहीरपणे मतदानानंतर रावसाहेब दानवे यांच्यावर युतीधर्म न पाळता जावईधर्म पाळल्याचा घणाघात केला होता. यावर राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र "खैरेंचा पराभव दानवेंच्या जावयाने नाही, तर शिवसेनेच्या आमदारानेच केला' असा कोल्हापूरी डाव टाकत शिवसेनेचे आरोप फेटाळून लावले आहेत. 

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा सलग पाचवा विजय अवघ्या साडेचार हजार मतांनी हुकल्यानंतर त्याची चर्चा संपूर्ण राज्यभरात सुरू आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील या पराभवाची गंभीर दखल घेतली आहे. रावसाहेब दानवे यांचे जावई असलेले पुर्वाश्रमीचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बंडखोरी करत चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. 

जाधव यांना पावणेतीन लाखांहून अधिक मते मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंदु मतांचे विभाजन झाले आणि त्याचा फायदा उचलत एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील निवडूण आले. शिवसेनेने या पराभवाचे खापर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव व जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यावर फोडले. 

चंद्रकांत पाटील यांनी खास कोल्हापुरी डाव टाकत खैरेंचा पराभव दानवेंच्या जावयाने नाही, तर शिवसेनेच्या आमदारानेच केल्याचे सांगत, शिवसेनाच त्यांना रोखण्यात कमी पडल्याचा टोला लगावला. राज्याच्या राजकारणात रावसाहेब दानवे-चंद्रकांत पाटील यांची मैत्री सर्वश्रुत आहे. शिवसेनेच्या पराभवाला दानवेंना जबाबदार ठरवले जात असतांना पाटील त्यांच्या मदतीला धावून आल्याचे यावरून दिसले. रावसाहेब दानवे यांची पाठराखण करतांनाच, त्यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले हे विशेष. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com