क्रिकेटच्या जर्सीच्या रंगाचा वाद ! , भाजपसह विविध पक्षांचे मेहबूबा मुफ्तींवर टीकास्त्र

क्रिकेटच्या जर्सीच्या रंगाचा वाद ! ,  भाजपसह विविध पक्षांचे मेहबूबा मुफ्तींवर टीकास्त्र

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा रंग केशरी किंवा भगवा केल्याचा मुद्दा थेट संसदेत पोचला आहे. भारतीय संघाच्या ड्रेसचा रंग बदलल्यामुळेच या संघाचा इंग्लंडकडून पराभव झाला, या पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्या वक्तव्यावर भाजपसह विविध पक्षांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मेहबूबा यांना वेड्याच्या रुग्णालयात पाठवा, असा हल्ला शिवसेनेने चढविला आहे. भारताच्या राष्ट्रध्वजातही केशरी रंग आहे, त्यामुळे हा वाद अनाठायी असल्याचे मत अनेक राजकीय नेत्यांनी मांडले आहे. 

भारतीय संघाच्या गणवेशातील बदल, त्यात ठळकपणे दिसणारा केशरी रंग व त्या बदलानंतर लगेचच भारताला इंग्लंडकडून विश्‍वचषक स्पर्धेतील सामना गमवावा लागणे, या घटनाक्रमावरून मेहबूबा मुफ्ती यांनी टिप्पणी केल्याने त्या सत्तारूढ भाजपच्या निशाण्यावर आल्या आहेत. माजी गृह राज्यमंत्री व विद्यमान क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी, रंगाची उठाठेव न करता खेळाचा आनंद सर्वांनी लुटावा, असा टोला लगावला आहे. संसदेच्या परिसरात रिजीजू यांनी पत्रकारांना सांगितले, की हा वाद अतिशय अनाठायी आहे. क्रिकेट खेळाडूंच्या जर्सीचा रंग हा राजकारणाचा विषय होऊच शकत नाही. रंगाचा नव्हे, खेळाचा आनंद घ्यावा. ही टिप्पणी शोभादायक नाही. 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी जम्मू-काश्‍मीरबाबतच्या चर्चेत हा मुद्दा आणताना, जम्मू-काश्‍मीर विधानसभेवरही लवकरच भाजप आघाडीचा भगवा फडकेल, असे आक्रमकपणे सांगितले. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना, मेहबूबा यांना वेड्याच्या रुग्णालयातच पाठविले पाहिजे, असा हल्लाबोल केला. राऊत म्हणाले, की पाकिस्तानने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान करूनही तो संघ का हरत चालला आहे? असे वक्तव्य करणाऱ्या मेहबूबा यांची खरी जागा वेड्याच्या रुग्णालयातच पाहिजे. भाजप जम्मू-काश्‍मीर प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांनी सांगितले, की मेहबूबा यांचे हृदय पाकिस्तानसाठीच धडकते, त्यांनी भारतीय संघाच्या जर्सीच्या रंगाबद्दल बोलूच नये. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com