भाजप नेतृत्वाच्या ताठर रणनीतीने घेतलाय "दिल्ली टर्न' !

.....
 भाजप नेतृत्वाच्या ताठर रणनीतीने घेतलाय "दिल्ली टर्न' !

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीच्या विधानसभेतील सत्तेचा तब्बल 21 वर्षांचा वनवास संपविण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने तिकीट वाटपात आपल्या याआधीच्या ताठर निकषांत व धोरणामध्येही अमूलाग्र बदल केले आहेत. याआधी निवडणूक हरलेल्यांना तिकीट न देण्याचा, जास्तीत जास्त युवा चेहरे देण्यासाठी साठी-सत्तरीच्या पुढच्या नेत्यांना तिकीट देताना कुरकूर करण्याचा व आयारामांना सरसकट तिकीटे वाटण्याचा प्रघात पक्षनेतृत्वाने दिल्लीसाठी अक्षरशः गुंडाळून ठेवला आहे. भाजप 70 पैकी 25-30 जागांच्या आसपास पोहोचला तरी दिल्लीत भाजपचीच सत्ता येईल असे पक्षनेते ठामपणे सांगतात. 

यंदा संपूर्ण तिकीट वाटप प्रक्रियेत मनोज तिवारी, शाम जाजू, डॉ. हर्षवर्धन, विजय गोयल, विजेंद्र गुप्ता, मीनाक्षी लेखी, प्रवेश साहिंबसिंह आदी दिल्लीकर नेत्यांचे म्हणणे पक्षनेतृत्वाने नीट ऐकून घेतले व त्यांच्या उमेदवारांना योग्य ते स्थान दिले आहे असेही भाजप नेते सांगतात. भाजपच्या यादीत यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये "आप' किंवा कॉंग्रेसकडून पराभूत झालेल्या तब्बल 41 व महापालिका निवडणुकीत उतरलेल्या 19 भाजप नेत्यांना पहिल्या 57 उमेदवारांच्या यादीत स्थान मिळाले आहे. 60 वर्षांपुढचे 11 उमेदवार भाजप यादीत आहेत. 

आपमधून आलेले केवळ दोन चेहरे यात असून पूर्वांचल व उत्तराखंडचे सात चेहरे भाजप यादीत आहेत.दिल्ली विधानसभेच्या 1993 मध्ये झालेल्या फेररचनेनंतर भाजपला एकदाही दिल्लीची सत्ता मिळालेली नाही. भाजप तिकीट वाटपानंतर यंदा 2015 च्या तुलनेत नाराजीच्या झळा फारशा बसल्या नसल्याचा पक्षनेत्यांचा दावा आहे. करणसिंह तंवर यांच्यासारखे अपवाद वगळले तर स्थानिक नेत्यांची नाराजी ओढवून न घेण्याकडेच पक्षनेतृत्वाचा कल आहे. 

चार माजी महापौरांसह तब्बल 19 नगरसेवकांना पक्षाने रिंगणात उतरविले आहे. 74 वर्षीय एस एस वत्स यांच्यासह 11 उमेदवार साठी ओलांडलेले आहेत. अकाली दलाने वेगळे लढण्याचा इरादा जाहीर करताच जाजू व तिवारी यांनी दिल्ली गुरूद्वारा प्रबंधक समिती व इतर संस्थांच्या नेत्यांशी रातोरात चर्चा सुरू केली व जाजू यांच्या सूचनेनुसार टिळकनगर वगळता शीख बहुसंख्येच्या राजौरी गार्डन, हरिनगर घंटाघर, कालकाजी, सुभाषनगर व शाहदरा या पाच मतदारसंघांतील उमेदवार परस्पर जाहीर करण्याचेही भाजपने टाळले आहे. हर्षवर्धन व गौतम गंभीर यांच्यातील वादाची दखल घेताना पक्षनेतृत्वाने एका क्षणी गंभीर यांना ""तुम्ही शाळेत असल्यापासून हर्षवर्धन यांनी दिल्लीत भाजपसाठी काय काय केले आहे'', याबाबत सुनावल्याचेही सूत्रांनी सांगितले. नवी दिल्लीबाबत मात्र "केजरीवालांसमोर कोण' हा प्रश्‍न भाजपला अद्यापही सोडवता आलेला नाही. 

ध्रुवीकरणाचे कार्ड 
भाजपने दिल्लीत ध्रुवीकरणाचे कार्ड खेळण्याचे पक्के केले असून शाहीन बाग परिसरात गेले दीड महिना रस्त्यावर चाललेल्या सीसीए विरोधी आंदोलनामुळे होणाऱ्या अडचणींमुळे तीव्र नाराजी असणाऱ्या कालिंदी कुंज, आश्रम, तुघलकाबाद, बदरपूर पट्ट्यातील किमान 10 ते 12 मदरासंघांत भाजपचे हे कार्ड प्रभावी ठरेल असा विश्‍वास पक्षनेत्यांना वाटतो. दिल्लीत भाजपची सत्ता येताच सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून जे मदरसे किंवा मशिदी बांधल्या आहेत त्या जागा तातडीने "मोकळ्या' करू असा जाहीर इशाराच पक्षाने दिला आहे. दिल्लीत तब्बल 54 जमिनींवर अशा अनधिकृत मशिदी-मदरसे उभे राहिल्याचे खासदार प्रवेश साहिबसिंह यांनी सांगितले. याची यादी उपराज्यपालांना आम्ही दिली आहे. अशा प्रकारचे एकही उदाहरण मंदिर-गुरूद्वारांबद्दल आढळलेले नाही असाही दावा प्रवेश यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com