अधीररंजन चौधरींच्या ट्विटनंतर खळबळ, कॉंग्रेसचे पाकिस्तानशी लागेबांधे, भाजपचा गंभीर आरोप

अधीररंजन चौधरींच्या ट्विटनंतर खळबळ, कॉंग्रेसचे पाकिस्तानशी लागेबांधे, भाजपचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : दहशतवाद्यांना मदत केल्याच्या संशयावरून अटक केलेले जम्मू-काश्‍मीरचे पोलिस अधिकारी देविंदरसिंग यांच्या धर्माचा कॉंग्रेसने उल्लेख केल्याने भडकलेल्या भाजपने, ""कॉंग्रेसचे नेते पाकिस्तानचीच भाषा बोलत आहेत व त्यांची आजची वक्तव्ये ही उद्या इम्रान खानसाठी आंतरराष्ट्रीय मंचावर भारतविरोधी हत्यार बनतात,'' असा प्रतिहल्ला चढविला आहे. देशातील सर्वांत जुना पक्ष म्हणविणाऱ्या कॉंग्रेसचे पाकिस्तानशी जरूर काही ना काही लागेबांधे आहेत, असा गंभीर आरोप भाजपने केला आहे. 
जम्मू-काश्‍मीरचे पोलिस अधिकारी देविंदरसिंग यांचे नाव देवेंद्र खान असते, तर संघाच्या तुकडीने आकांडतांडव केले असते, असे ट्विट कॉंग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी केले होते. त्यानंतर भाजपने कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षनेते राहुल गांधी यांनी, हाच विचार पक्षाचा विचार आहे काय, याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. 

भाजप प्रवक्ते संबीत पात्रा यांनी विचारले की, राहुल गांधी यांना पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल काही संशय आहे काय ? दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला अटक केली, तरी कॉंग्रेस नेते त्याचा धर्म शोधायला निघतात. काही झाले तरी यांना त्यात धार्मिक रंग दिसतो. भारतावर हल्ला व पाकिस्तानला वाचविण्याची धडपड, याच गोष्टीत कॉंग्रेस पक्ष पारंगत बनला आहे. भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद यांसारखे शब्द कॉंग्रेसनेच शोधून काढले आहेत. हे सारे खेळ कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या इशाऱ्यावर चालले आहेत. जी भाषा कॉंग्रेस बोलते, तीच भाषा पाकिस्तान बोलतो, यात काहीतरी गडबड नक्की आहे. दोघांमध्ये काहीतरी संबंध जरूर आहे. कॉंग्रेस नेत्यांच्या ताज्या विधानावरही पाकिस्तानी वाहिन्यांनी हेडलाइन्स दाखविण्यास सुरुवात केली आहे. हाफीज सईद याच्या "आय लव्ह यू कॉंग्रेस' या विधानाची पुनरावृत्ती होईल, असेही भाकीत पात्रा यांनी ठामपणे वर्तविले. 

भाजपचे गंभीर आरोप 
दहशतवादावरही धार्मिक राजकारण करणे, ही कॉंग्रेसची जुनी पद्धत. मुंबई हल्ल्यानंतर सोनिया यांनी दिग्विजयसिंह यांना सांगितले होते की, तुम्ही असा आरोप करा, की मुंबई हल्ला संघानेच घडवून आणला. हे खरे नाही काय? बाटला हाउस चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची छायाचित्रे पाहून सोनिया यांना तीन रात्री झोप लागली नव्हती, असे कॉंग्रेसचे सलमान खुर्शीद यांनी म्हटले होते. पुलवामा हल्ल्याबाबत आता रणदीप सुरजेवाला पुन्हा संशय व्यक्त करीत आहेत. 
- चिदंबरम, शशी थरूर, सुरजेवाला हिंदू दहशतवाद शब्द वापरतात तर तरुण गोगोई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदू जिन्ना असे म्हणतात आणि कॉंग्रेसचेच मणिशंकर अय्यर पाकिस्तानात जाऊन मोदींना हटविण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करता, असे सांगतात, याच्याशी कॉंग्रेस नेतृत्व सहमत आहे काय? हे देशाला समजलेच पाहिजे. 
- राहुल गांधी यांनी अमेरिकी वकिलातीत आम्हाला इस्लामी किंवा सिमी दहशतवाद्यांपासून नव्हे, तर हिंदूंपासून धोका आहे. भारताला हिंदूंपासून धोका आहे, असे म्हटले होते. 
- सर्जिकल स्ट्राइकवरही जवानांच्या शौर्यावर अविश्‍वास दाखवून कॉंग्रेस नेते पुरावे मागतात. 
- अधीररंजन चौधरी यांनी लष्करप्रमुख नरवणे यांची नुकतीच थट्टा उडविली. 
- कॉंग्रेस नेते संदीप दीक्षित हे माजी लष्करप्रमुखांना रस्त्यावरचा गुंड म्हणाले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com