नागरिकत्व दुरुस्ती विधेयक : राज्यसभेसाठी भाजपची आक्रमक रणनीती

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक : राज्यसभेसाठी भाजपची आक्रमक रणनीती

नवी दिल्ली : नागरिकत्व कायदादुरूस्ती विधेयकावर लोकसभेत आज विरोधकांनी धारण केलेला रूद्रावतार पाहता भाजपने राज्यसभेसाठी खास रणनीती आखली आहे. येत्या बुधवारी (ता. 11) राज्यसभेत हे विधेयक मांडले जाईल तेव्हा ते मंजूर करवून घेणे ही सरकारची अग्निपरीक्षा ठरणार आहे. त्पामुळे पक्षनेत्यांनी आजपासूनच राज्यसभेतील शक्तीपरीक्षेच्या दृष्टीने वक्तव्ये सुरू केली आहे. अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, विजय गोयल, अमर साबळे, गिरीराज सिंह, अश्विनी चौबे, रमेश विधुडी आदींची फौज सरकारने यासाठी मैदानात उतरविली आहे. चौबे यांनी तर, जे विधेयकाला विरोध करतील ते (मुख्यतः कॉंग्रेस) कायदे आझम मंहमद अली जीनांचे अनुयायी, असा शिक्का मारला. 

राज्यसभेत मोदी सरकार आजही बहुमतात नाही त्यातच शिवसेनेचे तीन खासदार विरोधी मते देणार आहेत. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलानेही याला विरोध केला आहे. परिणामी भाजपने पडद्याआडच्या रणनीतीला वेग दिला असून नितीशकुमार, बिजू जनता दलाचे नवीन पटनाईक, तेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव, अण्णाद्रमुक नेते आदींशी संपर्क साधला जात आहे. यातील किमान दोन पक्षांनी जरी राज्यसभेत सभात्याग केला तरी भाजपचे काम सोपे होऊ शकते. 

मात्र त्याआधी अभूतपूर्व गोंधळाची जी चिन्हे दिसत आहेत त्यावर सत्तारूढ पक्ष कशी मात करणार हाही सवाल आहे. मुळात कोणतेही, त्यातही घटनादुरूस्ती विधेयक मांडण्यासाठी सभागृहात गदारोळ नसणे गरजेचे आहे व कॉंग्रेस हीच गोष्ट होऊ देणार नसल्याचे चित्र आहे. यामुळेच भाजपने आपल्या बोलक्‍या नेत्यांना या विधेयकाच्या वातावरण निर्मितीसाठी पुढे केले आहे. या विधेयकाआडून संघपरिवार धार्मिक अजेंडा रेटत असल्याचा आक्षेप नक्वी यांनी फेटाळला. 

ते म्हणाले की पाकिस्तान व बांगलादेशातील अल्पसंख्यांकाची वेगाने घसरती लोकसंख्या व तेथून जीव वाचवून भारतात आश्रयाला येणाऱया लाखो लोकांच्या संख्येतील वाढ पाहिली तर यासारखे विधेयक आवश्‍यक ठरते. शेजारी देशांत अल्पसंख्यांकांवर प्रचंड अत्याचार होत आहेत. या विधेयकमागे जे ऐतिहासिक सत्य आहे ते नाकारता येणार नाही. स्वातंत्र्यावेळी पाकिस्तानात 24 टक्के अल्पसंख्यांक होते आज ते प्रमाण 2 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी आहे. जे धर्मपरिवर्तन करणार नाहीत त्यांच्या तेथे सर्रास कत्तली झाल्या, या पीडीतांना भारत मदत करत असेल तर मानवाधिकाराच्या दृष्टीने हे विधेयक संपूर्ण न्याय्य व योग्य ठरते. 

चौबे यांनी कॉंग्रेससह विरोधकांना जीना यांचे अनुयायी ठरवताना, भाजपचे आम्ही लोक मूळ गांधीवादी आहोत असा दावा केला. ते म्हणाले की विदेशी घुसखोरांसाठी या देशात काहीही जागा नाही. ते (मुसलमान) जगात पोटापाण्यासाठी कोठेही जाऊ शकतात. गिरीराजसिंह म्हणाले की शेजारी देशांत गैर मुस्लिमांवर अत्याचार होत नाहीत का? ते सत्य स्वीकारण्याची तयारी व हिंमत विरोधकांकडे नाही. भारत हा पाकिस्तान-बांगलादेशातील हिंदू शरणार्थींसाठी सुवर्णस्थळ व शरणस्थल बनावे याच दृष्टीने हे विधेयक आणले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com