महाराष्ट्रातील सत्तेचा मोह केंद्रीय भाजपने सोडलेला नाही...

महाराष्ट्रातील सत्तेचा मोह केंद्रीय भाजपने सोडलेला नाही...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यात आज दुपारी संसदेत झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्रातील सत्तेतून माघार घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती भाजपमधून मिळाली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर सध्या राज्यातून भाजपने माघार घेतली तरी भाजप नेते मात्र, आम्ही महाराष्ट्र हातून सोडून दिलेला नाही. लवकरच पहा तिकडे काय होते ते, असे ठामपणे सांगताना दिसले. त्यावरून आगामी काळात राज्यात आणखी मोठा खेळ करण्याची सुप्त तयारी भाजपमध्ये सुरू झाल्याचे मानले जाते. 

देवेंद्र फडणवीस सरकारचा अंधाररात्रीचा सत्ताखेळ यशस्वी होण्याची चिन्हे न दिसल्यानेच फडणवीस यांना तीन दिवसांतच राजीनामा देण्याचे निर्देश देण्यात आले. एका भाजप नेत्याने, मुंबई भाजपने सोडलेली नाही व कॉंग्रेस शिवसेनेला सुखाने सत्तेत राहू देणार नाही असे ठामपणे सागितले. महाराष्ट्रात कर्नाटकची पुनरावृत्ती करण्याच्या जोरदार हालचाली भाजपने दिल्लीत सुरू केल्याची माहिती मिळते. न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य आणखी बिकट झाल्याचे दिसल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले. 

महाराष्ट्रात शुक्रवारी मध्यरात्रीच्या अंधारात खेळ करून हाती घेतलेल्या सत्तेतील एकेक पत्ते हातातून निसटून जात असल्याचे पाहून व खुद्द अजित पवार यांचीच चलबिचल पाहून भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने मुंबईसह महाराष्ट्राचा नाद सोडा, अशी सूचना आज दुपारी भाजप नेतृत्वाला केली. राज्यघटना दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमानंतर शहा त्यांच्या दालनात न जाता थेट पंतप्रधानांच्या दालनात शिरले तेव्हाच पत्रकारांना, काय होणार याचा अंदाज आला होता. 

महाराष्ट्रातील ऑपरेशन गोव्याइतके सोपे नसल्याचा फीडबॅक खुद्द नितीन गडकरी व इतर नेते यांनी दिल्यावर पंतप्रधानांनी या साऱ्याचा फेरविचार सुरू झाल्याची माहिती मिळाली "जेथे बहुमत मिळते तेथे मी सरकार बनवतो व जेथे बहुमत नसते तेथे तर मी नक्की सरकार बनवतोच बनवतो, ' ही शहा यांची प्रतिमा पुन्हा एकदा भंग पावली आहे. मुळात पाच वर्षे एकहाती नेतृत्व देऊनही फडणवीस यांना पुरेशा जागा निवडून का आणता आल्या नाहीत, असा शहा यांचा सवाल असल्याचे समजते. फडणवीस यांचा अहंकार, त्यांच्याभोवतीची चौकडी, फडणवीस यांची बदललेली देहबोली व भाषा शैली याबाबत खुद्द राज्पातील पक्षनेत्यांनी वारंवार फीडबॅक देऊनही मोदी-शहांनी कानाडोळा केल्याचे स्पष्ट आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभेच्या प्रचारात गडकरी याना फडणवीस यांच्या इच्छेनुसार विदर्भाबाहेर सभा घेऊ न देणाऱया भाजप नेतृत्वाला काल संध्याकाळी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना बैठकीतील एकी पाहून त्यांची आठवण झाली व गडकरी यांना कृष्ण मेनन मार्गावरून फोन गेला. गडकरी यांनीही त्यांच्या स्टाईलने प्रयत्न सुरू केले. मात्र ज्या पध्दतीने राज्यात सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न दिल्लीतून केला गेला त्यानंतर तीनही पक्षांची एकी आणखी भक्कम झाल्याचे गडकरी यांना जाणवले व हे प्रकरण सोपे व शक्‍य नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. 

राष्ट्रवादीच्या तीन आमदारांना पळवून दिल्लीत आणले गेल्याचे पितळ उघडे पडल्यावर भाजपच्या प्रतिमेमवरही परिणाम होण्याची भिती पक्षनेत्यांना जाणवू लागली. त्यानंतरही भाजप नेतृत्वाने साम दाम दंड भेदचे प्रयत्न सोडले नाहीत. मात्र आज संसदेतील कार्यक्रम सुरू असताना जेव्हा अजितदादाच परतीच्या मानसिकतेत असल्याचा सांगावा आला तेव्हा मात्र मोदींनी शहा यांना बोलावून घेतले व अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर फडणवीस यांना राजीनामा देण्याचा निरोप देण्यात आला. 

अमित शहा यांना बसला चारवेळा दणका... 
2018 - कर्नाटकात येदियुरप्पा यांनी विधानसभेतील शक्तीपरीक्षणाआधीच राजीनामा दिला होता. मात्र अलीकडे भाजपने पुन्हा फोडाफोडी करून त्यांना सत्तेवर आणले. 
- 2017 - राज्यसभेच्या गुजरात निवडणुकीत कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांना पाडण्यासाठी शहा यांनी जंगजंग पछाडले व त्यांनी स्वतः निवडणुकीच्या आदल्या रात्रभर गुजरात विधानसभेच्या परिसरात ठाण मांडले. तरीही पटेल निवडून आले. 
2016 मध्ये उत्तराखंडमध्येही कांग्रेसचे 9 आमदार फोडून हरीश रावत यांचे लोकनियुक्त सरकार घालविण्याची खेळी भाजप नेतृत्वाने केली होती. तेथे तर विचित्र पध्दतीने राष्ट्रपती राजवट लागू केली गेली. मात्र उच्च न्यायालयाने भाजप नेतृत्वाच्या त्या अनैतिक कृत्याचा पडदाफाश केला. नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रावत यांनी बहुमत सिध्द केले व मोदी सरकारला राष्ट्रपती राजवट हटविण्याची वेळ आली. त्यामुळे शहा यांची ती खेळीदेखील साफ अपयशी ठरली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com