सत्ता, उपमहापौरपद गमावल्यानंतर भाजप सांगणार विरोधी पक्षनेते पदावर दावा

 सत्ता, उपमहापौरपद गमावल्यानंतर भाजप सांगणार विरोधी पक्षनेते पदावर दावा

औरंगाबाद : पंचवीस वर्ष शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून महापालिकेतील सत्तेत बसलेल्या भाजपवर आता विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली आहे. एमआयएमच्या काही नगरसेवकांनी शिवसेना-भाजपला मतदान केल्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांनी सहा नगरसेवकांवर कारवाई केली. आता एमआयएमचे महापालिकेतील संख्याबळ कमी झाल्याचे सांगत भाजपने विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. भाजपच्या नगरसेवकांची पालिकेतील सदस्यसंख्या 23 आहे. 

महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनादेशाचा अपमान केला, सूडबुध्दीने शहरासाठी मंजुर करून आणलेली 1680 कोटींची पाणीपुरवठा योजना स्थगित केली असा आरोप करत भाजपने महापालिकेच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर सोमवारी उपमहापौरप पदाची निवडणूक पार पडली. यात देखील भाजपची खेळी त्यांच्यावर उलटली. 

त्यामुळे सत्तेवाचून सैरभैर झालेल्या भाजपने आता एमआयएमचे संख्याबळ घटल्याचे सांगत विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. भाजपचे महापालिकेतील गटनेते प्रमोद राठोड हे लवकरच महापौरांना पत्र देऊन विरोधी पक्षनेते पद भाजपला द्यावे अशी मागणी करणार आहेत. 

एमआयएमचे संख्याबळ अठरावर 
उपमहापौर निवडणुकीत पक्षादेश डावलत एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी शिवसेना-भाजपला मतदान केले, तर तीन नगरसेवकांनी मतदानाच्या वेळी दांडी मारत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला मदतच केली. यावरून इम्तियाज जलील यांनी काल सहा नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली. एमआयएमचे महापालिकेतील संख्याबळ पंचवीस होते. दुसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ असल्यामुळे विरोधी पक्षनेते पद एमआयएमकडे होते. 

दरम्यान, सय्यद मतीन याच्यावर पक्षविरोधी कारवायांमुळे याआधीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. उपमहापौर पदाच्या निवडणुकीत पक्षाचा व्हीप नाकारणाऱ्या सहा नगरसेवकांना काल निलंबित करण्यात आले. त्यामुळे एमआयएम नगरसेवकांची संख्या अठरावर आली आहे. नेमका हाच मुद्दा हेरत भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com