bjp and another party in india | Sarkarnama

दिल्ली पराभवाचा साईड इफेक्‍ट - भाजपकडून मित्रपक्षांबरोबर चर्चा, नवे मित्र जोडण्याचाही प्रयत्न ...

मंगेश वैशंपायन
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

.....

नवी दिल्ली : दिल्लीतील भाजपच्या दारूण पराभवानंतर राजधानीत, विशेषतः भाजपच्या गोटातील हालचालींना विलक्षण वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डा यांच्याशी दीर्घ चर्चा केली. दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी गृहमंत्री अमित शहा हे सातत्याने संपर्कात असून जागावाटपात त्यांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दिल्लीच्या निकालानंतर व शिवसेना दूर गेलेली असताना एनडीए परीघ विस्तारण्या बरोबरच विरोधकांना एकजूट होण्याची कोणतीही संधी न देण्याबाबत भाजप जागरूक झाल्याने संसद अधिवेशनाच्या उत्तरार्धाआधी मोदी मंत्रिमंडळाच्या संभाव्य पहिल्या विस्तारात लोकसभेच्या उपाध्यक्षपदाबाबत भाजप मित्रपक्षांना झुकते माप देण्याची चिन्हे आहेत. 

बिहारमध्ये याच वर्षात विधानसभा निवडणुका आहेत. दिल्लीच्या निकालानंतर तेथेच नव्हे तर पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू व केरळसारख्या राज्यांतही भाजपची बार्गेनिंग पॉवर लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. साहजिकच नितीशकुमार यांचा जदयूच नव्हे तर कितीही कमकुवत असला तरी अण्णाद्रमुक यांच्याबरोबर जागावाटपात "सबुरीचे' धोरण स्वीकारणे भाजपला भाग आहे. 

या पार्श्‍वभूमीवर मोदी यांनी जगनमोहन रेड्डी यांची भेट घेऊन तब्बल दीड तास चर्चा केली. एनडीएचा परीघ वाढविण्यासाठी मोदी इच्छुक असून त्यादृष्टीने ते व जगनमोहन यांच्यातील चर्चेकडे पाहिले जाते. आंध्रात वायएसआर कांग्रेस-भाजप यांच्यात थेट युती होण्याची शक्‍यता जगनमोहन यांना परवडणारी नसली तर त्यांना लोकसभेत सहयोगी पक्ष म्हणून येण्यासाठी चुचकारण्याचे प्रयत्न भाजपच्या बाजूने सुरू झाले आहेत. जगनमोहन यांच्या खासदाराला लोकसभा उपाध्यक्षपद देण्याबाबत भाजपने विचारणा केली आहे, मात्र जगनमोहन यांनी मोदींशी चर्चेनंतरही आपल्या "मन की बात' अद्याप भाजपला समजू दिलेली नाही. 

मोदी -2 सरकारमध्ये पासवान पितापुत्रांच्या लोजपासारख्या एनडीए मित्रपक्षांनी योग्य प्रतिनिधीत्व न मिळाल्याची तक्रार केली होती. बिहारमधील याच वर्षीच्या निवडणुका पहाता मोदी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत लवकरच निर्णय घेऊ शकतात असे पक्षसूत्रांनी सांगितले. अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या उत्तरार्धाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार शक्‍य आहे. चिराग पासवान यांना केंद्रात मंत्रिपद देऊन प्रकृतीअस्वास्थ्याने ग्रस्त रामविलास पासवान यांना एनडीएचे संयोजकपद देण्याबाबतही भाजपमध्ये चर्चा आहे. कमकुवत कॉंग्रेसऐवजी प्रादेशिक पक्षांची आघाडी होत गेली तर राज्याराज्यांत भाजपसमोर मोठी समस्या उद्भवू शकते. त्यामुळेच गैरभाजप पक्षांच्या प्रस्तावित आघाड्यांना रोखणे हाही भाजपसमोरचा एक अजेंडा मानला जातो. 

"गोली मारो...'ची भाषा चुकीची - शहा 
दिल्लीतील पराभव हा सीएएच्या विरोधात नसल्याचे गृहमंत्रि अमित शहा यांनी आज स्पष्ट केले. पराभवानंतर शहा यांचे हे पहिले व मोठे वक्तव्य आले आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीतील सभेत भाजप विरोधकांना गोळ्या मारा असे बेताल वक्तव्य केले होते त्यावर शहा यांनी, अशी वक्तव्ये चुकीची आहेत व ती करता कामा नयेत, अशा सौम्य कानपिचक्‍या दिल्या आहेत. शहांनी आज ट्‌विटद्वारे सांगितले की, ""निवडणुका या इतर पक्षांसाठी सरकार पाडणे किंवा बनविण्यासाठी जरूर असतात. पण भाजप हा विशिष्ट विचारसरणीवर आधारित पक्ष असल्याने विजय-पराभवावर डोळा ठेवून आम्ही निवडणुका लढवीत नाही. प्रत्येक निवडणूक ही आमच्या विचारांत वृध्दी व्हावी म्हणूनच आम्ही लढतो.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख