bjp and aap in delhi election | Sarkarnama

दिल्लीत भाजपचा मोठा पराभव, मात्र मतांच्या टक्केवारीत घसघशीत वाढ !

मंगेश वैशंपायन
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा सलग दुसऱ्यांदा दणकून पराभव झाला असला व दुहोरी आकडाही गाठता आलेला नसला तरी दिल्लीच्या साऱ्याच भागांत पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत अतिशय लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा, गृहमंत्री अमित शहा यांची कथित चाणक्‍यनीती व पक्षनेत्यांचा विखारी प्रचार शंभर टक्के अयशस्वी झाल्याचे मानण्यास भाजप नेते तयार नाहीत. 

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा सलग दुसऱ्यांदा दणकून पराभव झाला असला व दुहोरी आकडाही गाठता आलेला नसला तरी दिल्लीच्या साऱ्याच भागांत पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत अतिशय लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा, गृहमंत्री अमित शहा यांची कथित चाणक्‍यनीती व पक्षनेत्यांचा विखारी प्रचार शंभर टक्के अयशस्वी झाल्याचे मानण्यास भाजप नेते तयार नाहीत. 

 

दिल्लीत उतरलेल्या भाजपच्या महाप्रचंड फौजेला अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने सलग दुसऱ्या निवडणुकीत अस्मान दाखविले. ज्या दिल्लीत गेली सहा वर्षे खुद्द मोदी-शहांचे कायमस्वरूपी वास्तव्य आहे त्याच विधानसभेतील 22 वर्षांचा सत्तेचा वनवास संपविण्यात भाजप साफ अपयशी ठरला. केवळ 8 आमदार निवडून आले. दिल्लीतील भाजपच्या पराभवानंतर पेट्रोलपासून भाजीपाला व गॅसपर्यंतच्या दरवाढीची कुऱ्हाड देशवासियांवर कोसळण्याची मालिका पुन्हा सुरू झाली. 

भारतीय जनता पक्षाने, केजरीवाल यांच्यावरील "दहशतवादी व अराजकतावादी' हे शिक्के पुसायचे नाहीत, असा चंग बांधल्याचे गिरीराजसिंग, नवे आमदार ओ पी शर्मा आदींच्या ताज्या वक्तव्यांवरून दिसते. मात्र पराभव झाला तरी भाजपच्या मतांची टक्केवारी 70 पैकी तब्बल 63 जागांवर वाढल्याचे तर आपचा मत टक्का 2015 पेक्षा 38 जागांवर घटल्याचे फीडबॅक पक्षाकडे आले आहेत. त्यामुळेच मनोज तिवारींपासून शाम जाजू यांच्यापर्यंतच्या दिल्लीच्या नेत्यांचे राजीनामे तातडीने न स्वीकारण्याचे पक्षनेतृत्वाने म्हणजे जेपी नड्डा नव्हे तर शहा यांनी ठरविले. त्यांच्या आदेशावरू नड्डा यांनी आज तिवारी यांच्याशी पराभवाबाबत सविस्तर चर्चा केली. 

आकडेवारी पाहता आपला 49 लाख 74 हजार 522 मतदारांचा पाठिंबा मिळाला. भाजपला 35 लाख 75 हजार 430 तर "दंडुकेधारी' राहुल गांधी यांच्या कॉंग्रेसच्या 63 उमेदवारांनी अनामत गमावली तरी पक्षाच्या झोळीत 3 लाख 95 हजार 924 दिल्लीकरांनी मतांचे दान टाकले आहे. भाजपचे बहुतांश उमेदवार निवडणूक जिंकण्यात अपयशी झाले असले तरी बहुतांश विधानसभा जागांवर त्यांच्या मतांच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली आहे. किमान 30 जागांवर भाजप व आपच्या विजयातील अंतर अत्यल्प आहे. 20 जागांवर या टक्केवारीत किमान 20 टक्के तेवढ्याच जागांवर 10 टक्के वाढ जाली आहे. नजफगडमध्ये तर भाजपने 21.5 टक्के मतवाढ नोंदवली आहे. आपच्या मत टक्केवारीत 38 जागांवर घट व 31 जागांवर वाढ झाल्याचे दिसते. 5 जागांवर आपची टक्केवारी 8 ते 10 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. मुस्तफाबादमध्ये सर्वाधिक 23 टक्के वाढ आपने नोंदवली आहे. यातील करावलनगरसह 27 जागांवर आप व भाजप या दोघांचीही टक्केवारी वाढली आहे. 
आपची "पॅन इंडिया' योजना 
केजरीवाल यांनी 2013 मधील विजयानंतर देशभरात आपच्या विस्ताराचे स्वप्न पाहिले होते. ते स्वतः वाराणसीत जाऊन मोदींच्या विरोधात लढले होते. मात्र दिल्ली व काही प्रमाणात पंजाबच्या बाहेर आपला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. नंतर 2015 मध्ये केजरीवालांनी "दिल्लीबाहेर जाणे ही आपली घोडचूक होती,' हे जाहीरपणे मान्य करून दिल्लीकरांची माफी मागितली. आता सलग तिसऱ्या वेळेस केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यावर मात्र आपने पक्षाच्या देशभरातील विस्ताराची योजना गंभीरपणे आखणे सुरू केल्याचे खासदार संजय सिंह यांनी सांगितले. धर्मनिरपेक्षता व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेवर विश्‍वास असलेल्या विविध राज्यांतील समविचारी पक्षांबरोबर आप नेतृत्व लवकरच चर्चा सुरू करून त्या त्या राज्यांत जनाधार वाढविण्याची योजना अंमलात आणेल असे त्यांनी सांगितले. बिहार व बंगालपासून याची सुरवात होणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख