पक्षाच्या गोटात : भाजप - 'इनकमिंग'मुळे 'चरित्र' आणि 'चिंतन' बदलणार?

जनसंघाची मिणमिण पणती आता मशाल झाली आहे. कॉंग्रेसचे वर्चस्व असलेल्या महाराष्ट्रात भाजपने गाठलेला यशाचा पल्ला स्व. वसंतराव भागवत यांनाही थक्क करणारा ठरला असता. सर्वाधिक खासदार, सर्वाधिक महापौर, नगराध्यक्ष एवढेच नव्हे, तर सरपंचही सर्वाधिक असणाऱ्या भाजपला आता आकाश हीच मर्यादा वाटावी, अशी स्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या "करिष्म्या'ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांची जोड लाभली आहे. यश सतत चालत येत आहे, अन्‌ त्यापाठोपाठ भाजपच्या वाटेवर धावत येताहेत सर्व पक्षातले नेते.
पक्षाच्या गोटात : भाजप - 'इनकमिंग'मुळे 'चरित्र' आणि 'चिंतन' बदलणार?

भाजप आणि संघ परिवाराने जिथे-जिथे संघर्ष केला, ज्या नेतृत्वाविरोधात संघर्ष केला ते अनेक जण आज भाजपमध्ये येण्यास आतूर आहेत. या 'इनकमिंग'च्या रेट्‌यामुळे नाराज झालेल्या जुन्या कार्यकर्त्यांना सांभाळणे ही सध्या भाजपसमोरची एकमात्र चिंता आहे. नेत्यांची 'आयात' वाढल्याने भाजपचे 'चरित्र' आणि 'चिंतन' त्यामुळे बदलणार तर जाणार नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दक्षिण वगळता भारतभर पसरलेल्या भाजपचे अमित शहा शिल्पकार ठरले आहेत. लोकसभेचा जनादेश मिळाल्यानंतर निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या सर्वात बड्या राज्यात अर्थात महाराष्ट्रात सत्ता यावी, भलतेच काही घडू नये याची पूर्ण काळजी ते घेत आहेत. भाजपचा चेहरा झालेले फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील हे आधीच वरिष्ठांनी स्पष्ट केले आणि प्रदेशाध्यक्षपदाची माळ चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यात पडली. कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांचाही नियोजनावर भर असतो. 

लोकसभेच्या कालावधीत तयार झालेली बुथ रचना अधिक प्रभावी केली जात आहे. दिवसभर काय काम केले, याचा तपशील कार्यकर्त्यांना डिजिटल स्वरूपात श्रेष्ठींकडे पाठवावा लागतो. 'वन बुथ, टेन युथ'चा कार्यक्रम असो किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांना 11 लाख राख्या पाठवण्याचा कार्यक्रम असो, पक्षयंत्रणा कामात व्यग्र आहे. पुन्हा सत्ता मिळाली की हयगय चालते, असा कोणताही 'बनचुकेपणा' तूर्तास पक्षात दिसत नाही. सदस्य नोंदणीचे नवे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. कार्यकर्ते त्यासाठी झटत आहेत. सत्तेचे लाभ आपल्यापर्यंत पोहोचले नाहीत, याची खंत असली तरी कार्यकर्त्यांनी काम थांबवलेले नाही. 

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्‍केवारी पन्नाशीच्याही पुढे जावू शकेल, असा विश्वास नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही आहे. त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही 'केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र' असेच चित्र असेल, असा दावाही केला जात आहे. मुख्यमंत्रिपदाच्या दुसऱ्या पर्वात फडणवीस कागदावरच्या योजना आणि भ्रष्टाचाराला आळा घालू शकतील का, ते पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल. त्यांच्या नेतृत्वाचे वास्तव पक्षातील सर्व छोट्याबड्यांना मान्य करावे लागणार आहे. 

सबगोलंकारी... 
राज्यात मराठा आरक्षण, धनगरांसाठी योजना. ओबीसींसाठी कार्यक्रम अशा निर्णयांमुळे भाजपची प्रतिमा सर्वसमावेशक झाली आहे. नागरी भागात मराठी-अमराठी दोघेही मतदान करणार आहेत. ग्रामीण भागात भाजपला काही संकटांचा सामना करावा लागेल, याची जाणीवही आहेच. मध्यमवर्गीयांना राष्ट्रवाद आणि गरिबांना योजनांचे लाभ असा नवा भाजप 'सबगोलंकारी' आहे. 

...तर समीकरण बदलेल 
प्रादेशिक पक्ष समविचारी असले, तरी भाजप त्यांना संपवत जातो, ही टीका नको असल्यानेच शिवसेनेला समवेत घेण्याचे ठरले आहे. शिवसेनेतील (अति)उत्साही मंडळींनी आगाऊपणा केला, तरच हे समीकरण बदलू शकेल.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com