bjp alies happy | Sarkarnama

भाजपच्या मित्रपक्षांची कोल्हापुरात "चांदी' 

सरकारनामा न्यूजब्युरो 
बुधवार, 5 एप्रिल 2017

कोल्हापूर जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टीला सहकार्य केलेल्या मित्र पक्षांची चांगलीच चांदी झाली आहे. संख्याबळ कमी असूनही शिवसेना, जनसुराज्यला प्रत्येकी दोन पदे तर "स्वाभिमानी' केवळ दोन सदस्यांच्या जोरावर एक पद मिळाले आहे. 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टीला सहकार्य केलेल्या मित्र पक्षांची चांगलीच चांदी झाली आहे. संख्याबळ कमी असूनही शिवसेना, जनसुराज्यला प्रत्येकी दोन पदे तर "स्वाभिमानी' केवळ दोन सदस्यांच्या जोरावर एक पद मिळाले आहे. 

जिल्हा परिषदेत भाजपचे चौदा सदस्य आहेत. त्यांना "जनसुराज्य' च्या सहा, शिवसेनेच्या सात व आवाडे गट, चंदगड आघाडीच्या प्रत्येकी दोन सदस्यांसह एका अपक्ष
सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. पाठिंबा दिलेल्या सर्वच आघाड्यांनी पद मिळावे अशी मागणी लावून धरली होती. पदांची संख्या कमी आणि मागणी जास्त असल्याने
भाजपच्या नेत्यांनी मग "दबाव' तंत्र अवलंबत इतर आघाड्यांना शांत केले. 

शिवसेनेला यापूर्वीच उपाध्यक्ष पद दिले आहे, त्यावर आमदार चंद्रदीप नरके यांचे समर्थक सर्जेराव पाटील-कळेकर यांची वर्णी लागली आहे. शिक्षण समितीचे सभापती पद पुन्हा शिवसेनेला देऊन भाजपच्या नेत्यांनी कागल तालुक्‍यात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना शह देण्याचा प्रयत्न केला. या पदावर माजी आमदार संजय
घाटगे यांचे पुत्र अंबरिशसिंह यांची निवड झाली आहे. 

नगरपालिका निवडणुकीपासून "जनसुराज्य' चे विनय कोरे भाजपासोबत आहेत. त्यांनी तर "बांधकाम' साठी सगळी ताकद पणाला लावली होती. त्यांच्या या प्रयत्नांना
यश येऊन बांधकाम समिती सभापती त्यांच्या पक्षाचे सर्जेराव पाटील-पेरीडकर यांची निवड झाली पण त्याचबरोबरच समाजकल्याण समितीचे सभापती पदही
आपल्याला मिळवून या पदावर विशांत महापुरे यांची वर्णी लावण्यात श्री. कोरे यशस्वी झाले. 

मित्र पक्षांना खूष करताना स्वपक्षातील नाराजीचे वातावरण मात्र पक्ष नेतृत्वाला कमी करता आले नाही. भाजपचे चौदा सदस्य असून केवळ अध्यक्ष पदच त्यांना मिळाले आहे. पण अध्यक्ष पदी सौ. शौमिका महाडीक यांची निवड झाली नसती तर इतर पदे मिळवताना कराव्या लागणाऱ्या घडामोडी शक्‍य नव्हत्या. त्यामुळे सत्तेत आहोत एवढ्या मानसिक समाधानातच भाजपच्या सदस्यांना अडीच वर्षे काढावी लागतील. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख