अकोल्यात दारू दुकानांविरुद्ध भाजपचे लोकप्रतिनिधी आक्रमक

अकोल्यात दारू दुकानांविरुद्ध भाजपचे लोकप्रतिनिधी आक्रमक

अकोला : शहराच्या मध्यवर्ती भागात मद्यसम्राटांनी सुरू केलेल्या दारू दुकानांविरुद्ध भाजपने आंदोलन पुकारले असून ही दुकाने तातडीने बंद करण्याच्या मागणीसाठी भाजपचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. शहरातील दारू दुकानांविरुद्ध सुरू असलेल्या या आंदोलनाला लोकचळवळ बनविण्यासाठी भाजपकडून शहरात स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे. 

राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील पाचशे मीटरच्या आतील देशी, विदेशी दारू विक्रीचे दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या निर्णयानंतर मद्य सम्राटांनी प्रशासनातील काही झारीच्या शुक्राचार्यांशी हातमिळवणी करीत शहरातील मध्यवर्ती भागात दारू विक्रीचे दुकाने थाटली. त्यामुळे परिसरातील शांतता व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या दारू दुकानांविरुद्ध जनतेमध्ये तीव्र असंतोष वाढला आहे. 

शहरात दारू बंदी करण्याच्या मागणीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, स्थायी समिती सभापती बाळ टाले, नगरसेवक राहुल देशमुख, विजय इंगळे, अजय शर्मा यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह अनेक सामाजिक संघटनांनी कंबर कसली आहे. इनकम टॅक्‍स परिसरासह शहरातील मध्यवर्ती स्थलांतरीत करण्यात आलेली दारू विक्री दुकाने तातडीने बंद करण्याच्या मागणीसाठी भाजपचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांकडून नागरिकांच्या घरो-घरी जाऊन स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे. 

भाजप पदाधिकाऱ्याची गोची 
भाजपमध्येच एक नगरसेवक मद्यसम्राट असून भाजप पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे या महोदयांची गोची झाली आहे. महापालिकेच्या सभा असो की पक्षाच्या बैठका, दारूबंदीच्या विषयावर खासदार, आमदारांसह नगरसेवकांकडून दारूबंदीचा मुद्दा आक्रमकपणे मांडत या पदाधिकाऱ्यांचे नाव न घेता टीकेची झोड उठविण्यात येत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com