अजित पवार यांनी तर आणिबाणीविरोधात प्राणपणाने लढणाऱ्यांना बळ दिले : भाजपची नवी भूमिका

 अजित पवार यांनी तर आणिबाणीविरोधात प्राणपणाने लढणाऱ्यांना बळ दिले : भाजपची नवी भूमिका

नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून फुटून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर अजित पवार यांच्याविरूध्द गैरव्यवहाराच्या तपास व चौकशीची प्रक्रिया थांबलेली नाही. कायदा आपले काम करेल, अशा शब्दांत भाजपने याबाबतचे आरोप फेटाळले. अजित पवार यांनी त्यांचे काका शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून आणीबाणीविरूध्द लढणाऱ्या आघाडीला बळच दिले, असाही नवा युक्तिवाद भाजपमधून करण्यात येत आहे. 

एका वरिष्ठ भाजप पदाधिकाऱ्याने, भाजप-राष्ट्रवादी गटाचे फडणवीस सरकार विधानसभेत बहुमत सिध्द करेल व सत्तारुढ आघाडीकडे 160 च्या आसपास संख्याबळ असल्याचा दावा केला. मात्र भाजपचे सर्वोच्च नेतृत्व (अमित शहा नव्हे) मुख्यमंत्रीपदासाठी विशिष्ट नावावरच अडून बसण्यामागचे गौडबंगाल काय, या प्रश्‍नावर या नेत्याने "नो कमेंटस्‌' असे सांगून संसद परिसरातूनच काढता पाय घेतला. 

अजित पवार यांनी स्वतःहून भाजप सरकारला पाठिंबा दिला असल्याचा दावा भाजपचे उपाध्यक्ष, खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांनी केला. ते म्हणाले की मोठे पवार यांनी 1978 मध्ये सरकार बनविले त्यामागे आणिबाणीविरूध्द भूमिका होती. आणिबाणीच्या विरोधात त्यांनी आपले राजकीय वजन टाकले होते. त्याच आणिबाणीविरोधात प्राणपणाने लढणाऱ्या भाजपबरोबर अजित पवार आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील नवे सत्तासमीकरण हे आणीबाणीच्या, ती लादणाऱ्या व त्याचे समर्थन करणाऱ्या प्रवृत्तीविरूध्द आहे. वस्तुस्थिती ही आहे की विधानसभेत भाजप सरकार बहुमत सिध्द करेल. हे सरकार स्थिर राहून पुढची पाच वर्षे राज्याचा विकास अग्रेसर करेल. भाजप सरकारकडे सध्या 122 आमदार आहेत व "बाकीची व्यवस्था' योग्य वेळी होईल असे ते सूचकपणे म्हणाले. 

राज्यपालांनी घटनात्मकृष्ट्याच सारी पावले उचलली आहेत. कॉंग्रेसने नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत कारण त्यांची तथाकथित नैतिकता आजच लोकसभेत उघडी पडली आहे असाही त्यांनी टोला लगावला. भाजपबरोबर आल्याने अजित पवार यांच्याविरूध्दच्या गैरव्यवहाराच्या तपासाला फुलस्टॉप लागल्याचा आक्षेप सहस्त्रबुध्दे यांनी फेटाळला. ते म्हणाले की यंत्रणा तपास करत आहेत व तो थांबलेला नाही. फडणवीस त्यांच्या प्रचारात काही बोलले असतील तो राजकीय प्रचार होता. निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होतच रहातात. त्याचा संबध सध्याच्या घटनांशी जोडता कामा नये. 

अजित पवार यांच्याबरोबर राजभवनावर गेलेले नरहरी झिरवळ व इतर तीन आमदारांना शपथविधीनंतर थेट दिल्लीत आणले गेले. तेथे त्यांना ज्या ओबेरॉय हॉटेलात ठेवले तेथे साध्या वेशातील दिल्ली पोलिस व बाऊन्सर्सचा पहारा होता असेही समोर आले आहे. मात्र त्यांना भाजपने नव्हे तर अजित पवार यांनीच दिल्लीत पाठविले होते, भाजपचा त्याच्याशी काही संबंध नाही असेही सहस्त्रबुध्दे यांनी सांगितले 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com