आम्ही किती 'कडू' हे बच्चू कडूंना दाखवू

शेतकरी प्रश्‍नांचे राजकारण करून चर्चेत येण्यासाठी फडणवीस यांच्याबद्दल चुकीची वक्तव्ये केली जात आहेत. फडणवीस शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर प्रामाणिकपणे काम करीत असून या पुढे मुख्यंमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास भाजपचा कार्यकर्ता किती आक्रमक आहे, हे दाखवून देऊ. - भाजप कार्यकर्ते
आम्ही किती 'कडू' हे बच्चू कडूंना दाखवू

पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल आमदार बच्चू कडू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला. अलका टॉकीज चौकात 'रास्ता रोको' करून कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. ''शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर बॉम्ब फोडू'' असे विधान कडू यांनी केले होते. या पुढे असे वक्तव्य केल्यास भाजप कार्यकर्ते किती कडू आहेत, हे पुण्यात पाय ठेवल्यानंतर कडू यांना दाखवतील, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला.

शहर सुधार समिती अध्यक्ष महेश लडकत, नगरसेविका स्मिता वस्ते, सरस्वती शेंडगे, नगरसेवक रघुनाथ गौडा, गोपाळ चिंतल, शंकर पवार, भाजपचे शहर उपाध्यक्ष राजा शेंडगे आदींनी यात सहभाग घेतला. नगरसेवक धीरज घाटे यांनी याचे आयोजन केले होते. घाटे म्हणाले, ''शेतकरी प्रश्‍नांचे राजकारण करून चर्चेत येण्यासाठी फडणवीस यांच्याबद्दल चुकीची वक्तव्ये केली जात आहेत. फडणवीस शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर प्रामाणिकपणे काम करीत असून या पुढे मुख्यंमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास भाजपचा कार्यकर्ता किती आक्रमक आहे, हे दाखवून देऊ.''

चिंतल म्हणाले, ''महाराष्ट्राची आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम कडू यांच्यासह विरोधक करीत आहेत. त्यांचे पितळ उघडे पाडण्याचे आणि सरकारच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे काम भाजपचे कार्यकर्ते शिवार संवाद यात्रेद्वारे करीत आहेत. कडू यांनी संघर्षापेक्षा संवादासाठी पुढे यावे. मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यास तयार आहेत.'' बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल पुन्हा आक्षेपार्ह वक्तव्य केले, तर त्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देऊ. असा इशारा शंकर पवार यांनी आपल्या भाषणात दिला.

कडू यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
रास्ता रोको आणि घोषणा देऊन भाजप कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांचा निषेध केला. कडू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अचानकपणे अंत्ययात्रा निघताच बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची धावपळ उडाली. ही अंत्ययात्रा वैकुंठ स्मशानभूमीच्या दिशेने जात असतानाच पोलिसांनी त्यांना गांजवे चौकाजवळ रोखले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com