भाजपचे कोकणवासियांना पर्यटन विकासाचे आमिष

भाजपचे कोकणवासियांना  पर्यटन विकासाचे आमिष

मुंबई : कोकणवासीयांनी शिवसेनेला इमानेइतबारे आजपर्यंत साथ दिली. केवळ कोकणातच नाही तर उपजीविकेसाठी मुंबई, मुंबईच्या उपनगरात, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उरण-पनवेल भागात विखुरलेल्या कोकणवासीयांनी शहरामध्ये येऊनही धनुष्यबाणाची कास कायम धरलेली गेल्या अनेक वर्षामध्ये पहावयास मिळालेली आहे. कोकणस्थ हा लाल मातीमधील शिवसेनेचा पारंपरिक मतदार आपल्याकडे वळविण्यासाठीच कोकणच्या लाल मातीत कमळ फुलविण्यासाठी भाजपकडून कोकणवासियांना पर्यटन विकासाचे आमिष दाखविण्यात येवू लागले आहे. 
कोकणच्या सर्वांगीण विकासामध्ये नजीकच्या भविष्यामध्ये मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या रेड्डी ते रेवसदरम्यानच्या कोस्टल रोडलगतच्या परिसरात भाजपकडून पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम आखला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कोकणात पर्यटकांची वर्दळ वाढीस लागेल, कोकणच्या माणसाला रोजगार मिळून त्यांच्या अर्थकारणालाही गती मिळेल व त्यातूनच शिवसेनेचा पारंपरिक मतदार असणाऱ्या लाल मातीतील कोकणी समाज आपणाकडे विकास कामांच्या माध्यमातून वळविण्याची भाजपाकडून रणनीती आखली जात आहे. 
रेड्डी ते रेवसदरम्यान येणाऱ्या महत्त्वाची सागर किनारे (बीचेस), गड किल्ले, मंदिरे, रायगड जिल्ह्यातील फणसाडा व कर्नाळा ही दोन अभयारण्ये यांचाही या पर्यटन स्थळांमध्ये राज्य सरकारकडून विकास करण्यात येणार असून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मध्य प्रदेश सरकारच्या वेसाईड ऍमेनिटीजच्या धर्तीवर कोकण भागात पर्यटनाकरीता अग्रक्रमाने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कोस्टल हायवेपासून किलोमीटरच्या अंतरात या पर्यटन सुविधा विकसित करण्यात येणार असून पर्यटन व रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून याकरिता निधी खर्च केला जाणार आहे. कोकणातील पर्यटनाकरीता विविध योजनांवर भाजपा सरकार गंभीरपणे विचार करत असून बांधा, वापरा, हस्तांतरित करा या धर्तीवर काही खासगी कंपन्यांचाही पर्यटन विकासाकरिता भाजपा वापर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
कोकणातील सिंधुदुर्ग येथील तारकलीजवळ सी-वर्ल्डच्या नावाखाली महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर गेल्या अनेक वर्षापासून प्रशासन काम करत आहे. आघाडी सरकारच्या काळात सुमारे 1700 एकर जागेवर हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. भूसंपादनास राज्य सरकारने सुरूवात केली असता कोकणवासियांकडून भूसंपादनाला मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला. कोकणवासियांची नाराजी दूर करण्यासाठी या प्रकल्पाकरिता केवळ एकर जागेचेच आता भूसंपादन केले जाणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे त्या भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 
केवळ हापूसच्या आंब्यावर अर्थकारण अवलंबून असणाऱ्या कोकणस्थ माणसाच्या अर्थकारणाला पर्यटनाच्या माध्यमातून गती मिळावी व कोकणस्थ माणसाला त्याच्या लाल मातीतच या माध्यमातून रोजगार मिळावे यासाठी हे प्रयत्न असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात शिवसेनेचा पारंपरिक मतदार तोडण्याची ही भाजपाची खेळी असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com