bjp | Sarkarnama

भाजपची गणनिहाय जागृती मोहीम

सरकारनामा ब्युरो
रविवार, 9 एप्रिल 2017

निवडणुकीतील यशानंतर भारतीय जनता पक्षाने "गाव चलो' अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पंचायत समिती गणनिहाय गावांत कार्यकर्त्यांची संपर्क मोहीम हाती घेतली जाणार आहे.

सातारा : निवडणुकीतील यशानंतर भारतीय जनता पक्षाने "गाव चलो' अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पंचायत समिती गणनिहाय गावांत कार्यकर्त्यांची संपर्क मोहीम हाती घेतली जाणार आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून 1 ते 31 मे या कालावधीत योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

भारतीय जनता पक्षाचे केंद्रात व राज्यात सरकार आल्यानंतर त्यांनी विविध योजना सुरू केल्या. काही योजनांच्या नावात व कार्यक्रमात बदल करून त्या नव्याने सुरू केल्या. या योजना व त्यांचा लाभ घेण्यासाठी नेमके काय करावे, याची माहिती प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोचवून शक्‍य तेथे संबंधितांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता आता सक्रिय होणार आहे. एप्रिलमध्ये जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे यासाठी प्रशिक्षण शिबिर होणार आहे. राज्यातील व केंद्रातील सत्तेचा वापर करून भारतीय जनता पक्षाने पालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत यश मिळविले आहे. आजपर्यंत सातारा जिल्ह्यात दोन्ही कॉंग्रेस व्यतिरिक्त इतर पक्षाला पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदेत स्थान नव्हते. पण नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने अनेक ठिकाणी आपले उमेदवार निवडून आणून सत्तास्थानात चंचुप्रवेश केला आहे.

यशामुळे भाजपच्या नेत्यांच्या सातारा जिल्ह्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आता त्यांचे एकच लक्ष विधानसभा निवडणूक हे आहे. या निवडणुकीपूर्वी प्रत्येक गावांत भाजपचे वातावरण निर्माण होण्यासाठी "गाव चलो' अभियान राबविले जात आहे. यामध्ये भाजप सरकारने आणलेल्या विविध योजनांची माहिती कार्यकर्ते प्रत्येक गावांतील व्यक्तींपर्यंत पोचविणार आहेत. यात पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जनधन योजना, शेती विमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, सुकन्या समृद्धी योजना, आदी योजनांचा समावेश आहे. या योजनांबाबत जागृती करून त्यांचा लाभ जास्तीत लोकांना कसा मिळवून देता येईल, यावर भर देणार आहेत. त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना एप्रिलमध्ये प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणानंतर एक ते 31 मे या कालावधीत प्रत्येक गणनिहाय प्रत्येक गावांत जाऊन योजनांविषयी जनजागृती करणार आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख