आमरसाच्या मेजवानीने होणार आमदारांचा वाढदिवस !  - birthday of mlc deshpande | Politics Marathi News - Sarkarnama

आमरसाच्या मेजवानीने होणार आमदारांचा वाढदिवस ! 

श्रीकांत पाचकवडे 
गुरुवार, 8 जून 2017

वाढदिवसानिमित्त शिक्षकांनी कोणतीही भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ आणू नये. मला भेट द्यायचीच असेल तर सर्व शिक्षकांनी व स्नेहीजनांनी आपल्या शालेय परिसरात कृपया एक वृक्ष लावावे, असे आवाहन आमदार श्रीकांत देशपांडे यांनी निमंत्रण पत्रिकेव्दारे केले आहे. 

अकोला : शिक्षकांच्या न्यायहक्कासाठी लढणारे अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या जंगी वाढदिवसाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. विषयही तसाच आहे. कारण आमदार महोदयांच्या वाढदिवसानिमित्त सर्व शिक्षकांना आंब्याच्या रसाची खास मेजवानी ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मेजवानीचे सर्व शिक्षकांना व्यक्तीशः निमंत्रण देण्यात येत आहे. 

शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडत विधानपरिषदेत आणि रस्त्यावर अनेक अफलातून आंदोलने करून आमदार श्रीकांत देशपांडे नेहमीच चर्चेत राहतात. गेल्या तीन महिन्यांपूर्वी त्यांच्यावर ह्दयविकासाची शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्‍टरांनी त्यांना दोन महिने विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. मात्र, या काळात विविध प्रश्न घेऊन भेटण्यासाठी येणाऱ्या शिक्षकांची गैरसोय होऊ नये म्हणून आमदार श्रीकांत देशपांडे यांनी अमरावती विभागातील हजारो शिक्षकांना मॅसेज पाठवून मला दोन महिन्यांची रजा द्या, अशी विनंती केली होती. आमदार रजा मागतोय हे पाहून अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. पण शिक्षकांची कनेक्‍टीव्हीटी ठेवण्यासाठी केलेला हा फंडा चांगलाच गाजला. 

आता आमदार महोदयांचा 12 जून रोजी वाढदिवस आहे. यानिमित्त शिक्षक आघाडीच्या वतीने अकोल्यातील प्रमिलाताई ओक हॉलमध्ये श्रीकांत देशपांडे यांच्या जंगी वाढदिवस आणि सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. सभेच्या माध्यमातून काही घटनात्मक बदल सुद्धा संघटनेच्या घटनेत करण्यात येणार असल्याने ही सभा महत्वपूर्ण समजली जात आहे. विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्व शिक्षकांसाठी आंब्याच्या रसाची खास मेजवानी ठेवण्यात आली असून त्यांचे व्यक्तीशः सर्व शिक्षकांना निमंत्रण देण्यात येत आहे. सोशल मिडीयावर या मेजवानीच्या जरूर या वाट पाहतो ! अशा पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने देशपांडे यांचा वाढदिवस चर्चेचा विषय ठरला आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख