मरायचं असतं तर तवाचं फास घेतला असता - रामेश्‍वर भुसारे

मरायचं असतं तर तवाचं फास घेतला असता - रामेश्‍वर भुसारे

औरंगाबाद, ता.27 : "मरायचे असते तर तवाचं फास घेतला असता सायबं, एवढ्या लांब कशाला आलो असतो ?' भावनाविवश होऊन रामेश्वर भुसारे बोलत होते. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या भुसारे यांना पोलिसांकडून मारहाण झाली अन्‌ त्यानंतर आत्महत्येचा खोटा गुन्हाही त्यांच्यावर दाखल करण्यात आला. त्या पार्श्‍वभूमीवर भुसारे यांच्या घरी व शेतात प्रत्यक्ष भेट दिली. त्यावेळी भुसारे यांनी आपल्या भावना "सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम'कडे मोकळ्या केल्या. 

आपल्या संघर्षाची कहाणी सांगताना रामेश्वर भुसारे म्हणाले, मी वीस गुठ्यांत जानेवारी 2015 मध्ये शेडनेट बसवण्यासाठी स्वतःजवळचे आणि नातलग मित्रांकडून 10 लाख रूपये खर्च केले. त्या रोपवाटिकेसाठी नियोजनही केले. रोपवाटिकेचे कार्डही छापले. त्यानंतर चांगले उत्पादन घेऊन आपल्या पदरात चार पैसे पडतील या आशेवर असणाऱ्या भुसारे यांनी शेडनेटमध्ये पीक घेण्यास सुरवात केली. परंतु 11 व 14 एप्रिल 2015 रोजी आलेल्या वादळी वारे व गारपिटीने शेडनेट पिकासहित जमीनदोस्त झाले. 

अस्मानी संकटाने पुरते हादरलेल्या रामेश्वर भुसारे यांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून कन्नड तहसीलदार व औरंगाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केले. याबाबत सांगताना रामेश्वर म्हणाले, कन्नड तहसीलदारांच्या आदेशाने माझ्या शेतासह गावातील इतरांच्या नुकसानीचे पंचनामेही कृषी विभागाकडून करण्यात आले. परंतु वर्ष उलटून गेले तरी कोणतीही कार्यवाही होत नव्हती. मंत्र्यांना आपल्या समस्या कळावी म्हणून भुसारे हे गावापासून 35 किलोमीटर कन्नडला येवून ईमेल पाठवायचे. सगळ्या मंत्र्यांना त्यांनी ई मेल पाठविले. जिल्हाधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी यांच्या सरकारी कार्यालयात चकरा मारून थकलेल्या भुसारे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच धाव घेतली. 4 ऑक्‍टोबर 2016 रोजी औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी आपल्याला न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. 

त्यानंतर चार वेळा मंत्रालयात चकरा मारल्यावर त्यांना जुन्या नियमाने तुला नुकसान भरपाई देता येणार नाही. तू नवीन शेडनेट उभे कर त्यासाठी आम्ही बॅंकेला कर्ज द्यायला लावतो असे सांगण्यात आले. त्यानंतर रीतसर बॅंकेत अर्ज, जामीन हे सोपस्कर पार पाडले. त्यानंतर बॅंकेने भुसारे यांना 16 लाख 22 हजार 967 प्रकल्प खर्चापैकी 25 टक्के म्हणजे 4 लाख 5 हजार 742 रक्कम भरण्यास सांगितली. उर्वरित 12 लाख 17 हजार 225 इतकी रक्कम बॅंक कर्ज म्हणून देणार होती. 

कष्टाची जिद्द असलेला हा बळीराजा अक्षरशः पत्र्याच्या शेडमध्ये राहतोय. ते ही महिना पाचशे रूपये भाड्याने. चार एकर जमीन त्यात केवळ एकरभर भिजेल एवढंच पाणी. बागायती क्षेत्र केवळ एक एकर. रामेश्वर मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत मिळावी म्हणून गेल्या दोन वर्षापासून पाठपुरावा करत आहेत. पण त्यांची कोणी दखलच घेत नसल्याचे पाहून रामेश्वर यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला. मुंबई येथे आझाद मैदानात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर बारा दिवस भुसारे उपोषणही केले. मात्र, शासन व्यवस्थेला जाग येत नसल्याने यावर मार्ग काढावा यासाठी रामेश्वर भुसारे मुख्यमंत्र्यांना भेटायला आले. मात्र त्याला जबर मारहाण करून त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला. याबाबत विचारले असता भुसारे म्हणाले, मी पोलिसांना चावलो असतो तर माझ्या जबड्याला सात टाके कसे पडले असते ? माझे दात कसे पडले असते ? मला मुख्यमंत्र्यांनीसुद्धा खोटं सांगितल्याने जास्त वाईट वाटतयं. मुख्यमंत्र्यांनी तरी मला न्याय द्यावा, असे भुसारे भावना व्यक्त करतात. 

भुसारे यांना एक लहान मुलगी व एक मुलगा आहे. सध्या भुसारे पत्नीसह रोजंदारीने कामाला जातात. चार एकर शेती तीही पडीक, केवळ एक एकर भिजेल इतकेच पाणी. त्यामुळे त्यांनी शेडनेट उभारले होते. पण पावसाने होत्याचे नव्हते केले. पुन्हा कणखरपणे उभे राहण्यासाठी भुसारे धडपडत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com