bhupesh baghel biodata | Sarkarnama

पराजयात "जय' शोधणारा लढवय्या ! 

प्रकाश पाटील 
रविवार, 16 डिसेंबर 2018


भूपेश बाघेल हे कॉंग्रेसचे निष्ठावंत नेते. गेल्या पंधरा वर्षात छत्तीसगडमध्ये रमणसिंह सरकारविरोधात लढताना या नेत्यांने अनेक चढउतार पाहिले. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला समोरे जाताना पराभव पचविले. पण, पराभरावने खचून न जाता प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्ष या नात्याने त्यांनी कॉंग्रेसला विजय मिळवून दिला. पराजयात जय पाहणारे भूपेश हे म्हणूनच वेगळे वाटतात. 

छत्तीसगडमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून सत्तेवर असलेल्या रमणसिंह सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याच कॉंग्रेसच्या चार नेत्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. ती चौकडी म्हणजे भपेश बाघेल , टी. एन. सिंह देव, ताम्रदाज साहू आणि चरणदास महंत. खरेतर कॉंग्रेसने सर्वाधिक ताकद मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये लावली होती.

छत्तीसगडकडे त्यानंतर लक्ष होते. रमनसिंहासारख्या नेत्याला घरी बसविणे सोपे नाही असेही कॉंग्रेसला वाटत होते. पण, वास्तवातील चित्र तसे नव्हते. जेवढी मेहनत येथे घ्यायला हवी होती तितकी घेतली नाही. तरीही येथे मध्यप्रदेश, राजस्थानपेक्षा चांगला निकाल लागला. येथे कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. खरेतर कॉंग्रेसला या विजयाचा धक्काच बसला असे म्हणावे लागेल. 

छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसने दणदणीत विजय मिळविला पण, मुख्यमंत्री ठरविताना राहुल गांधींना तारेवरची कसरत करावी लागली. कारण येथील विजयाचे श्रेय राज्यातील जनता चौघांना देत होती. त्यामुळे कोणाच्या गळ्यात माळ घालायची हे निश्‍चित होत नव्हते. तरीही भूपेश यांचे नाव थोडे सुरवातीपासूनच पुढे होते आणि कॉंग्रेसच्या हायकमांडलाही तेच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटत होते. याचे कारणही असे आहे की बाघेल हे कॉंग्रेसचे अत्यंत निष्ठावंत नेते आहेत.

कॉंग्रेस त्यांचा श्‍वास आहे. त्यांची आजपर्यंतची राजकीय वाटचाल पाहिली तर त्यांनी कॉंग्रेससाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. रमणसिंहांना ज्या पद्धतीने टार्गेट केले. जनतेच्या मनात भाजप सरकारविरोधात असंतोष पसरविला याचे श्रेय त्यांना निश्‍चितपणे जाते. 

भूपेश हे छत्तीसगड प्रदेश कॉंग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीत 2018 ची निवडणूक पक्षाने लढविली. स्वत: राहुल यांनीही त्यांच्यावर विश्वास टाकला. या विश्वासाला त्यांनी तडा जावू दिला नाही. 

भूपेश यांचा जन्म 23 ऑगस्ट 1961 रोजी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या पत्नीचे नाव मुक्तेश्‍वरी असून त्यांना चार मुल आहेत. बागेल घराण्याचा दबदबा पूर्वीपासूनच आहे. मुक्तेश्‍वरी यांचे वडील म्हणजे डॉ. नरेंद्र देव वर्मा. ते ज्येष्ठ हिंदी साहित्यिक. तसेच धर्मगुरू स्वामी आत्मानंद हे चुलते. 

भूपेश हे कुर्मी म्हणजे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी 1980 दरम्यान राजकारणाला सुरूवात केली. चंदुलाल चंद्रकांत हे त्यांचे राजकीय गुरू. 1985 मध्ये युवक कॉंग्रेसचे दुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर ते मध्यप्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष होते (पूर्वी छत्तीसड मध्यप्रदेशात होते).1993 मध्ये ते पाटन मतदारसंघातून प्रथमच आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 1998 मध्येही विजयी झाले. बागेल हे दिग्वीजयसिंह यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिही होते. पुढे त्यांना बढती मिळाली आणि 1999 ते परिवहनमंत्री बनले. 

2000 मध्ये छत्तीसगडची निर्मिती झाल्यानंतर ते 2003 मध्ये पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. पण, राज्यात यावेळी कॉंग्रेसचा पराभव झाला आणि भाजप सत्तेवर आली. रमनसिंह मुख्यमंत्री बनले. त्यावेळी बाघेल हे विरोधी पक्षनेते होते. पाटण मतदारसंघातून निवडून येणाऱ्या बाघेल यांना मात्र 2008 च्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर पक्षाने त्यांना 2004 मध्ये दुर्ग लोकसभा मतदारसंघातून आणि 2009 मध्ये रायपूर लोकसभा मतदारसंघातून उभे केले. पण, दोन्ही वेळेला त्यांचा पराभव झाला. 

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वादळ आल्यानंतर कॉंग्रेसने भूपेश यांना 2014 मध्ये छत्तीसगड प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष केले. त्यावेळी राज्यात रमणसिंहांचा दबदबा होता. त्यांच्या विरोधात लढणे सोपेही नव्हते. तरीही बाघेल यांनी देव, महंद, कॉंग्रेसचे प्रभारी पुनिया, टी. एन. सिह यांच्या खांद्याला खांदा लावून रमनसिंह सरकारविरोधात लढा सुरू ठेवला. एक दोन नव्हे तर गेल्या पंधरा वर्षापासून भूपेश नावाचा निष्ठावंत कॉंग्रेस नेता लढत राहिला. जयपराजयाचा विचार न करता. 

2018 साल उजाडले आणि कोणत्याही परिस्थितीत रमणसिंह सरकार खाली खेचण्याची जणू शपथच या नेत्याने घेतली. राज्यात कॉंग्रेसला यश मिळवून देण्यात प्रदेश अध्यक्ष म्हणून भूपेश यांचा सिंहाचा वाटा आहे. ते स्वत: पुन्हा पाटण मतदारसंघातून मोठे मत्ताधिक घेऊन विजयी झाले आहे. कॉंग्रेसच्या या लढवय्या नेत्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ येऊन पडली. 

भूपेश यांचा पिंड राजकारणी असा असला तरी सामाजिक कार्यात नेहमीच ते सक्रिय असतात. राजकारण बाजूला ठेवून गोरगरीबांना कसा न्याय मिळेल याचा सतत विचार करणारा हा नेता समाज जागृतीसाठीही सर्वात पुढे असतो. लग्न समारंभात उधळपट्टी थोपविण्यासाठी ते सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करतात. एक राजकारणी, समाजकारणी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शेवटी विजयश्री खेचून आणला. पराजयात जय पाहणारे भूपेश हे म्हणूनच वेगळे वाटतात. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख