रस्त्याच्या कामाला गावकऱ्यांचा नाही, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा विरोध - संदीपान भुमरे

रस्त्याच्या कामाला गावकऱ्यांचा नाही, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा विरोध - संदीपान भुमरे

औरंगाबाद : विकासकामाला गावातील लोक विरोध करत नसतात, ज्यांना ये-जा करण्यासाठी अनेक वर्षांपासून रस्ता नाही, ते विरोध कसे करतील. मुळात रस्ता झाला तर त्याचे श्रेय मला मिळेल यातून गावातील काही राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवत गोंधळ घातल्याचा दावा आमदार संदीपान भुमरे यांनी सरकारनामाशी बोलतांना केला. काहीही झाले तरी म्हारोळच्या गावकऱ्यांसाठी मी रस्ता करणारच असेही त्यांनी निक्षून सांगितले. 

पैठण तालुक्‍यातील म्हरोळ या गावातील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी शिवसेना आमदार संदीपान भुमरे या गावात गेले होते. तेव्हा काही स्थानिक तरुणांनी निवडणुकीच्या तोंडावर काम करायला आला आहात, कामाची वर्क ऑर्डर आहे का ? अशी विचारणा करत भुमरे यांना रस्त्याचे काम करूच नका म्हणत गोंधळ घातला होता. या संदर्भातील वस्तुस्थिती सांगताना भुमरे म्हणाले, रस्त्याचा कामाला गावकऱ्यांचा मुळीच विरोध नाही. ज्या गावाला गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता नाही, ते लोक विरोध करतीलच कसे? 

राजकीय हेतूने राष्ट्रवादीच्या काही तरुणांनी रस्ता उद्‌घाटनाच्या कामात खोडा घालून गावकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करतांना वर्क ऑर्डर आमदार खिशात घेऊन जात असतो का ? मुळात गावातील लोकांना रस्ता चांगला, दर्जेदार आणि टिकाऊ असावा ही अपेक्षा असते. वर्क ऑर्डरशी त्यांचा काहीही संबंध नसतो. गोंधळ घालणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तीन किलोमीटर रस्ता करा अशी मागणी केली होती. त्यावर जेवढा निधी आहे, त्यात शक्‍य तितका रस्ता करू, उर्वरित काम इतर निधीच्या माध्यमातून करू असा शब्द मी त्यांना दिला पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या प्रकारामुळे मी थांबणार नाही गावकऱ्यांना रस्ता करून देणारच असे देखील भुमरे यांनी सांगितले. 

राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली 
गेल्या पाच वर्षात मतदारसंघामध्ये अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे जनता माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे डिपॉझीट जप्त होईल अशी परिस्थिती आहे. राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच त्यांच्याकडून असे प्रकार केले जात असल्याचा आरोप देखील संदीपान भुमरे यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com