नागपूर अधिवेशनात भुमरेंनी मांडला बोगस रेशनकार्डचा मुद्दा ...

 नागपूर अधिवेशनात भुमरेंनी मांडला बोगस रेशनकार्डचा मुद्दा ...

औरंगाबाद : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर सहा दिवसांच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पहिले तीन दिवस गोंधळात गेले. तरी उर्वरित तीन दिवसांत विविध प्रश्‍न मांडण्यात आमदारांना यश आले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पैठणचे शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांनी मतदारसंघातील बोगस रेशनकार्डचा मुद्दा मांडत संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी सभागृहात केली. 

संदीपान भुमरे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत पैठण मतदारसंघात 2000 ते 2015 दरम्यान बोगस कादपत्रांच्या आधारे पंधरा हजार रेशनकार्ड तयार करण्यात आल्याच्या प्रश्‍नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. भुमरे म्हणाले, पैठणमध्ये तत्कालीन तहसिलदार व महा ई सेवा चालक भाऊसाहेब काळे यांनी संगनमताने पंधरा हजार बोगस शिधापत्रिकांचे वाटप केले. त्यामुळे या रेशनकार्डचा वापर सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी करण्यात आला. एवढेच नाही तर शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या स्वस्त धान्याची काळाबाजारात विक्री करून लाखोंचा भ्रष्टाचार देखील करण्यात आला. 

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती, मात्र या समितीने आपला अहवाल सोयीनूसार देत या प्रकरणातील संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न केला. बोगस शिधापत्रिका वाटप प्रकरणातील आरोपींवर गुन्हे दाखल होऊन देखील पुढील कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे औचित्याचा मुद्दा उपस्थित करून मी पुन्हा एकदा या गंभीर प्रकरणाकडे शासनाचे लक्ष वेधत आहे. शासनाने या प्रकरणाची पुन्हा एकदा सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी आणि अशा बोगस प्रकारांना आळा घालावा अशी मागणी देखील भुमरे यांनी यावेळी केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com