संग्राम थोपटेंची हॅटट्रीक कोंडे रोखू शकणार?

संग्राम थोपटेंची हॅटट्रीक कोंडे रोखू शकणार?

पौड : भोर विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत मुळशी तालुक्‍यातून 84 हजार 745 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्‍यात 55.53 टक्के मतदान झाले असून, लोकसभेपेक्षा ते चार टक्‍क्‍यांनी घसरले आहे. तथापि राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी, भाजपाची स्थिर भूमिका आणि जाहीर सभांपासून वंचित राहीलेला मुळशी तालुक्‍यातील मतदार आघाडीच्या थोपटेंचा संग्राम यशस्वी करणार की युतीच्या कोंडेंचा कुलदिपक भोरच्या गादीवर बसविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतू विजयी उमेदवारासाठी मुळशीकरांची मते निर्णायक ठरणार, हे मात्र नक्की.


मुळशी तालुक्‍यात 83 हजार 391 पुरूष आणि 69 हजार 196 महिला असे एकूण 152590 मतदार आहेत. त्यामध्ये 48 हजार 630 पुरूष, 36 हजार 114 महिला आणि एक तृतीयपंथी अशा एकूण 84745 मतदारांनी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरूषांचे मतदानाचे प्रमाण 58.31 टक्के तर महिलांचे 52.19 टक्के होते. सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत मुळशीतून 59.56 टक्के मतदान झाले होते.

यावेळच्या भोर विधानसभा निवडणूकीत मुळशीच्या पदरी तिसऱ्यांदा निराशाच पडली. आघाडीची उमेदवारी ठरल्याप्रमाणे कॉंग्रेसचे संग्राम थोपटे यांना मिळाली. परंतु युतीची उमेदवारी मुळशीतून मिळेल, अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती. मात्र सेनेचा उमेदवारीचा बी फॉर्म देण्याबाबत थोपटेंनी लावलेली व्यूहरचना यशस्वी झाली. दुसऱ्यांदा भोरमधून कुलदिप कोंडे यांना उमेदवारी मिळाली. उमेदवारी मिळण्याची ठाम आशा असल्याने आत्माराम कलाटे यांनी राष्ट्रवादीला जयमहाराष्ट्र करीत हाती शिवबंधन बांधले आणि प्रचारालाही सुरूवात केली होती. परंतू ऐनवेळी मातोश्रीतून फासे पलटले. उमेदवारीची माळ कोंडेच्या गळ्यात पडली. त्यामुळे निराश झालेले कलाटे यांनी बंडाचे निशान फुंकले.

त्यामुळे भोरच्या रणांगणात संग्राम थोपटे, कुलदिप कोंडे, आत्माराम कलाटे असा तिरंगी सामना सुरू झाला. मात्र, प्रचाराच्या काळात आघाडी आणि युतीच्या उमेदवाराची एकही जाहीर सभा तालुक्‍यात झाली नाही. अधिकृत पक्षाचा उमेदवार नसल्याने कार्यकर्ते, मतदारातही नाराजी पसरली. अनेकांनी पक्षनिष्ठा खुंटीवर टांगून मिळेल तिथून खिसा गरम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तालुक्‍यात निवडणूकीच्या वातावरणाचा रंग चढलाच नाही.

तालुक्‍यात शिवसेनेचा मतदार ठाम असतो हे आतापर्यंतच्या निवडणूकीने दाखवून दिले आहे. मात्र यावेळी इच्छुकांच्या आशेवर पाणी पडल्याने सेनेतील काही दिग्गज प्रचारापासून दूर राहीले. युती असतानाही पूर्वीच्या रागाचा बदला म्हणून की काय भाजपही शांत होती. पराभूत झाल्यानंतर गेल्या पाच वर्षात तसेच प्रचाराच्या काळातही कोंडे यांना मुळशीसाठी अपेक्षित वेळ देता आली नाही. नाराजांची त्यांना मनधरणी करता आली नाही. युतीचा सर्वाधिक मतदार असलेल्या पूर्वपट्टयातही कमी मतदान झाले. त्याचा फटका युतीला किती बसतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आघाडीमध्येही काही प्रमाणात बिघाडी झाली. राष्ट्रवादीची ताकद मोठी असतानाही सुरूवातीला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांत समन्वय नव्हता. प्रचार नियोजनाबाबतची आर्थिक नाडी कॉंग्रेस सूत्रांकडेच होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी पहावयास मिळाली. राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी आघाडी धर्म प्रामाणिकपणे पाळला. काहींनी मात्र मुंह में राम बगल मे छुरी याप्रमाणे आघाडीत छुपी बंडाळी केली. तर काहींनी कलाटेंचा उघडउघड प्रचार केला. त्यामुळे मूळचे राष्ट्रवादीचे असलेले कलाटे थोपटेंची मते तालुक्‍यात किती थोपविणार हा औत्सुक्‍याचा विषय झाला आहे.

बंडाचे निशाण फुंकलेले आत्माराम कलाटे यांना तालुक्‍याची अस्मिता म्हणून राष्ट्रवादी, शिवसेनेतील काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी छुपा तसेच उघडपणे पाठींबा दिला. मात्र प्रचारात विस्कळीतपणा बराचसा जाणवत होता. कलाटेंसाठी सुरूवातीला उत्साहाचे वाटणारे वातावरण मतदानाच्या दोन दिवस आगोदर बऱ्यापैकी शांत झाले होते. मात्र सेना आणि राष्ट्रवादीची मते मिळणार असल्याने कलाटे कुणाची किती मते खातात याकडेही थोपटे, कोंडे यांचा डोळा आहे.

मतदानाच्या दिवशी मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची मरगळ दिसून आली. पुणेकर मतदारांनीही मुळशीकडे पाठ फिरवली. पूर्वभागातील सोसायटीमध्ये राहणाऱ्या उच्चशिक्षित मतदारही घरीच बसले. पावसाने विश्रांती घेतलेली असतानाही मताचा टक्का वाढला नाही. आघाडी, सेनेतील अनेक पदाधिकारी स्वतःचे मत दिल्यानंतर गायब झाले. या सर्वांचा फटका कुणाला किती बसणार हे 24 तारखेच्या मतपेटीतूनच कळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com