bhogawati suger factory | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

पी. एन. "भोगावती'वर आयुर्वेदिक उपचार करतील? 

निवास चौगले 
बुधवार, 26 एप्रिल 2017

कारखान्यातील निकालाने कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या राजकारणाला उभारी मिळाली आहे. या निकालाने करवीर विधानसभा मतदार संघातील राजकीय संदर्भही बदलणार आहेत. एका बाजूला एकटे पी. एन. आणि दुसरीकडे पालकमंत्र्यांसह झाडून सर्वपक्षीय नेते असे वातावरण असताना त्यांनी एकहाती सत्ता
मिळवून आपले राजकीय स्थानही बळकट केले आहे. विधानसभेला अजून दोन वर्षे आहेत, या काळात कारखान्याच्या सभासदांना दिलेला शब्द काही प्रमाणात जरी खरा करण्याच्या प्रयत्न त्यांच्याकडून झाल्यास त्याचा फायदा त्यांना विधानसभेत नक्की होईल. 

कोल्हापूर : भोगावती कारखान्याच्या निवडणूक निकालाने बेशिस्त कारभारालाच चपराक दिली आहे. पाच वर्षापूर्वी राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी कारखान्यात गैरकारभार झाला तर हातात हंटर घेण्याचा इशारा दिला होता, त्याकडे बघून सभासदांनी भरघोस मतांनी सत्ता दिली पण हीच सत्ता बेकायदेशीर कारभार, अवास्वव्य नोकरभरतीमुळे राखता आली नाही. श्री. मुश्रीफ यांनी खरोखरच बोलल्याप्रमाणे हंटर नुसता हातात जरी घेतला असता तरी निकालाचे चित्र वेगळे असते. 

गेल्या निवडणुकीत श्री. मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने ही निवडणूक लढवली. त्यावेळी गैरकारभार करू नका, असा वडीलकीचा सल्ला श्री. मुश्रीफ यांनी दिला होता. पण सत्तेची धुंदी चढली की आपण काय करतो याचे भान रहात नाही, त्याचीच प्रचिती या कारखान्यात सत्ताधाऱ्यांकडून झाली. सत्ताधाऱ्यांच्या कारभारातील उणिवा, गैरकारभार यावर चकार शब्द न काढता डोळ्यावर कातडी ओढून नेत्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. दारुण पराभवामागे हेही एक
कारण आहे. 

निवडणुकीत चांगल्या कारभाराची आश्‍वासन दिलेली फक्त चर्चाच होत राहिली. उच्चशिक्षित, सुसंस्कृत म्हणून ज्या अध्यक्षांकडून चांगल्या कामाची अपेक्षा होती त्यांच्याकडून पोरकट, गैरकारभाराची अपेक्षाच नव्हती. त्यामुळेच कारखान्याच्या इतिहासात परंपरा मोडून सभासदांनी एकहाती विरोधकांच्या हातात सत्ता दिली. हीसुद्धा एक सत्ताधाऱ्यांना त्यांच्या कामाची पोचपावतीच आहे. 

राष्ट्रवादीच्या ताब्यात कारखाना आल्यानंतरही तो अडचणीत होता हे मान्य आहे. पण त्याला सुस्थितीत आणण्याचे वचन श्री. मुश्रीफ यांच्यासह नेत्यांनी दिले होते. पण त्यांच्या "भोळ्याभाबड्या' स्वभावामुळे त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आणि आजारी असलेला हा कारखाना "व्हेंटिलेटर' वर कधी गेला हे कळलेच नाही. पॅनेलची बांधणी करण्यापासून राष्ट्रवादीत धुसफुस होती, एवढेच नव्हे तर पॅनेलमधून नांव जाहीर झालेल्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली. त्यात पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हेच नाराज झाले. त्यांची समजूत काढण्यात पक्षाला यश आले पण तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. 

दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या नेमक्‍या या त्रुटींवर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलच्या उमेदवारांनी हल्ला केला. गैरकारभारापेक्षा कारखान्याला गतवैभव मिळवून देण्याचा त्यांनी शब्द दिला. पी. एन. यांचे नेतृत्व व त्यांची काम करण्याची धमक पाहून सभासदांनी त्यांना सत्ता दिली. आता खरी गरज आहे ती त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीची. "भोगावती' च्याच एका कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांनी अडचणीत असलेला सहकार आता आयुर्वेदिक उपचारांशिवाय सुधारणार नाही, त्यासाठी पथ्य, पाणी पाळावे लागले असे सांगितले होते. पी. एन. यांनी गुरुस्थानी असलेल्या कै. देशमुख यांचे म्हणणे तंतोतंत मनावर घेतले तर कारखाना पूर्वपदावर येणे अवघड असले तरी अशक्‍य नक्कीच नाही. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख