Bhogawati sugar election six leaders in fray | Sarkarnama

भोगावती साखरच्या निवडणुकीत आजी-माजी सहा आमदारांची प्रतिष्ठा पणाला

सरकारनामा वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्याविरोधातच पाच आजी-माजी आमदारांनी व्यूहरचना आखली आहे. त्यात सतेज पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, हाळवणवकर, के. पी. पाटील व संपतराव पवार-पाटील यांचा समावेश आहे. या वादळात पी. एन. यांचा टीकाव किती लागणार हे निकालादिवशी समजणार आहे. 

कोल्हापूर: परिते (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने आजी-माजी सहा आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात ठाकलेले हे नेते आज एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरत आहेत. 

"भोगावती' साठी 23 एप्रिल रोजी मतदान होत आहेत. या निवडणुकीत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील स्वतः उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांच्यादृष्टीने ही निवडणूक अधिक प्रतिष्ठेची आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखालील कॉंग्रेसचे पॅनेल, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, संपतराव पवार-पाटील व शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्त्वाखालील महाआघाडी तर आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील परिवर्तन पॅनेल असा हा सामना होत आहे. 
कारखान्यावरील कर्ज, गैरकारभार, बेकादेशीर नोकरभरती, बंद पडलेली शिक्षण संस्था हे प्रचाराचे मुख्य मुद्दे ठरत आहेत. कारखान्यावर राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. माजी आमदार के. पी. पाटील यांचे जावई धैर्यशील पाटील-कौलवकर हे अध्यक्ष होते. पण कारखान्यातील गैरकारभारामुळे संचालक मंडळ बरखास्त होऊन प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली आहे. हा मुद्दाही प्रचारात महत्त्वाचा ठरला आहे. 

या निवडणुकीतील आणखी एक वैशिष्ट म्हणजे महिन्याभरापुर्वीच झालेल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीत जे एकमेकांच्या विरोधात होते, त्यांनी आज एकमेकांच्या गळ्यात गळे घातले आहेत. कॉंग्रेसचा अध्यक्ष करण्यासाठी पी. एन. यांच्याबरोबरच सतेज पाटील, हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील हे एकत्र होते. त्यांच्याविरोधात भाजपाचे आमदार सुरेश हाळवणकर, चंद्रदीप नरके ही मंडळी होती. आज मात्र श्री. मुश्रीफ यांच्यासह के. पी., ए. वाय. यांच्या जोडीला भाजपाचे हाळवणकर व श्री. नरके आहेत. ए. वाय. पाटील हे श्री. हाळवणकर यांचे व्याही आहेत. या नातेसंबंधातूनच हे दोघे एकत्र आहेत. कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मात्र या दोन्ही आघाड्यांपासून बाजूला होऊन परिवर्तन पॅनेलच्या रूपाने सवतासुभा मांडळा आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवर चरापले यांना घेऊन त्यांनी हे पॅनेल तयार केले. ऐनवेळी कारखान्याचे विद्यमान संचालक व माजी उपाध्यक्ष नंदूभाऊ पाटील हे त्यांच्या हाताला लागल्याने हे पॅनेलही प्रभावी झाले आहे. 

पी. एन. विरोधात पाच दिग्गज
कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनेलमध्ये ते स्वतः उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधातच पाच आजी-माजी आमदारांनी व्यूहरचना आखली आहे. त्यात सतेज पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, हाळवणवकर, के. पी. पाटील व संपतराव पवार-पाटील यांचा समावेश आहे. या वादळात पी. एन. यांचा टीकाव किती लागणार हे निकालादिवशी समजणार आहे. 

कार्यक्षेत्राबाहेरील नेत्यांच्या तोफा
या कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील नेत्यांच्या तोफा प्रचाराच्या निमित्ताने धडधडू लागल्या आहेत. त्या आमदार हळवणकर, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, के. पी. पाटील यांचा समावेश आहे. या नेत्यांच्या प्रचार सभांतही पी. एन. हेच टार्गेट आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख