भिवंडीत ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे वर्चस्व 

भिवंडी तालुक्‍यातील तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे वर्चस्व कायम राहिले असून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचा धुव्वा उडाला आहे
भिवंडीत ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे वर्चस्व 

भिवंडीः भिवंडी तालुक्‍यातील तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे वर्चस्व कायम राहिले असून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचा धुव्वा उडाला आहे. 

निकालानंतर भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या समर्थकांनी गुलाल उधळत मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला. 

भिवंडी तालुक्‍यातील तीन ग्रामपंचायती आणि बारा ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी निवडणूक झाली. याची मतमोजणी सोमवारी (ता.28) दुपारी भिवंडी तहसील कार्यालयाच्या पोलिस संकुलात झाली. 
चुरशीच्या निवडणुकीत नांदीठणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अनिल किसन जाधव यांनी 463 मते मिळवून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार जयश्री जयराम भोईर (205 मते) यांचा दारुण पराभव केला. 

संजय वाळंज, मनीषा जाधव, सुजाता शेलार, सुनील जाधव, नियती भोईर, कपिल सुतार आदी उमेदवारांनी मोठ्या मताधिक्‍यांनी विजय मिळवून राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव केला. 

मोरणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदासह अन्य दोन वॉर्डात नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) या आरक्षित प्रवर्गातील उमेदवार नसल्याने येथे सरपंच व दोन सदस्यांची निवड होऊ शकली नाही; मात्र भाजप पुरस्कृत ग्रामविकास पॅनेलचे श्रीकांत शिंदे, सुनिता शिंदे, पांडुरंग शिंदे, राजश्री शिंदे, वैशाली शिंदे या उमेदवारांनी शिवसेना उमेदवारांचा पराभव करून भाजपची सत्ता स्थापन केली. 

बहुचर्चित खोणी, खाडीपार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपने पाठिंबा दिलेल्या नाजमीन अल्ताफ शेख यांनी पाच हजार 145 मते मिळवून कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या रेवती नामदेव शास्त्री (दोन हजार 121 मते) यांचा पराभव केला. या ग्रामपंचायतीमध्ये पूर्णतः कपिल पाटील, महेश चौघुले समर्थक फॅक्‍टर चालल्याने त्यांच्या पॅनेलचे सऊद अबुल जैस शेख, मुमताज शेख, अफसाना शेख, जवाहर कमल मंडळ, मेघा उत्तम म्हात्रे, रहमत नबाब बेग, शाहनवाज इम्तियाज कुरेशी, सुनंदा संतोष मुकादम, हिना मेहबूब पटेल, सगीर शेख, अब्दुल रहेमान खान, रजियाबानो शेख, इम्रान उस्मान शेख, शानू रब्बी अन्सारी आदी उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. 

खोणी गावातील वॉर्ड क्र. 5 मध्ये संदेश चंद्रकांत पाटील, मोहन पांडुरंग बागल, कोमल किशोर शिंगोळे आदींची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. 

मतदारांकडून भाजपलाच पसंती 
भाजपला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आदी पक्षांनी आव्हान दिल्यामुळे निवडणूक लक्षवेधी झाली; मात्र तीन ग्रामपंचायती आणि 12 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत आठ जागांवर भाजपने दणदणीत यश मिळवून बाजी मारली. 

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी भाजपलाच पसंती दिल्यामुळे खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौघुले, भाजप जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, जिल्हा परिषद सदस्य अशोक घरत, जिल्हा सरचिटणीस राम माळी, सभापती रविना रवींद्र जाधव आदींनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत मतदारांचे आभार मानले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com