Bhiwandi Flyover work not progressing | Sarkarnama

नियोजन शुन्य कारभारामुळे रखडले उड्डाणपुल : मुख्यमंत्र्यांचा आदेशाला तिलांजली

शरद भसाळे
रविवार, 20 जानेवारी 2019

भिवंडी महपालिकेच्या हद्दीतील एक व मुंबई नाशिक महामार्गावर सुरू असलेल्या दोन उड्डाणपुलांचे काम अर्धवट स्थितीत असल्याने 'एमएमआरडीए'चा नियोजनशुन्य कारभार उघड झाला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अशा  कारभारामुळे या मार्गावरून जाणा-या वाहनचालक व प्रवाश्यांचा गेल्या वर्षापासून छळ सुरू आहे.

भिवंडी : भिवंडी महपालिकेच्या हद्दीतील एक व मुंबई नाशिक महामार्गावर सुरू असलेल्या दोन उड्डाणपुलांचे काम अर्धवट स्थितीत असल्याने 'एमएमआरडीए'चा नियोजनशुन्य कारभार उघड झाला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अशा  कारभारामुळे या मार्गावरून जाणा-या वाहनचालक व प्रवाश्यांचा गेल्या वर्षापासून छळ सुरू आहे. उड्डाणपूलाचे काम जलदगतीने होण्यासाठी शासन दरबारी व एमएमआरडीएच्या कार्यालयात पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार कपिल पाटील यांच्या सह अनेक सामाजिक संस्था ग्रामस्थांनी लेखी तक्रार दाखल केला आहेत. मात्र, नियोजनशून्य कारभारामुळे उड्डाणपूलाचे काम भिजतच पडले आहे. ठाणे जिल्ह्याचा सर्वागीण विकास करण्यासाठी जलदगतीने काम करण्याचा सुचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत महिन्यात दिल्या आहेत. मात्र अद्याप कामाला गती मिळालेली नाही.

देशातील विविध भागातून मुंबईस जाणारी वाहने ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून जात असली तरी मोठय़ा संख्येने ही वहातूक भिवंडी तालुक्यातील विविध मार्गाने होत आहे. दिवसेंदिवस वाढत्या वहानांच्या संख्येमुळे वाहतूकक कोंडी सोडविण्याच्या हेतूने भिवंडी  तालुक्यातील रांजनोली व माणकोली चौक येथे नवीन उड्डाणपुलाचे नियोजन केले.त्याचे भूमीपुजन जलद गतीने झाले. मात्र काम संथपणे सुरू आहे.

माणकोली उड्डाणपुलाबाबत  तक्रारी केल्यानंतर या पुलाची एक बाजू पूर्ण करून वाहतूक सुरू केली.हे काम अर्धवट सुरू असताना सुप्रिम कंपनीने रांजनोली चौकातील दोन पुलाचे बांधकाम सुरू केले. गेल्या वर्षापासून हे काम देखील संथगतीने सुरू असल्याने बाहेरील वाहनांसह शहरातील वाहनेही अडचणीत सापडली आहेत. गेल्या दोन वर्षापासून ही स्थिती असताना शासनाने दुर्गाडी येथील खाडीवरील पुलाचे काम सुप्रिम कंपनीला दिले. मात्र तेथे ही कामात आालेली ढिलाई सुधारण्याचा प्रयत्न एमएमआरडीएच्या अधिका-यांकडून करण्यात आला नाही. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्गाप्रमाणे कोनगांवा पासून दुर्गाडी पुलार्पयत वहातूक कोंडी होत आहे. परिणामी याचा त्रास वाहनचालक व प्रवाश्यांना भोगावा लागत आहे.  

उड्डाणपुलाचे प्रकल्प रखडल्याची संतप्त  तक्रार खासदार कपिल पाटील यांनी शासन दरबारी करताच  सुप्रिम कंपनीच्या कंपनीचे काम थांबवून नवीन निविदा प्रक्रीया सुरू करून नव्या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याप्रमाणे एमएमआरडीएच्या अधिका-यांनी येथील कल्याणरोड ते साईबाबा मंदिरार्पयत गेल्या काही दिवसांपासून थांबलेल्या उड्डाणपुलाच्या कामा बाबत निर्णय घ्यायला हवे होते. गेल्या दीड वर्षापासून धिम्या गतीने भिवंडी ठाणे व कल्याणरोड वर सुरू असलेल्या आरसीसी रस्त्यांबाबत ठोस निर्णय घेणे अपेक्षित होते. 

भिवंडी शहरात एमएमआरडीए मार्फत  अंतर्गत आरसीसी रस्त्यांचे काम सुरू केले आहेत. त्यातच मेट्रो रेल्वेचा प्रकल्प होऊ घातला आहे. या सर्व प्रकल्पांमधून शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. हे प्रकल्प  कधी पुर्ण होणार याचा तपशील कोणालाच माहिती नाही.कामाच्या ठिकाणी दिशादर्शक लावलेले नाहीत. ज्या ठिकाणी काम सुरू आहेत त्या ठिकाणी होणारी वहातूक कोंडी दुर करण्यासाठी वहातूक पोलीस व मोठय़ा संख्येने वार्डनची  नेमणूक केली. मात्र एमएमआरडीए  अधिका-यांचे  कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने पालिका आयुक्त मनोहर हिरे, महापौर जावेद दळवी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून तक्रार केली आहे.

त्याचबरोबर  संथगतीने कामे होत असल्याने नागरिकांना अनेक असुविधांचा संघर्ष करावा लागत आहे. याचा परिणाम  शहरातील सर्व छोटय़ामोठय़ा व्यवसायावर होऊ लागला आहे. बाहेरून काही व्यावसायिक येतात. तर काही स्थानिक व्यापारी मुंबईच्या मार्केटमध्ये जातात. त्यासाठी प्रवास करावाच लागतो. शहरात उच्च शिक्षणांची व्यवस्था  नसल्याने दररोज पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी शहराबाहेर रोज शिक्षणासाठी जात आहेत. तर नोकरदार वर्ग, मजूरवर्ग मोठय़ा संख्येने प्रवास बसेस, कार व रिक्षाने करीत आहेत. त्यापैकी काही लोक सुविधा उपलब्ध होत नसल्याने शहरातून स्थलांतरीत होऊ लागले आहेत. एमएमआरडीएच्या सुविधा योग्य कालावधीत झाल्या तरच येथील नागरिकांचा त्रास थांबणार आहे. तेव्हाच शहरातून होणारे स्थलांतर थांबेल, अशी प्रतिक्रिया उमटत आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख