चेन्नईच्या शिवभक्तासाठी भिगवण पोलिसांनी केलेली धडपड महाराष्ट्राची मान उंचावणारी! - bhigwan police try to save life of chennais old man | Politics Marathi News - Sarkarnama

चेन्नईच्या शिवभक्तासाठी भिगवण पोलिसांनी केलेली धडपड महाराष्ट्राची मान उंचावणारी!

संपत मोरे
मंगळवार, 7 एप्रिल 2020

'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' या गीताची आठवण व्हावी अशी घटना चेन्नई येथील 96 वर्षीय आजोबांच्या बाबतीत घडली.

पुणे: "आम्ही शिव स्वामीगल यांना वाचवू शकलो नाही, याचं दुःख आहे. ते बरे होऊन त्यांच्या कुटुंबात गेले असते तर त्याचा आनंद आयुष्यभर काळजावर कोरून ठेवता आला असता," अशा भावना भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी व्यक्त केल्या. 

'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' या गीताची आठवण व्हावी अशी घटना चेन्नई येथील 96 वर्षीय आजोबांच्या बाबतीत घडली. बेशुद्ध अवस्थेत सापडलेले आजोबा, त्यांना वाचवण्यासाठी पोलीस आणि डॉक्टरांनी केलेली धडपड आणि शेवटी त्यांचा झालेला दुर्दैवी अंत या सगळया चित्रपटाची कथा वाटाव्या अशा घटना गेल्या आठवड्यात घटना घडून गेल्या आहेत. यात पुणे ग्रामीण पोलिसांनी दाखवलेली माणुसकी नुसत्या पोलिसांची नाही तर अवघ्या महाराष्ट्राची मान उंचावेल, अशीच आहे.

चेन्नई येथील शिव स्वामीगल हे शिवभक्त आजोबा नाशिकला देवदर्शनासाठी येत होते. रेल्वेतून प्रवास करत असताना त्यांना त्रास होऊ लागला. त्यावेळी त्यांनी घरातील लोकांना मोबाईलवरून कल्पना दिली, मात्र या संवादाच्या काळात त्यांचा मोबाईल फोन बंद झाला.  पुढे भिगवण पोलिसांना स्टेशन परिसरात ही व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत सापडली. तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी या व्यक्तीला भिगवण येथील दवाखान्यात दाखल करण्यासाठी नेले पण तिथल्या डॉक्टरांनी त्यांना बारामतीला न्यायला सांगितले. मग पोलिसांनी त्यांना बारामतीला दवाखान्यात दाखल केले. त्यांच्या जवळच्या कागदपत्रावरून ती व्यक्ती शिव स्वामीगल असल्याचे पोलिसांना समजले.

ही घटना 23 मार्च रोजी घडली.शिव स्वामीगल यांना दवाखान्यात दाखल केल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील लोकांचा शोध घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली. ज्यावेळी स्वामीगल यांचा मोबाईल बोलता बोलता बंद झाला होता तेव्हा त्यांचे नातेवाईक अरुण मुथीयाल यांनी महाराष्ट्र पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार केली होती. भिगवण पोलीस जेव्हा त्यांच्या कुटुंबातील लोकांचा शोध घेत होते तेव्हा मालवणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण शिंदे यांनी त्यांना संबंधित तक्रारदाराचा मोबाईल नंबर दिला. मग त्या नंबरवर पोलिसांनी संपर्क केला
असता त्यांची ओळख पटली पण लॉकडाऊन असल्याने त्यांना चेन्नईवरून महाराष्ट्रात येता येत नव्हते मग पोलिसांनी त्यांची दवाखान्यात काळजी घेतली पण ते बरे होऊ शकले नाहीत. उपचार सुरू असतानाच 5 एप्रिलला त्यांचे निधन झाले.

निधनानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबातील लोकांना कळवले पण लॉकडाऊनमुळे त्यांना अंत्यसंस्काराला येणे शक्य नव्हते. मग त्यांनी पोलिसांनाच अंत्यसंस्कार करण्याची लेखी परवानगी दिली. त्यावेळी त्यांनी पोलिसांना विनंती केली की,"आमच्या पध्दतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करा." पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले होते त्या पद्धतीने अंत्यसंस्कार केले.
 शिव स्वामीगल यांच्या खिशात एक लाख पस्तीस हजार शंभर रुपये, घड्याळ आणि प्रवासातील वस्तू सापडल्या. त्याची माहिती पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना दिली.

शिव स्वामीगल यांचे नातेवाईक अरुण मुथीयाल यांनी भिगवण पोलीस स्टेशनचे जीवन माने, बारामती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, मालवणी पोलीस स्टेशनचे लक्ष्मण शिंदे यांचे पत्र पाठवून आभार मानले आहेत. यासंबंधाने बोलताना जीवन माने म्हणाले,"ते आजोबा बरे होऊन पुन्हा त्यांच्या घरी गेले असते तर खूप आनंद वाटला असता, पण दुर्दैवाने ते वाचले नाहीत. ते जेव्हा दवाखान्यात उपचार घेत होते तेव्हा आमच्याच घरातील व्यक्ती आजारी आहे असं आम्हाला वाटत होतं. आमचे कर्मचारी त्यांच्याबद्दल आस्थेने चौकशी करत होते. ते गेले खूप वाईट वाटलं." 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख