bhartiya janata yuva morcha shirdi | Sarkarnama

भाजयुमोच्या बैठकीत "युवा महाराष्ट्र, युवा सरकार' चा गजर

डॉ. बाळ ज. बोठे पाटील
रविवार, 2 जुलै 2017

आघाड्या आणि सध्याच्या लाटेच्या राजकारणात भाजपने पक्षसंघटनेचे महत्त्व कायम ठेवले. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही या पक्षाची मातृसंस्था आहे. संघाचे नियंत्रण या पक्षावर आहे. त्यामुळे पक्ष सत्तेत असो की नसो, संघटनात्मक बांधणीसाठी तो प्राधान्य देतो. 

गेल्या लोकसभा निवडणुकीतील मोदी लाटेमुळे भारतीय जनता पक्षाने केंद्रात स्वबळावर सत्ता मिळविली. याच लाटेच्या आधारे महाराष्ट्रातील सत्ताही काबीज केली. वर्षानुवर्षे तळागाळापर्यंतचा जनाधार आणि मतपेढ्यांच्या आधारे सत्तेत येण्याची क्षमता बाळगून असलेल्या कॉंग्रेसला भाजपच्या या मुसंडीमुळे हादरा बसला. देशातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपचा उदय झाला. आकर्षक घोषणा व प्रसारमाध्यमांचा प्रभावीपणे वापर करून जनमानसावर गारूड करण्याचे या पक्षाचे तंत्र यशस्वी झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले. आजही पक्षाचा एकमेव चेहरा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रस्थानी ठेवून हा पक्ष विस्तार करतो आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात कॉंग्रेस पक्षावर एकाधिकारशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपने आता तोच मार्ग स्वीकारला. तथापि आजही "केडर' या पक्षाचा आत्मा आहे. या पक्षाचे "व्यूहरचनाकार' अमित शहा स्वतः पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी देशभर फिरत आहेत. यापूर्वी प्रदीर्घ काळ सत्तेत रमलेल्या कॉंग्रेसने संघटनात्मक बांधणीला नेहमीच दुय्यम स्थान दिले. हा या दोन्ही पक्षांतील महत्त्वाचा फरक आहे. शिर्डीत भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक नुकतीच झाली. युवकांना आकर्षित करण्यासाठी भाजपने आपल्या युवा शाखेला पुन्हा सक्रिय केले. त्यामागे शहा यांचीच व्यूहरचना आहे. 

सहा तरुण आमदारांवर जबाबदारी 
विधानसभेत भाजपकडे चाळिशीच्या आतील आमदारांची संख्या वीसहून अधिक आहे. विविध समाजघटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या आमदारांना भाजयुमोच्या कामात सक्रिय करण्यात आले. त्यातील सहा जणांकडे या आघाडीची जबाबदारी सोपविण्यात आली. शिर्डीतील बैठकीस जवळपास सर्व जिल्ह्यांतील 350 पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाचा चेहरा म्हणून त्या त्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या या पदाधिकाऱ्यांमध्ये कुठेही सत्ताधारी असल्याचा अहंभाव दिसून आला नाही. पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी एकाच पातळीवर येऊन एकमेकांशी संवाद साधताना दिसत होते. संघटनमंत्री रवींद्र भुसारी व प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी पुढील वर्षभराचा कार्यक्रम दिला. राज्य सरकारच्या गेल्या तीन वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पक्षाचे तत्त्वज्ञान पदाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आले. पुढील पन्नास वर्षे भाजपच सत्तेत राहील, अशी उत्साहवर्धक विधाने करण्यात आली. विकासाचा मंत्र जपणाऱ्या या पक्षाच्या व्यासपीठावरून "जय श्रीराम'च्या घोषणाही जाणीवपूर्वक देण्यात आल्या. "अबकी बार, युवकांना संधी अपार', "युवा महाराष्ट्र, युवा सरकार' असे या बैठकीचे घोषवाक्‍य होते. व्यासपीठावरून मार्गदर्शन केले जात असताना उपस्थित प्रतिनिधी नोंदवहीत त्याची टिपणे करताना दिसत होते. खुर्च्यांची रांगदेखील मोडणार नाही, याची काळजी घेण्यात येत होती. ही बैठक भाजयुमोची की संघाची असा प्रश्‍न पडावा, एवढी शिस्त पाळली जात होती. 

हिंदुत्वाचा नारा, जातींची समीकरणे 
पक्षाचे व्यूहरचनाकार स्व. वसंतराव भागवत यांनी महाराष्ट्रात "माधव'चा (माळी-धनगर-वंजारी) प्रयोग यशस्वी करून दाखविला. प्रा. ना. स. फरांदे, अण्णा डांगे व गोपीनाथ मुंडे हे चेहरे जाणीवपूर्वक पुढे आले. त्यातून मुंडे यांच्यासारख्या लोकनेत्याचा उदय झाला. एका बाजूला हिंदुत्वाचा नारा आणि दुसऱ्या बाजूला जातीपातीची समीकरणे जुळवून कै. भागवत यांनी पक्षाचे स्वरूपच बदलून टाकले. एकेकाळी "वाणी-बामणांचा पक्ष' म्हणून हिणवल्या जाणाऱ्या भाजपकडे आज विविध समाजघटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार-खासदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामागे जसे लाटेचे राजकारण आहे, तसे संघटनात्मक विस्ताराला दिलेले महत्त्वही कारणीभूत आहे. खरे तर आता राजकीय पक्ष आणि निवडणुकांचे स्वरूप बदलत चालले आहे. हा बदल घडविण्यामागेदेखील भाजपची नवी रणनीती कारणीभूत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. लाट निर्माण करून त्याद्वारे निवडणुका जिंकण्याचे या पक्षाचे तंत्र सध्या तरी यशस्वी होत आहे. 

सत्तेभोवती कॉंग्रेसची संघटना 
यापूर्वी कॉंग्रेसच्या "चलती'च्या काळात या पक्षाने दगड उभा केला तरी तो निवडून येतो, असे गमतीने म्हटले जायचे. एवढे निर्धोक वातावरण आणि (स्व.) पंडित नेहरू व (स्व.) इंदिरा गांधी यांच्यासारखे कमालीचे लोकप्रिय नेतृत्व कॉंग्रेसला लाभले. व्यक्तिकेंद्रित राजकारणाच्या आधारे कॉंग्रेसने देशावर राज्य केले. त्यामुळे पक्षसंघटनेची अवस्था केविलवाणी झाली. सत्तेभोवती संघटना फिरत राहिली. पक्षाला आज त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. याउलट मोदींसारखे नेतृत्व व लोकसभेत "थंपिंग मेजॉरिटी' असतानादेखील पक्षाचे अध्यक्ष अमित शहा सध्या संघटनात्मक बांधणीसाठी देशाच्या दौऱ्यावर आहेत. हा फरक लक्षात घ्यायला हवा. शिर्डीतील दोन दिवसांच्या भाजयुमोच्या बैठकीला त्याचा संदर्भ असल्याचे स्पष्टपणे समोर आले. 

पक्षसंघटनेचे महत्त्व कायम 
तथापि, केवळ संघटनेच्या आधारे पक्षाचा विस्तार होत नाही. "केडर बेस' असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या मर्यादा नजरेत भरतात. आजवर सत्तेसाठी झुंजणाऱ्या भाजपकडे कार्यकर्त्यांची फौज होती; तरीही या पक्षाला यापूर्वी एका विशिष्ट मर्यादेपलीकडे यश प्राप्त करता आले नाही. कॉंग्रेस प्रबळ होती, त्या वेळी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लढा दिला, तरच आपला टिकाव लागेल, यावर सर्व धुरिणांचे एकमत झाले. त्यातून जनता पक्षाचा उदय आणि अस्त झाला. पुढे भाजपने राम मंदिराचा मुद्दा पुढे करून हिंदुत्वाची लाट निर्माण केली. केवळ दोन खासदार असलेला हा पक्ष सर्वांत मोठा विरोधी पक्ष म्हणून उदयाला आला. ही लाट निर्माण करणारे पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांना सर्वसमावेशक प्रतिमा निर्माण करण्यात अडचण निर्माण झाली. उदारमतवादी छबी सांभाळणारे अटलबिहारी वाजपेयी यांचे नेतृत्व अग्रभागी आले. त्यांनी सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊन "एनडीए'चे सरकार स्थापन करण्याचा प्रयोग दोन वेळा केला. त्यात सुरवातीला अपयश आणि नंतर यश आले. हा इतिहास विस्ताराने मांडण्याचा हेतू हा की त्या वेळच्या बलाढ्य कॉंग्रेसला नमविण्यासाठी एकाच वेळी लाट आणि विरोधी पक्षांची आघाडी हे तंत्र भाजपने वापरले. आता मोदींसारखा वलयांकित नेता पुढे करून स्वबळावर सत्ता मिळविली. पूर्वी व्यक्तिकेंद्रित राजकारणावरून कॉंग्रेसला लक्ष्य करणारे अडवाणी आणि वाजपेयी यांना आपला पक्ष त्याच मार्गाने सत्तेपर्यंत पोचल्याचे पाहणे नशिबी आले. पूर्वीच्या आघाड्या आणि सध्याच्या लाटेच्या राजकारणात भाजपने पक्षसंघटनेचे महत्त्व कायम ठेवले. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही या पक्षाची मातृसंस्था आहे. संघाचे नियंत्रण या पक्षावर आहे. त्यामुळे पक्ष सत्तेत असो की नसो, संघटनात्मक बांधणीसाठी तो प्राधान्य देतो. 

भाजप "बाहुबली' 
लाटेवर स्वार होऊन सत्तेत गेलेल्या या पक्षाला लाट ओसरली की ओहोटी लागेल. "कुठे आहेत अच्छे दिन?', "विदेशातून काळा पैसा आणणार होते, त्याचे काय झाले?', "महागाई कमी झाली का?', "शेतकरी सुखी झाला का?', "काश्‍मीरमध्ये पाकिस्तानचे थैमान आणि सीमेवरील चीनची घुसखोरी थांबली का?', "मन की बात नव्हे काम की बात करा,' "घोषणा बस झाल्या प्रत्यक्ष कृती करा,' अशी टीका या पक्षावर चोहोबाजूने सुरू आहे. त्यात तथ्यदेखील आहे. मात्र, समोर समर्थ विरोधी पक्ष आणि तोडीस तोड नेतृत्व नाही. राजकारणात चढ-उतार सुरूच असतात. मात्र, भाजप "बाहुबली' झाला आहे; "कटप्पा' समोर दिसत नाही. या बाहुबलीमागे स्वतःचे आणि मातृसंस्थेच्या संघटनेचे बळ आहे. त्यामुळे सिंहासन गमावले तर काय ही चिंता त्याला नाही. हा पक्ष संघटनात्मक बांधणीला सर्वोच्च प्राधान्य देतो. अन्य राजकीय पक्ष आणि भाजप यात हाच महत्त्वाचा फरक आहे. शिर्डीतील भाजयुमोची बैठक हा फरक अधोरेखित करून गेली, हेही तेवढेच खरे आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख