कॉंग्रेसचा अर्ज नेलेले भरमू सुबराव पाटील जाणार भाजपात 

श्री. पाटील यांचा भाजपा प्रवेश झाला तरी त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.
कॉंग्रेसचा अर्ज नेलेले भरमू सुबराव पाटील जाणार भाजपात 

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी चंदगड मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवारी अर्ज नेलेले माजी मंत्री भरमू पाटील हे रविवारी (ता. 28) भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ते भाजप प्रवेश करतील. 

भरमू पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे याच मतदार संघातून भाजपाची उमेदवारी घेण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या माजी मंत्री कै. बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या सौ. नंदिती बाभूळकर यांची पंचाईत झाली आहे. त्याचबरोबर कै. कुपेकर यांचे पुतणे व शिवसेनेच्या उमेदवारीचे प्रमुख दावेदार संग्रामसिंह कुपेकर यांचीही अडचण होणार आहे. 

जिल्ह्याच्या राजकारणात श्री. पाटील हे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे नेतृत्त्व मानतात. श्री. महाडिक यांचे नेतृत्त्व असलेल्या "गोकुळ' दूध संघात श्री. पाटील यांचे सुपुत्र दिपक हे संचालक आहेत, त्यांच्या स्नूषा सौ. ज्योती ह्या कॉंग्रेसच्या गेल्या सभागृहात जिल्हा परिषद सदस्य होत्या. युती शासनाच्या काळात श्री. पाटील हे रोजगार हमी योजना मंत्री होते. गेली काही दिवस ते कॉंग्रेस सोबत होते. 2014 ची निवडणूकही त्यांनी कॉंग्रेसच्या चिन्हावरच लढवली होती. 

अलिकडेच कॉंग्रेसने विधानसभासंघनिहाय इच्छुकांकडून अर्ज भरून घेतले आहेत. श्री. पाटील यांनी कॉंग्रेस कमिटीतून अर्ज नेला पण तो प्रदेश कॉंग्रेसकडे सादरच केला नाही. तोपर्यंत त्यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा झाली. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे चंदगड विधानसभा मतदार संघाचे राजकारण बदलणार आहे. युतीत हा मतदार संघ शिवसेनेकडे आहे तर आघाडीत तो राष्ट्रवादीकडे आहे. युती निश्‍चित आहे, पण चंदगडवर सेनेचा नैसर्गिक दावा रहाणार आहे. मतदार संघाच्या बदलाबदलीत हा मतदार संघ शिवसेनेला सोडून कागल भाजपाला देण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे श्री. पाटील यांचा भाजपा प्रवेश झाला तरी त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com