भरमू पाटील अजिंक्‍य चव्हाण यांचा  रविवारी  भाजपा प्रवेश

..
bharmu_subrao_patil
bharmu_subrao_patil

कोल्हापूर   :  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही कॉंग्रेसचे दिग्गज नेते भाजपा किंवा शिवसेनेत करत असलेल्या प्रवेशाचे लोण कोल्हापूर जिल्ह्यातही सुरू होत असून रविवारी  (ता. 28) होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात जिल्ह्यातील दिग्गज नेते भाजपात प्रवेश करणार आहेत. सकाळी दहा वाजता भाजपाचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत केशवराव भोसले नाट्यगृहात हा मेळावा होत आहे. 

तोंडावर विधानसभेची निवडणूक असताना सत्ताधाऱ्यांविरोधात रान उठवून सत्तेत येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीलाच राज्यात खिंडार पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, साताराचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, नगरचे आमदार संग्राम जगताप, वैभव पिचड, माजी मंत्री मधुकर पिचड, राणा जगजितसिंह अशा अनेकांचा भाजपा प्रवेश निश्‍चित असताना या पक्षांतराचे पडसाद जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. 

1995-99 काळात युती शासनात रोजगार हमी योजनेचे मंत्री असलेले व यावेळच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून उमेदवारी अर्ज नेलेले भरमू पाटील हे उद्या भाजपात रितसर प्रवेश करत आहेत. त्यांच्यासह तालुक्‍यातील 200 कार्यकर्त्यांचा जंगी प्रवेशही यावेळी होणार आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर महापालिकेतील राष्ट्रवादीचे माजी शिक्षण समिती सभापती अजिंक्‍य चव्हाण, त्यांचे बंधू व कार्यकर्ते यांचाही भाजपा प्रवेश होणार आहे. उद्याचा भाजपाचा मेळावा हा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याऐवजी इतर पक्षांतील दिग्गजांच्या भाजपा प्रवेशानेच गाजण्याची शक्‍यता आहे. 

या मेळाव्याची जंगी तयारी पक्षाच्या पातळीवर सुरू आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहूल चिक्कोडे यांच्याकडून संभाव्य भाजपा प्रवेश करणाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सभागृहात वेळेवर आणण्याचे नियोजन सुरू आहे. याशिवाय पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक विजय खाडे-पाटील, विजय जाधव या भाजपाच्या बिन्नीच्या शिलेदारांकडून या मेळाव्याचे नियोजन सुरू आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com