bhapkar | Sarkarnama

विभागीय आयुक्तांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 मे 2017

नांदेड : मराठवाडा विकासात्मक कार्यक्रमांची व्यापक मोहिम राबविण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी बुधवारी नांदेडला घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. ग्रामस्तरीय यंत्रणेशी थेट संवाद साधत कागदावरील ग्रामसभांचा भांडाफोड केला. त्याचबरोबर मनरेगा, जलयुक्त शिवार, समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनांचा आढावा घेतानाच विविध विकासकामाचे आदेश दिले. 

नांदेड : मराठवाडा विकासात्मक कार्यक्रमांची व्यापक मोहिम राबविण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी बुधवारी नांदेडला घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. ग्रामस्तरीय यंत्रणेशी थेट संवाद साधत कागदावरील ग्रामसभांचा भांडाफोड केला. त्याचबरोबर मनरेगा, जलयुक्त शिवार, समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनांचा आढावा घेतानाच विविध विकासकामाचे आदेश दिले. 

सरकारच्या योजना स्थानिक पातळीवर व्यापक स्वरूपात राबवून राज्यात मराठवाडा विकासाचे मॉडेल ठरवण्याच्या उद्देशाने डॉ. भापकर यांनी ही बैठक जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली नांदेडला बैठक घेतली. त्यांनी व्यासपीठावरून खाली येत उपस्थितांशी संवाद साधला. लोक कल्याणासाठी प्रशासनाच्या फौजेतील सैनिकच विकास साध्य करू शकतात; मात्र स्थानिक पातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, शिक्षक आदी कर्मचाऱ्यांच्या संवादातील विसंगतीमुळे योजनांच्या गतीत दरी वाढत आहे. मुळातच कामाचा विसर पडल्याने सेवेतील निम्म्याहून अधिक कर्मचारी केवळ चाळीस टक्केच काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट करत चांगले काम करण्याच्या सल्ला दिला. 

सेवा धर्मात विकासाचा खरा आनंद मिळतो त्याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. नैसर्गिक आपत्तीला संधी मानून रोजगाराच्या माध्यमातून उदयास आलेल्या "मनरेगा योजने' वर इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी खर्च होत आहे. त्यात मराठवाड्यात निम्मा खर्च होणे अपेक्षित असताना केवळ 28 टक्‍क्‍यांचा खर्च दुर्दैवी आहे. जलयुक्त शिवार, स्वच्छता, मागेल त्यास शेततळे, वृक्ष लागवड, कृषीसह ग्रामविकासाचे विविध उपक्रम व त्याचे यश मनरेगाच्या योग्य अंमलबजावणीत दडले आहे. सुधारीत धोरणानुसार लोककल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेस जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली. 

महिला दिनाच्या जाहीर ग्रामसभेबाबत ग्रामसेवकांना प्रश्‍न विचारत त्यांनी धारेवर धरले. अनेक ग्रामसभांना ग्रामसंपर्क अधिकारी हजर नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने स्थानिक कर्मचाऱ्यांची त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली. कामचुकारांची गय केली जाणार नसल्याची तंबीही त्यांनी दिली. मानव विकास निर्देशाकांत मराठवाडा अग्रेसर होईल यासाठी प्रयत्न करा. या भूमीचे पाईक आहात, तर तिच्यासाठी झिजण्याची तयारी ठेवा. कामाशी प्रामाणिक राहिलात, तर त्यातून आरोग्य पर्यायाने आनंद लाभेल, असा मनमोकळा संवाद त्यांनी साधला. 

काही कारणांनी मराठवाडा प्रदेश मानव विकासात मागे आहे. शिक्षण या घटकासाठी प्रयत्न करण्यात आले. पण आता यापुढे शिक्षण, पाणी, शेती, स्वयंरोजगार यांच्यासह जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, आरोग्याचे कार्यक्रम राबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्याकडे सामर्थ्य आहे पण ते ओळखले पाहिजे. जे चांगले काम करतात, त्यांचा सन्मान करू. जे मध्येच आहेत, त्यांचे स्थान निश्‍चित करू. बाहेर आहेत, त्यांना कामाच्या प्रवाहात आणू. यातून काम करणाऱ्यांची संख्या वाढवू असेही त्यांनी सांगितले. भूमिपूत्र असाल, तर तुम्हाला या भुमीसाठी झिजण्याची तयारी ठेवा. या प्रत्येक कार्यक्रमाशी आपल्या प्रत्येकाचा संबंध आहे. त्यामुळे या सर्व कार्यक्रमांच्या अंमलबजावणीच्या पातळीवर मराठवाड्याला अग्रेसर ठेवा, असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी त्यांनी मनरेगा अंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार अभियान, मनरेगा, वृक्षारोपण, स्वच्छ भारत मिशन, घरकुल योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, सात / बारा संगणकीकरण, ईपॉज मशीन व ईपीडीएमएस या विषयांच्या अनुषंगाने उपस्थितांशी प्रश्नोत्तरे करत, अडीअडचणी जाणून घेत सगळ्यांशी थेट संवाद साधला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख