भंडारा जि. प. नोकर भरतीत गैरव्यवहार; 19 अधिकाऱ्यांची होणार चौकशी

उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. दोषींना ताब्यात घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. सदर एजन्सीने यापूर्वी घेतलेल्या परीक्षांसह परीक्षेत सहभागी अधिकाऱ्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे. - अरविंद साळवे जिल्हा पोलिस अधीक्षक
Bhandara-ZP-
Bhandara-ZP-

भंडारा  : जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीदरम्यान घेतलेल्या लेखी परीक्षेत ओएमआर (ऑप्टिकल मार्क रिकग्नेशन) शीटमध्ये हेराफेरी करून गुण वाढवून गैरव्यवहार केला. प्रकरणी भंडारा पोलिसांनी चार उमेदवारांसह एसएमबी एजन्सीच्या चार कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहे. दरम्यान, आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत. लेखी परीक्षेत सहभागी 19 अधिकारी, कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी होणार असल्याने यात मोठे रॅकेट गुंतले असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी अंगणवाडी पर्यवेक्षक व कनिष्ठ अभियंता (पाणीपुरवठा) या पदांसाठी नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यात येत होती. 12 जानेवारीला झालेल्या लेखी परीक्षेनंतर ओएमआर शीटमध्ये हेराफेरी करून गुण वाढविण्याचा प्रकार घडला. 


हा प्रकार उघडकीस येताच जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी लक्ष घालून पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी चार उमेदवारांसह एसएमबी प्रा. लिमिटेड एजन्सीचे कर्मचारी सागर उंबरकर, पवार, शुभम राऊत व अन्य एकावर गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत. प्रकरणी पोलिस सखोल तपास करणार असल्याने जिल्हा परिषदेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.


भरती प्रक्रियेत सहभागी जिल्हा परिषद व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. ओएमआर शीटमध्ये हेराफेरी करून गुण वाढविण्याचा प्रकार घडला असून यात एजन्सीचे कर्मचारी सहभागी आहेत. मात्र, भरती प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही संशयाची सुई जात आहे. यामुळे सखोल चौकशीअंती मोठे मासे गळाला लागण्याची शक्‍यता आहे.

आरोपींच्या अटकेनंतर फुटणार बिंग
एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना अटक केल्यानंतर यात दोषी असणाऱ्यांचे बिंग फुटणार आहे. यामुळे गैरव्यवहारात सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. उमेदवारांची सखोल चौकशी केल्यास कुणाच्या माध्यमातून सदर प्रकार केला, याचाही खुलासा होणार असल्याने सर्वांचे लक्ष चौकशीकडे लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com