भंडारा जिल्हा : युतीचा धर्म की जागेचे गणित हा भाजपसमोर प्रश्न

भंडारा जिल्ह्यातील तिन्हीही विधानसभा मतदारसंघांवर भाजपचे वर्चस्व आहे. राज्यात शिवसेनेसोबत युती झाल्यास भंडारा मतदारसंघ मित्रपक्षासाठी सोडण्याची वेळ येऊ शकते. यावरून युतीचा धर्म की जागेचे गणित असा प्रश्‍न भाजपसमोर येऊ शकतो. दुसरीकडे विरोधी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा जिल्ह्यात प्रभाव घटलाय. या पक्षातील बरेच नेते भाजपच्या वाटेवर आहेत.
भंडारा जिल्हा : युतीचा धर्म की जागेचे गणित हा भाजपसमोर प्रश्न

भंडारा जिल्ह्यात भंडारा (अनुसूचित जाती), साकोली आणि तुमसर हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 मधील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती नसल्याने दोन्ही पक्षांचे उमेदवार समोरासमोर होते. अनुसूचित जातीसाठी राखीव भंडाऱ्यातून भाजपचे अॅड. रामचंद्र अवसरे विजयी झाले होते. त्यापूर्वी 2009 मध्ये युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर विजयी झाले होते. येत्या विधानसभा निवडणुकीत युती झाल्यास भाजपला ही जागा शिवसेनेसाठी सोडावी लागेल. परंतु, भाजपचे विद्यमान आमदार असल्याने शिवसेनेला न दुखावता जागा राखून ठेवणे कठीण होणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाजपकडे उमेदवारांची रिघ आहे. भाजपकडून इच्छुकांमध्ये नरेंद्र पहाडे, आशू गोंडाणे, जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालाधरे, मधुसूदन गवई यांची चर्चा आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवेळी कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आणखी बरेच भाजपवासी होण्याची शक्‍यता आहे. यामुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा प्रभाव घटू शकतो. तरीही कॉंग्रेसमधून जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, राजकपूर राऊत, पूजा ठवकर यांना उमेदवारी मिळू शकते. राष्ट्रवादीचे नितीन तुमानेंचेही प्रयत्न आहेत. 

साकोलीत भाजपचे राजेश (बाळा) काशिवार आमदार आहेत. भाजपकडून नवीन चेहऱ्याची अपेक्षा असल्याने प्रकाश बाळबुद्धे, अविनाश ब्राह्मणकर, वामन बेदरे यांचे नाव चर्चेत आहे. कॉंग्रेसचे ब्रह्मानंद करंजेकर हेही ऐनवेळी उमेदवार होण्याची शक्‍यता आहे. याच मतदारसंघात कॉंग्रेसचे नाना पटोले यांचा प्रभाव आहे. त्यांचीही उमेदवारी निश्‍चित मानली जाते. तर, माजी आमदार सेवक वाघाये, डॉ. अजय तुमसरे यांचाही वेळेवर कॉंग्रेसकडून विचार होऊ शकतो. 

तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी सर्वाधिक विकासकामे खेचून आणलीत. परंतु, मतदारसंघावर तुमसर शहराचे वर्चस्व ठेवण्यासाठी वेगवेगळे गट सक्रिय आहेत. त्यामुळे भाजपमधून माजी खासदार शिशुपाल पटले, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्या नावाची चर्चा आहे. तुमसर येथील माजी खासदार मधुकर कुकडे यांची राजकीय मनीषा अजूनही कायम आहे. त्यांनी नुकतेच उमेदवारी मिळत असल्यास भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी दाखवली होती. परंतु, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. तरीही ते अपक्ष रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे.

कॉंग्रेसमधून प्रमोद तितीरमारे, डॉ. पंकज कारेमोरे यांचा इच्छुकांत समावेश आहे. तसेच राष्ट्रवादीमधून अनिल बावनकर, राजू कारेमोरे, अभिषेक कारेमोरे उत्सुक आहेत. ही जागा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्‍यता आहे. या निवडणुकीत असंतुष्टांची संख्या अधिक असून, ही मंडळी वेळेवर वंचित आघाडी व बसपचे उमेदवार म्हणून आव्हान देऊ शकतात. 

नाराजांसाठी वंचित आघाडी
जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडे इच्छुकांची गर्दी आहे. उमेदवारी जाहीर करताच संबंधित पक्षातील नाराज वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरून तिरंगी व बहुरंगी लढत होऊ शकते. या वेळी बसपचा प्रभाव कमी असला तरी, वंचितमुळे प्रस्थापितांचे गणित बिघडण्याची शक्‍यता आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com